Monday, 1 January 2018

‘मामा-भाचा’ यात्रा आजपासून

सडक अर्जुनी,दि.01 : तालुक्यातील गिरोला (हेटी) येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी १ जानेवारीपासून दोन दिवसीय ‘मामा-भाचा’ यात्रेला सुरूवात होत आहे. गिरोला येथील मामा-भाचा देवस्थान समितीच्या वतीने दरवर्षी नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच या यात्रेचे आयोजन केले जाते. काही वर्षापूर्वी देवस्थानाच्या जागेवर शेजारी-शेजारी उभ्या असलेल्या दोन ‘साजा’ ग्रामीण भाषेत ‘येन’ प्रजातीचे दोन उंचच उंच झाडे नागरिकांच्या लक्षात आली. यातील मोठे झाड म्हणजे मामा आणि लहान झाड म्हणजे भाचाचे प्रतिक म्हणून परिसरात ओळखले जाऊ लागले. ही झाडे नागरिकांची र्शद्धास्थान बनली. या देवस्थानाच्या मदतीकरीता दरवर्षी देवस्थान समिती व परिसरातील गिरोला, हेटी, सातलवाडा व खोडशिवणी येथील ग्रामस्थांनी १४ वर्षापूर्वी ‘मामा-भाचा’ यात्रेला प्रारंभ केला. या यात्रेला दूरवरून हजारो भाविक हजेरी लावतात.
ही यात्रा नवीन वर्षाच्या पावन पर्वावर भरत असल्याने यात्रेकरू नवीन वर्षाचे स्वागत मोठय़ा उत्साहाने या ठिकाणी साजरा करतात. परंतु, या देवस्थानाकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे या देवस्थान परिसराचा पाहिजे तेवढा विकास झालेला नाही. २ जानेवारीला दुपारी २ वाजता काल्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात कीर्तन, उत्सव, प्रवचन आदी कार्यक्रमाची रेलचेल राहणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन मामा-भाचा देवस्थान समितीचे सदस्य शामराव कापगते, देवराम सुपारे, सेवकराम चांदेवार, दामोदर बांगरे, रामदास दरवडे, लेखराम कापगते, रमेश कापगते, हरीचंद वलथरे, उदाराम कुरसुंगे, आशिष दरवडे, नामदेव कापसे यांनी केले आहे.
गिरोला येथे रात्री नवयुवक कलाकुंज बाल नाट्य मंडळ गिरोला (हेटी) यांच्या सौजन्याने अम्मा भगवान झाडीपट्टी मराठी रंगभूमी देसाईगंज (वडसा) निर्मित ‘लक्ष्मी तू या घरची’ या तीन अंकी नाटकाचे आयोजन केले आहे. या नाटकाचे उद््घाटन आमदार संजय पुराम यांच्या हस्ते व्हीएनसीएम नागपूरचे कार्यकारी संचालक दिलीप गोडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. नाटकाचे रंगमंच पूजक सभापती कविताताई रंगारी, जि.प.सदस्य रमेश चुर्‍हे, पं.स.सदस्य एम.डी.कोराम, सावन बहेकार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
तसेच बाल नाट्य मंडळ गिरोला (हेटी) यांच्या सौजन्याने रंगकर्मी रंगभूमी वडसा व्दारा निर्मित ‘छकुला’ हे नाट्यप्रयोग सादर होणार आहे. या नाटकाचे उद््घाटन जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांच्या हस्ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी मनोहरराव चंद्रीकापुरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि रंगमंच पूजन जि. प.सदस्य रमेश चुर्‍हे यांच्या उपस्थितीत होणार आहे. आणि सातलवाडा येथे श्री मामा-भाचा सार्वजनिक युवा मंडळ सातलवाडाच्या सौजन्याने ‘घुंगराच्या नादात’ हा लावणी प्रयोग सादर होणार आहे. या कार्यक्रमाचे उद््घाटन भंडाराचे जि.प.सदस्य डॉ. नेपाल पटले यांच्या हस्ते सातलवाडाचे सरपंच रामचंद्र कोहळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि रंगमंच पूजक साकोलीचे नगरसेवक भोजेंद्र गहाणे यांच्या उपस्थितीत होणार आहे. या यात्रेचा लाभ घेण्याचे आवाहन मामा-भाचा देवस्थान समितीनी केले आहे.

