Saturday 8 July 2017

औरंगाबाद: झाडे न लावण्याचा सुलतानपूर ग्रामपंचायतीचा ठराव


aurangabad news marathi news sakal news no treeplantation

औरंगाबाद - तब्बल 134 एकर वनजमिनीवरील झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल सुरू आहे. याबद्दल वनविभागाकडे अनेकदा तक्रारी केल्या. मात्र, काहीही फरक पडला नाही. असे असेल तर आम्ही झाडे कशासाठी लावायची, असा सवाल सुलतानाबाद (ता. गंगापूर) येथील ग्रामस्थांनी उपस्थित केला. वृक्षलागवड मोहिमे अंतर्गत दिलेली 365 रोपे ग्रामस्थांनी वाजतगाजत जिल्हाधिकारी कार्यालयास परत करून प्रशासनाच्या वेळकाढू कारभाराचा निषेध केला. तसेच अधिकाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत गावात एकही झाड लावणार नाही, असा ठरावही ग्रामसभेत घेतला.
मराठवाड्यात बोटावर मोजण्याइतकेच वनक्षेत्र शिल्लक आहे. हवामानावरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे. आता गंभीर परिणाम लक्षात आल्याने वृक्षलागवडीसाठी अधिकारी संख्या पार करण्यासाठी राबत आहेत. वनजमिनीवरील झाडांची कत्तल थांबवावी, अशी मागणी करूनही त्याकडे डोळेझाक करायची आणि दुसरीकडे झाडे लावण्याचे आवाहन करायचे, वनविभागाच्या या दुटप्पी भूमिकेवर ग्रामस्थांनी नेमके बोट ठेवले. दरम्यान, सुलतानाबाद परिसरात मोठी वनजमीन आहे. त्यावरील शेकडो झाडे सर्रासपणे तोडली जात आहेत. याबद्दल ग्रामस्थांनी स्थानिक अधिकाऱ्यापासून ते संबंधित खात्याच्या मंत्र्यांपर्यंत तक्रारी करीत झाडे वाचविण्याची मागणी केली. मात्र, काहीच कारवाई होत नाही. संबंधितांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत गावात एकही झाड लावणार नाही, असा ठरावच ग्रामसभेत घेतला.
दरम्यान, सप्ताहाच्या समारोपादिवशीच शुक्रवारी (ता.सात) दुपारी गावाला दिलेली रोपे एका टेम्पोत टाकली. त्यानंतर शहरात आल्यानंतर बाबा पेट्रोलपंप ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत दिंडी काढून ती झाडे जिल्हाधिकारी कार्यालयात परत केली. या अनोख्या आंदोलनाने लोकांचे लक्ष वेधून घेतले होते. टाळ, मृदंगाच्या निनादात रोपे परत करण्याच्या या निर्णयाने आता तरी प्रशासनाला जाग यावी, संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी उपसरपंच सोन्याबापू गायके यांनी केली. याप्रसंगी सरपंच अनिता गायके, बाबासाहेब गायके, भागीनाथ सौदागर, कोंडीराम बुट्टे, अप्पासाहेब काळे, सोपान शिंदे, मल्हारी बावले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...