Friday, 28 July 2017

जिल्हा परिषदेच्या गाळे वाटपाला गैरव्यवहाराचा वास


प्रक्रियाच रद्द करून पारदर्शक व्यवहाराची मागणी
गोंदिया,दि.28(खेमेंद्र कटरे)- गोंदिया जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पंचायत समिती क्षेत्रात नव्यानेच बांधकाम करण्यात आलेल्या दुकान गाळे वाटपाला गैरव्यवहाराचा वास सुटला आहे. या प्रकरणी खुद्द जि.प. सदस्य संभ्रमात असून त्यांच्यात कमालीची नाराजी आहे. परिणामी, संशयाच्या भोवऱ्यात सापडलेली सदर गाळेवाटप प्रक्रिया रद्द करून पारदर्शक वातावरणात फेरलिलाव करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील एका आमदाराची सेटिंग नाकारल्याने त्या आमदाराने जि.प. पदाधिकाऱ्यावर आर्थिक देवाण-घेवाणीचा आरोप केल्याचे वृत्त आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, सदर गाळे वाटप प्रक्रियेत लिलाव पद्धतीचा अवलंब करावयाचा होता. मात्र, जि.प. प्रशासन व प्रमुख पदाधिकाऱ्याने या प्रकरणी आपली खिचडी आधीच शिजविल्याचे बोलले जात आहे. यामुळे सदर लिलावाची जाहिरात कमीत कमी लोकांना माहित व्हावी, याचे नियोजन करण्यात आल्याचे काही नाराज जि.प. सदस्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहे. त्यामुळे काही पदाधिकारी व अधिकारी यांच्या संपर्कात असलेल्या मोजक्या लोकांनीच या लिलाव प्रक्रियेत भाग घेतला. या गाळेवाटपाच पारदर्शकतेचा अभाव असून गाळेवाटप कसे व कोणाला करायचे याचे कटकारस्थान आधीच शिजल्याचे वृत्त आहे. एका गाळ्याचा व्यवहार सुमारे ५ लाखापेक्षा अधिक रकमेचा मोबदला घेऊन गाळेवाटपाचे पूर्वनियोजन करण्यात आल्याचे जि.प. वर्तुळात बोलले जात आहे. आपल्या लोकांना गाळे मिळावे, यासाठी जिल्ह्यातील एका आमदाराने सुद्धा फिल्डिंग लावली असल्याची चर्चा आहे. मात्र, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गाळेवाटप झाल्याचे सांगून त्यांची बोळवण केल्याने त्यांनी संताप व्यक्त केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या गाळेवाटपात गोरेगाव तालुक्यातील भाजपच्या एका जि.प.सदस्याचा सक्रिय सहभाग असल्याचीही चर्चा आहे.या गाळेवाटपाच्या निधीचाही माऊंट आबूच्या सहलीसाठी वापर होऊ शकतो ,अशी चर्चा दबक्या आवाजात आहे.
काही जि.प. सदस्यांच्या मते, सदर प्रक्रियेत प्रचंड प्रमाणावर आर्थिक देवाण-घेवाणीचा प्रकार झाला आहे. सर्व गाळेवाटपात पाच-सहा पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या चमूने गाळेवाटपाची खिचडी ही आधीच शिजवली असल्याचे समजते. केवळ खानापूर्ती करण्यासाठी या प्रक्रियेची निविदा काही ठराविक प्रसारमाध्यमात करण्यात आली. यामुळे गरजू लाभार्थींना याची जाणीवच झाली नाही वा ज्यांना झाली त्यांनी अर्ज व संपूर्ण प्रक्रिया करण्यासाठी वेळच मिळणार नाही, याची दक्षता या गैरव्यवहारात समाविष्ठ चमूने घेतल्याचे सांगण्यात येते. लाटरी पद्धतीने करावयाच्या गाळे वाटप प्रक्रियेतही मोठा झोल केल्याचा आरोप काही सदस्य करीत आहेत. साध्या कामवाटपाच्या प्रकरणात खुल्या पद्धतीचा अबलंब करण्यात येतो. गाळेवाटप प्रक्रिया सुद्धा पारदर्शक वातावरणात होणे अपेक्षित असताना दोन-चार लोकांनी बंद खोलीत ही प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती बाहेर येत आहे.
परिणामी, सदर गाळेवाटप प्रकरणी कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याची चर्चा असून गरजू लाभार्थ्यांना डावलण्यात आले आहे. सदर प्रक्रिया रद्द करून पुन्हा लॉटरी पद्धतीने खुल्या पद्धतीचा अबलंब करून दुकान गाळे वाटप करण्याची मागणी जोर धरू पाहत आहे. या प्रकरणाला घेऊन मोरगाव अर्जूनी तालुक्यातील काही लोक न्यायालयात जाण्याच्या तयारीत असल्याची सुद्धा माहिती हाती आली आहे.वास्तविक या सर्व प्रकरणाता विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून गोंदिया जिल्हा परिषदेतील गैरव्यवहाराची चौकशी करण्याची नितांत गरज झाल्याचेही बोलले जात आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...