एका फरार नक्षल्यास अटक

ग़डचिरोली,दि.01ः-पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी गडचिरोली पोलिस ठाण्यात २0१४ रोजी दाखल असलेल्या अप क्रमांक ३0३५/२0१४ भादवि कलम २२४ मधील नक्षल आरोपी प्रविण उर्फ चंद्रिका जेठूराम राऊत याला  ३१ डिसेंबर रोजी ५ वाजताच्या सुमारास अटक केली.
प्रविण उर्फ चंद्रिका राऊत याच्यावर गडचिरोली जिल्ह्यातील वेगवेगळय़ा पोलिस ठाण्यांमध्ये विविध स्वरूपातील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. १९९१ मध्ये चंद्रिका हा चामोर्शी दलममध्ये भरती झाला होता. १९९३ ते १९९९ पर्यंत आरोपी हा चंद्रपूर कारागृहात एका गुन्ह्यामध्ये शिक्षा भोगत होता. तेथून जामिनावर सुटका झाल्यावर २000 मध्ये तो एटापल्ली दलममध्ये भरती झाला होता. २00२ मध्ये एटापल्ली दलममधून त्याची चामोर्शी दलममध्ये सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. शासनाने त्याच्यावर २ लाख इतके बक्षिस जाहीर केले होते.
१ डिसेंबर २0१४ रोजी पोलिस मदत केंद्र गट्टा (फु) उपविभाग धानोरा येथील पोलिसांना नाकाबंदी दरम्यान एका संशयित इसम मिळून आला. त्याची विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव चंद्रिका जेठूराम राऊत (४२) रा. घोडसर ता. एटापल्ली असे सांगितले. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी त्याला पोलिस मुख्यालयात आणले. पोलिस मुख्यालया आणून अटक करण्यात आलेल्या नक्षल्याची विचारपूस करीत असताना रात्री ८.३0 वाजता गार्डरूम जवळील असणार्‍या संरक्षक भिंतीवरून पळून गेला. त्याबाबत पोलिस उपनिरीक्षक राहूल यादव यांच्या फिर्यादीवरून गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. आज पोलिसांनी त्या फरार झालेल्या नक्षल्याला अटक केली आहे, अशी माहिती पोलिस विभागाने दिली आहे.

अहेरी तालुक्यातील रस्ते अद्यापही दुरुस्तीच्या प्रतिक्षेत

आल्लापली,दि.01ः- अहेरी  तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या दामरंचा व परिसरात अनेक समस्या आहेत. या समस्यांची सोडवणूक प्रशासनाच्या वतीने अद्यापही झाली नाही. परिसरातील पूल, रस्ते व अन्य सोयीसुविधांचा अभाव आहे. येथील लोकांना मागील अनेक वर्षांपासून रस्त्याची प्रतीक्षा आहे. मात्र गावापर्यंत रस्ता निर्मिती करण्याकडे प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे.
कमलापूर- दामरंचा मार्गाचे अंतर २२ किमी असून सदर मार्गाची डागडूजी मागील वर्षी करण्यात आली आहे. या मार्गावर पाच ते सहा नाले येतात. मात्र या नाल्यांवर पुलांचे बांधकाम अद्यापही करण्यात आले नाही. त्यामुळे या परिसरातील भंगारामपेठा, रूपतकसा, चिटवेली, चिंतारेव, मांडरा, आसा, नैनगुडम यासह अनेक गावातील लोकांना पावसाळ्यात कमालीचा त्रास सहन करावा लागतो. या क्षेत्रात हजारो लोकवस्ती आहे. मात्र ये-जा करण्याकरिता पक्क्या रस्त्यांचा अभाव आहे. परिणामी दळणवळणाची साधने उपलब्ध होत नाही. एसटी महामंडळाची बसही येथे पोहोचत नाही. त्यामुळे आवागमनाची समस्या नेहमीच जाणवते. नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या भागात पक्के रस्ते तयार करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे या भागाचा विकासही झालेला नाही. वारंवार प्रशासनाकडे मागणी करूनही दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्येही तीव्र रोष आहे. यंदाच्या उन्हाळ्यात या भागातील रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. बाजारपेठ उपलब्ध नसल्याने लोकांना बाहेरगावी सायकल अथवा चालत जाऊन साहित्य खरेदी करावे लागते. या भागाचा विकास खुंटला आहे.

पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तंत्रज्ञान आत्मसात करावे- अंकुश शिंदे


आपले सरकार सुविधा केंद्राचे उदघाटन
गोंदिया,दि.३१ : नक्षलग्रस्त भागातील अधिकारी-कर्मचारी अत्यंत चांगल्या पध्दतीने काम करीत आहे. चांगले काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी वेगवर्धीत पदोन्नती योजना आहे. जनतेसाठी काम करीत असतांना पोलीस विभाग लोकाभिमुख करण्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे. असे आवाहन गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक अंकुश शिंदे यांनी केले.

३० डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे आपले सरकार नागरी सुविधा केंद्राचे उदघाटन श्री.शिंदे यांनी केले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, नागरी संरक्षण दलाचे महासमादेशक अरविंद देशमुख यांची उपस्थिती होती.
गोंदियासारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्यात तंत्रज्ञानाचा वापर करुन चांगली सेवा देण्याचा प्रयत्न पोलीस विभागाकडून करण्यात येत असल्याचे सांगून श्री.शिंदे म्हणाले, अशाप्रकारची सेवा देणारा गोंदिया हा पहिलाच जिल्हा आहे. पोलीसविषयक कायदयाचा वापर चांगल्याप्रकारे झाला पाहिजे. भविष्यात तंत्रज्ञान हे सर्वव्यापी होणार असल्यामुळे पोलीस विभागातील प्रत्येकाने त्याचा प्रभावी वापर करण्यास तयार व्हावे. त्यामुळे विकासाला गती मिळेल असे त्यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक प्रास्ताविकातून म्हणाले, या सुविधेमुळे नागरिकांना सेवा देणे सोईचे होणार आहे. नागरिकांच्या तक्रारी यापुढे ऑनलाईन तसेच मोबाईल ॲप्सच्या माध्यमातून स्विकारण्यात येणार आहे. तक्रारीची त्यांना पोच मिळून प्रकरणाची सद्यस्थिती काय आहे याबाबत सुध्दा माहिती मिळणार आहे. किओक्स केंद्राच्या माध्यमातून पोलीसविषयक सेवा गतीमान करण्यात येईल.
प्रारंभी मान्यवरांचे हस्ते आपले सरकार नागरी सुविधा केंद्राचे उदघाटन करण्यात आले. नागरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून विदेशी कलाकारांच्या सहभागास परवानगी देणे, कागदपत्रांचे साक्षांकन, ध्वनीक्षेपकाचा परवाना देणे, मनोरंजनाच्या कार्यक्रमांना ना-हरकत परवानगी देणे, वर्तणूक व चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र, विविध प्रकारचे ना-हरकत प्रमाणपत्र देणे, शस्त्र परवान्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देणे, परदेशात जाण्यासाठी पोलीस अनुमती प्रमाणपत्र देणे, नागरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून तक्रारदारास एफआयआर पुरविणे आदी सेवा या आपले सरकार नागरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पोलीस मुख्यालयाचे राखीव फौजदार सुनिल बांबडेकर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त श्री.शिंदे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरी संरक्षण दलाचे प्रशिक्षार्थी शिक्षक यावेळी उपस्थित होते. संचालन राधिका कोकाटे यांनी केले. उपस्थितांचे आभार दिपाली खन्ना यांनी मानले.

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – 2017 साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

मुंबई, दि.३१ : :  राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, सोशल मीडिया आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लिखाणासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी 2017 ते 31 डिसेंबर 2017 पर्यंतच्या कालावधीत प्रसिध्द झालेल्या लेखनाच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी 2018 असा आहे.
            स्पर्धकांनी जिल्हा माहिती कार्यालयाकडून, तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय (तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32) येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in किंवा  www.maharashtra.gov.inतसेच www.mahanews.gov.in येथेही उपलब्ध आहेत. 

छत्तीसगडमध्ये शरणागत 21 नक्षलींची नसबंदी उघडली

जगदलपूर(वृत्तसंस्था),दि.३१ :-छत्तीसगडमध्ये बस्तर पोलिसांसमोर शरणागती पत्करलेल्या नक्षलवाद्यांनी आपली नसबंदीची शस्त्रक्रिया पुन्हा उघडली. यासाठी “रिव्हर्स वॅसेक्टॉमी’ शस्त्रक्रिया करवून घेतली. यामुळे पाच नक्षलवाद्यांच्या घरात पुन्हा पाळणे हलले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांची नावे देता आलेली नाहीत. माता-पिता झालेल्या या माजी नक्षलवाद्यांची वये २२ ते २९ वर्षांच्या दरम्यानची आहेत. सर्व शस्त्रक्रिया सरकारी खर्चाने करण्यात आल्या.रिव्हर्स व्हॅसेक्टॉमी शस्त्रक्रिया करवून घेण्याच्या संदर्भात कांकेर व बीजापूर जिल्हा आघाडीवर आहे. दोन्ही जिल्ह्यात नुकतेच सहा-सहा नक्षलवाद्यांचे रिव्हर्स वॅसेक्टॉमी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. अशा प्रकारे, नारायणपूर येथे तीन शरणागत नक्षलवाद्यांनी नसबंदी उघडली. शिवाय, बस्तर, कोंडागाव, सुकमासह अन्य जिल्ह्यात सहा माजी नक्षलवाद्यांची नसबंदी उघडण्यात आली.
बस्तरचे पोलिस महानिरीक्षक विवेकानंद सिन्हा यांनी वृत्तसंस्थेला  सांगितले की, आतापर्यंत शरणागती पत्करलेल्या नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना घर-नौकरी आदी सोयी देण्यात येत होत्या. प्रथमच शरणागती पत्करलेले नक्षलवादी रिव्हर्स वॅसेक्टॉमी शस्त्रक्रियेनंतर माता-पिता झाले आहेत. बस्तर येथे काही वर्षांपूर्वी एक हजारांहून अधिक नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली आहे. यातील निम्म्याहून अधिक नक्षलवाद्यांनी सांगितले, आम्ही कौटुंबिक सुखाला पारखे झालेलो आहोत. हे सुख मिळावे म्हणूनच शरणागती पत्करत आहोत.सिन्हा म्हणाले, २००१ मध्ये मी पोलिस अधीक्षक होतो. तेव्हा शरणागत आलेल्या एका नक्षलवाद्याने मला सांगितले, नक्षलवाद्यांनी माझी नसबंदी केलेली होती. त्यामुळे मी खूप परेशान होतो. मला माझी लेकरेबाळे हवी आहेत. यासाठी शरणागती पत्करण्यास तयार झालो. त्यावेळी शरणागत येण्यासाठी काही धोरण आखलेले नव्हते. आम्ही सरकारकडे विनंती केली. तेव्हा आम्हाला विशेष परवानगी देण्यात आली.

कबड्डी स्पर्धेदरम्यान प्रेक्षक गॅलरी कोसळून 60 जखमी


चंद्रपूर ,दि.३१- जिल्ह्यातील मूल येथे नगराध्यक्ष कबड्डी चषक स्पर्धेच्या उद््घाटन समारंभात प्रेक्षक गॅलरी कोसळल्याने ६० विद्यार्थी जखमी झाले. काही विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी मूल तसेच चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शुक्रवारी रात्री मूल येथील क्रीडा संकुलात या स्पर्धेचा उद््घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी गावकरी आणि विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. प्रेक्षकांना बसण्याकरता लोखंडी बाल्कनी तयार करण्यात आली होती. या बाल्कनीमध्ये मोठया संख्येने दर्शक बसल्याने बाल्कनीचा तोल ढासळला आणि प्रेक्षकांसहित विद्यार्थी खाली कोसळले. या घटनेत ६० जण जखमी झाले असून १० ते १५ जणांना गंभीर दुखापत झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, जखमींवर मूल येथील रुग्णालय तसेच चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
याठिकाणी आयोजकांनी प्रेक्षकांना बसण्यासाठी लोखंडी गॅलरी तयार केली होती. गॅलरीवर क्षमतेपेक्षा जास्त प्रेक्षक बसल्याने लोखंडी गॅलरी तुटली. अचानकपणे झालेल्या या अपघाताने मोठा गोंधळ उडाला. यावेळी सुमारे ६० च्यावर नागरिक जखमी झाले. त्यात आठ ते दहा वर्षांच्या लहान मुलांचा देखील समावेश आहे. काही जखमींना मूल उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर गंभीर जखमींना चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. नगराध्यक्ष रत्नमाला भोयर यांनी रुग्णांची भेट घेतली. घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे मूलला पोहोचले आणि रुग्णालयातील रुग्णांची त्यांनी पाहणी केली.

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...