नागपूर,दि.23 : नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बनावट दारूच्या कारखान्यावर रविवारी सायंकाळी गुन्हे शाखेच्या पथकाने छापा घातला. या कारखान्यात देशी (संत्रा) दारूमध्ये वेगळे रसायन मिसळवून ती विदेशी दारूच्या बाटल्यात भरली जात होती. पोलिसांनी तेथून तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
बहादुराच्या टेकअप सिटीत वर्धा जिल्ह्यातील पराग पुरुषोत्तम पिंजरकर (वय ३२, रा. हिंगणघाट) आणि सोनल कोल्हटकर (रा. भद्रावती, जि. चंद्रपूर) हे दोघे मागच्या वर्षीपासून बनावट दारू तयार करण्याचा कारखाना चालवित होते. संत्रा दारूच्या बाटल्या रिकाम्या करून त्यात विशिष्ट रसायन मिसळायचे. त्याची चव आणि रंग बदलल्यानंतर ती वेगवेगळ्या बाटल्यात भरायचे. त्या बाटल्यांवर विदेशी कंपनीच्या मद्याचे लेबल चिपकवायचे आणि त्या बाटल्या बॉक्समध्ये भरून बाजारात विकायच्या, असा त्यांचा गोरखधंदा सुरू होता. ही माहिती कळाल्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ढेरे, सहायक निरीक्षक धर्मेंद्र आवारे, उपनिरीक्षक सुनील राऊत, हवलदार राजेश यादव, अरुण चांदणे, रवी शाहू, मंगेश लांडे, प्रितम ठाकूर, नावेद शेख आणि फराज खान यांनी रविवारी सायंकाळी या कारखान्यावर छापा मारला. यावेळी आरोपी सोनल कोल्हटकर पळून गेला. पराग पिंजरकरला अटक करून पोलिसांनी कारखान्यावर असलेली देशी दारू, बॉटल पॅकेजिंगचे साहित्य, मिनरल वॉटरचे बॉक्स आणि विविध कंपन्यांचे लेबल तसेच उपकरणे असा एकूण २ लाख, ९२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पिंजरकरला अटक करण्यात आली असून, फरार कोल्हटकरचा शोध घेतला जात आहे.
No comments:
Post a Comment