गोंदिया,दि.१९ : विधानमंडळ सचिवालयाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीने १९ जानेवारी रोजी जिल्ह्यात दौरा करुन आदिवासी बांधवांचे वास्तव्य असलेल्या भागात करण्यात आलेल्या विकास कामांची पाहणी करुन आदिवासी लाभार्थ्यांशी संवाद साधला. समितीचे अध्यक्ष डॉ.अशोक उईके यांच्यासह समितीचे सदस्य आमदार सर्वश्री प्रभुदास भिलावेकर, पास्कल धनारे, पांढूरंग बरोरा, आनंद ठाकुर, श्रीकांत देशपांडे व जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी सालेकसा तालुक्यातील पिपरिया येथील कचारगड आदिवासी आश्रम शाळेची पाहणी केली.
पिपरिया गावाजवळच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून तयार करण्यात येत असलेल्या पांदन रस्त्याची पाहणी समितीच्या सदस्यांनी यावेळी केली. २७८ मजूर या पांदन रस्त्याच्या कामावर काम करीत होते. या मजुरांशी देखील समितीच्या सदस्यांनी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या कामाला १२ जानेवारी रोजी सुरुवात करण्यात आली असून २४ लक्ष रुपये या पांदन रस्त्याच्या कामावर खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे पिपरियाच्या मजूरांना या कामातून रोजगार उपलब्ध झाल्याचे सांगून जिल्ह्यात ६० हजार मजूर रोजगार हमी योजनेच्या कामावर असल्याची माहिती जिल्हाधिकारी काळे यांनी यावेळी दिली. पिपरिया येथील दिनेश टेकाम या व्यक्तीने सन २०१५-१६ च्या आदिवासी विकास विभागाच्या केंद्रवर्ती अर्थसहाय्य योजनेतून ५० हजार रुपये अर्थसहायातून सुरु करण्यात आलेल्या किराणा दुकानाला सुध्दा समितीच्या सदस्यांनी भेट देवून श्री.टेकाम यांच्याकडून व्यवसायाच्या प्रगतीबाबतची व त्यांच्या पाल्यांच्या शैक्षणिक प्रगतीची सुध्दा माहिती सदस्यांनी जाणून घेतली.गल्लाटोला येथील प्रदिप कोरेटी या लाभार्थ्याने शबरी घरकूल योजनेतून बांधलेल्या घरकुलाचे देखील समितीच्या सदस्यांनी पाहणी केली.
निंबा येथील आदिवासी लाभार्थी श्रीमती ललिता वडगाये यांनी ७५ टक्के अनुदानावर पशुसंवर्धन विभागाच्या बकरीपालन योजनेचा लाभ घेवून व्यवसायाला सुरुवात केल्याबद्दल त्याबाबतची माहिती समितीच्या सदस्यांनी श्रीमती वडगाये यांचेकडून जाणून घेतली. बकरीपालनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात आणखी वाढवावा असे समितीच्या सदस्यांनी त्यांना सूचविले. यावेळी अंगणवाडीला भेट देवून बालकांना देण्यात येणाऱ्या सेवेबाबतची माहिती अंगणवाडी सेविकेकडून जाणून घेतली. कोणत्याप्रकारचा आहार तसेच इतर कोणत्या सेवा बालकांना, मातांना तसेच गर्भवती महिलांना देण्यात येतात याबाबतची माहिती त्यांनी अंगणवाडी सेविकेकडून घेतली. अंगणवाडीतील बालकांना चांगला आहार व चांगले शिक्षण देण्यात यावे. त्यामुळे हे बालक भविष्यात चांगले नागरिक म्हणून पुढे येतील असे त्यांनी अंगणवाडी सेविकेला सूचना केली.
कोट्यवधी आदिवासी बांधवांचे श्रध्दास्थान असलेल्या कचारगडला भेट देवून समितीने धनेगाव येथे देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ प्रामुख्याने उपस्थित होते. कचारगड या तीर्थस्थळी करण्यात येत असलेल्या विकास कामांची व यात्रेदरम्यान उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या सुविधांबाबतची माहिती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जाणून घेतली. त्यानंतर वन पर्यटनस्थळ असलेल्या हाजराफॉलला भेट देवून पर्यटकांसाठी असलेल्या सुविधांची माहिती त्यांनी जाणून घेतली. तसेच वन विभागाच्या संयुक्त वन व्यवस्थापन समिती नवाटोलाच्या वतीने आदिवासी बेरोजगार युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे प्रभारी उपवनसंरक्षक श्री.शेंडे यांनी सांगितले. रोजगार उपलब्ध झालेल्या युवक-युवतींशी त्यांनी संवाद साधला. यावेळी दौऱ्यात आदिवासी प्रकल्प विभागाचे प्रकल्प अधिकारी श्री.चौधरी यांचेसह जिल्हा व तालुका यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment