नांदेड,दि.08ः- जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शरद तायडे यांनी 2014 साली लाच घेतल्याचे सिध्द झाल्याप्रकरणी विषेश न्यायालयाने तीन वर्षे कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावल्याने खळबळ माजली आहे. नांदेडच्या जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागात कार्यरत असतांना कार्यकारी अभियंता शरद मंगा तायडे याने हदगाव तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय उमरी जं.येथील तेरावा वित्त आयोग बेसिंग ग्रँट-2013 टप्पा क्र.1 अंतर्गत प्र्रॉपर उमरी येथील सीसी रोडच्या केलेल्या कामाच्या संचिकेच्या बिलावर सही करण्याकरीता तक्रारदाराकडून रुपये 4 हजार रकमेची मागणी केली होती. तक्रारदाराने दि.30 सप्टेंबर 2014 रोजी या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक कर्यालयात रितसर फिर्याद नोंदविली होती.
यावर दि.1 ऑक्टोबर 2014 रोजी दुपारी 2 च्या सुमारास जि.प.मुख्य इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या वाहनतळावर उभ्या शासकीय कारमध्ये कार्यकारी अभियंता तायडे याने पंचासमक्ष लाचेची मागणी करून तडजोडीअंती तक्रारदाराकडून रुपये 3 हजारची रक्कम लाचेच्या रुपात स्वीकारली. या प्रकरणी लोकसेवक तायडे याने पदाचा दुरुपयोग करून भ्रष्ट मार्गाने स्वतःसाठी कायदेशीर परिश्रमिका शिवाय पारितोषिक म्हणून लाभ मिळविला व गुन्हेगारी स्वरुपाचे वर्तन केले. प्रकरणी वजिराबाद पोलिस ठाण्यात गुरनं.53/2014 कलम 7,13 (1)(ड) सह 13(2) भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 प्रमाणे गुन्हा दाखल करून तत्कालीन पोलिस उपअधिक्षक एम.जी.पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक दयानंद सरवदे यांनी तपास करून विशेष न्यायालयात खटला क्र.07/2015 अन्वये दोषारोप दाखल केले होते. सदर प्रकरणी सोमवार दि.8 जानेवारी रोजी आरोपी शरद तायडे यांनी गुन्हा केल्याचे न्यायाधिश एस.आर.जगताप यांचे विशेष न्यायालयासमोर सिध्द झाले. यावरुन न्यायालयाने कार्यकारी अभियंता शरद मंगा तायडे यास तीन वर्ष कारावास कलम 7च्या करीता रुपये दोन हजार व कलम 13च्या गुन्ह्या करीता रुपये तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात शासनातर्फे शाासकीय अभिवक्ता डी.जी.शिंदे यांनी युक्तिवाद केला तर पोलिस अधिक्षक संजय लाठकर, उपअधिक्षक संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्यावतीने पोलिस निरिक्षक कपिल शेळके, पोहेकॉ.सुधीर खोडवे, व पो.ना.मिलिंद बोडके यांनी कामकाज पाहिले.
No comments:
Post a Comment