Friday, 26 January 2018

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी - पालकमंत्री राजकुमार बडोले

68 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
गोंदिया,दि.26 : जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध घटकातील लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देवून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडून येत आहे. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
प्रजासत्ताक दिनाचा 68 वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते कारंजा येथील पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर 26 जानेवारी रोजी करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते. पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, आधुनिक भारताला मिळालेली सर्वात मोठी देणगी म्हणजे भारतीय राज्यघटना होय. या राज्यघटनेमुळेचे देशाला लोकशाही व्यवस्था मिळाली आहे. समाजातील उपेक्षित व वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी व समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्यघटनेत विविध तरतुदी करण्यात आल्या आहे.
पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळख असलेल्या आपल्या राज्याला अनेक संत समाजसुधारकांनी दिशा देण्याचे काम केल्याचे त्यांनी सांगितले. समाजातील वंचित व दुर्बल घटकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे सांगून श्री.बडोले म्हणाले, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना सुरु करण्यात आली आहे. मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, आदिवासी शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना सुरु करण्यात आली आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यात जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या स्थापन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
श्री.बडोले पुढे म्हणाले, जिल्ह्यात अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या विकासासाठी 4 कोटी 63 लक्ष रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून रमाई आवास योजनेतून यावर्षी 5 हजार घरकुले बांधण्यात येणार आहे, तर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 10360 घरे व शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत 467 घरकुले बांधण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 84272 शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केले. त्यापैकी 45 हजार 713 पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असून शेवटच्या पात्र शेतकऱ्याला कर्जमाफीचा लाभ मिळेपर्यंत ही योजना सुरुच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील पर्यटन व तीर्थस्थळाच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून श्री.बडोले म्हणाले, यावर्षी 1 कोटी 35 लक्ष रुपये तसेच जिल्ह्यातील क वर्ग पर्यटन व तीर्थस्थळाच्या विकासासाठी 4 कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटन व तीर्थस्थळाच्या माध्यमातून जास्तीत जास्त पर्यटक जिल्ह्यात येण्यास मदत होणार असल्यामुळे त्या माध्यमातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होण्यास हातभार लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जलक्रांती घडण्यास मदत होत असल्याचे सांगून श्री.बडोले म्हणाले,
यावर्षी जलयुक्तमध्ये 63 गावांची निवड करण्यात आली असून 434 कामे पूर्ण झाली आहे. प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानाअंतर्गत 567 उमेदवारांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. महिला सक्षमीकरणासाठी माविमच्या पुढाकारातून जिल्ह्यातील 62 हजार 486 महिला 5043 बचतगटाच्या माध्यमातून संघटीत झाल्या असून अनेक महिलांनी उद्योग व्यवसायाला सुरुवात केली आहे. रोहयोच्या माध्यमातून डिसेंबरअखेर 1 लाख 27 हजार कुटूंबांना रोजगार पुरविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 
यावेळी पालकमंत्र्यांनी ध्वजारोहणानंतर परेडचे निरीक्षण केले. परेड कमांडर म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते सहभागी होते. परेडमध्ये पुरुष पोलीस पथक, महिला पोलीस पथक, शीघ्र कृती दल, दंगा नियंत्रण पथक, जिल्हा वाहतूक शाखा, पुरुष व महिला होमगार्ड, विशेष व्याघ्र जंगल पथक, राष्ट्रीय छात्रसेना पथक, महाराष्ट्र छात्रसेना पथक, राज्य राखीव दल, स्काऊट-गाईड पथक, बँड पथक, बिट मार्शल पथक, निर्भया पथक, फिरते न्यायवैदयक पथक, श्वान पथक, बाँब शोधक पथकाचा समावेश होता. तसेच आपातकालीन वैद्यकीय सेवा, जलद बचाव दल, जि.प.आरोग्य विभाग चित्ररथ, सामाजिक वनीकरण विभाग चित्ररथ, जि.प.सर्व शिक्षा अभियान चित्ररथ, जलयुक्त शिवार चित्ररथ, अग्नीशमन दल, पब्लीक स्कूल वन बचाव, आदर्श कॉन्व्हेंट पथक, मिलिटरी स्कूल पथक यांनीही यामध्ये सहभाग घेतला.
कार्यक्रमाला आमदार गोपालदास अग्रवाल, माजी खासदार डॉ.खुशाल बोपचे, जि.प.उपाध्यक्ष अलताफ हमीद, जि.प.आरोग्य समिती सभापती पी.जी.कटरे, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. तसेच वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक रविकिरण गोवेकर, अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, अपर पोलीस अधीक्षक संदिप आटोळे, जि.प.अपर मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.गावडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अपुर्व पावडे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, प्रतिष्ठीत नागरिक, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, कर्मचारी, शालेय विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन श्रीमती मंजुश्री देशपांडे यांनी केले.
यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. यामध्ये गुरुनानक वरिष्ठ प्राथमिक शाळा गोंदियाच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियानावर, राजस्थान कन्या शाळेच्या विद्यार्थीनींनी ओडीसी लोकनृत्य व जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळा मुंडीपारच्या विद्यार्थीनींनी व्यक्तीमत्व विकासाच्या दृष्टीने शो ड्रील सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...