नागपूर,दि.23 – बनावट पासपोर्ट व व्हिसा तयार करून नोकरीसाठी इंग्लंडमध्ये पाठविलेले ५० युवक बेपत्ता झाले आहेत. पोलिसांनी मुलांना इंग्लंडमध्ये नेणाऱ्या दहा जोडप्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून, रात्री उशिरा सर्वांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामागे मानवी तस्करीची शक्यता वर्तविली जात आहे.
मुले बेपत्ता होत असल्याने ब्रिटिश उपउच्चायुक्त कार्यालयाने दखल घेतल्यानंतर नागपूर पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. याप्रकरणी टेका नाका, पाचपावली येथे राहणाऱ्या दहा शीख दांपत्यांवर गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिस सहआयुक्त शिवाजी बोडखे यांनी दिली. या दांपत्यांनी मागील दोन-तीन वर्षांत इंग्लंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून ५० तरुणांना हेरले. त्यांच्या पालकांनीही याला अनुमती दिल्यानंतर या तरुणांना विदेशात नेण्यासाठी सर्वांचे शाळांचे, जन्मतारखेचे बनावट दाखले; तसेच अन्य कागदपत्रे तयार केली. ही सर्व मुले आपलीच असल्याचे या दांपत्यांनी कागदोपत्री दाखवले असून, प्रत्येक युवकामागे दांपत्याला पाच लाख रुपये कमिशन मिळत असल्याचे तपासात समोर आले आहे.इंग्लंडला जाणारी मुले कधीच परत आली नाहीत. त्यांना नेणारे दांपत्य परत येत होते. या प्रकरणाची दखल सप्टेंबर २०१७ मध्ये मुंबईतील ब्रिटिश उच्चउपायुक्त कार्यालयाने घेतली. त्यांनी नागपूर पोलिस आयुक्तांशी पत्रव्यवहार करून याची चौकशी करण्यास सांगितले होते. चौकशीअंती खरा प्रकार उघड झाला.
No comments:
Post a Comment