मुल्ला येथे राष्ट्रसंत तुकडोजी आणि गाडगेबाबांच्या पुतळ्यांचे अनावरण
देवरी,दि.८(प्रतिनिधी)- आज संतांच्या विचारांचा प्रसार-प्रचार होणे अत्यावश्यक झाले आहे. समाजात अनेक गैरसमज वाढत असल्याने सामाजिक आरोग्य दिवसेंदिवस धोक्यात येत आहे. संत हे विज्ञानवादी असल्याने त्यांच्या विचारात अंधश्रद्धेला मुळीच थारा नाही. संतांनी मुक्या प्राण्यांसह झाडाझुडपांवर सुद्धा प्रेम करण्याची शिकवण दिली. आपण आपल्या मनातील मैल साफ करू शकलो, तर आपल्या प्रगतीला कोणी रोखू शकत नाही, असे प्रतिपादन देवरी विधानसभेचे आमदार संजय पुराम यांनी येथे आज बोलताना व्यक्त केले.
देवरी तालुक्यातील मुल्ला ग्राम पंचायतीच्या वतीने पुतळा अनावरण प्रसंगी आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रमोद संगीडवार हे होते. यावेळी आमदार संजय पुराम यांचे हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण ग्रामपंचायतीच्या प्रांगणात करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच भोजराज घासले, गोटाबोडीच्या जि.प. सदस्य सरिता रहांगडाले, पंस सदस्य महेंद्र मेश्राम, माजी समाजकल्याण सभापती सविता पुराम,सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण हुकरे, माजी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आनंद कुकडे, मुल्लाच्या वैद्यकीय अधिकारी लता गायकवाड, दिलीप श्रीवास्तव, कुलदीप लांजेवार,पुरण मटाले, नंदू बारसे,राजेश राऊत, मुल्ला ग्राम पंचायतीचे सर्व पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविक श्री मेंढे यांनी केले. संचलन डी.ए. भुते यांनी केले. उपस्थितांचे आभार ग्रामसेवक के. एस वैष्णव यांनी मानले. यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment