चंद्रपूर ,दि.३१- जिल्ह्यातील मूल येथे नगराध्यक्ष
कबड्डी चषक स्पर्धेच्या उद््घाटन समारंभात प्रेक्षक गॅलरी कोसळल्याने ६०
विद्यार्थी जखमी झाले. काही विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झाली असून
त्यांना उपचारासाठी मूल तसेच चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले
आहे.
शुक्रवारी रात्री मूल येथील क्रीडा संकुलात या स्पर्धेचा उद््घाटन
कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी गावकरी आणि
विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. प्रेक्षकांना बसण्याकरता लोखंडी
बाल्कनी तयार करण्यात आली होती. या बाल्कनीमध्ये मोठया संख्येने दर्शक
बसल्याने बाल्कनीचा तोल ढासळला आणि प्रेक्षकांसहित विद्यार्थी खाली कोसळले.
या घटनेत ६० जण जखमी झाले असून १० ते १५ जणांना गंभीर दुखापत झाल्याचे
पोलिसांनी सांगितले. दरम्यान, जखमींवर मूल येथील रुग्णालय तसेच चंद्रपूर
जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे
डॉक्टरांनी सांगितले.
याठिकाणी आयोजकांनी प्रेक्षकांना बसण्यासाठी लोखंडी गॅलरी तयार केली
होती. गॅलरीवर क्षमतेपेक्षा जास्त प्रेक्षक बसल्याने लोखंडी गॅलरी तुटली.
अचानकपणे झालेल्या या अपघाताने मोठा गोंधळ उडाला. यावेळी सुमारे ६० च्यावर
नागरिक जखमी झाले. त्यात आठ ते दहा वर्षांच्या लहान मुलांचा देखील समावेश
आहे. काही जखमींना मूल उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर गंभीर
जखमींना चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
नगराध्यक्ष रत्नमाला भोयर यांनी रुग्णांची भेट घेतली. घटनेची माहिती मिळताच
जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे मूलला पोहोचले आणि रुग्णालयातील
रुग्णांची त्यांनी पाहणी केली.
No comments:
Post a Comment