Tuesday, 23 January 2018

शिवसेनेत अाज मोठे फेरबदल



मुंबई,दि.23(वृत्तसंस्था)-युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची शिवसेनेच्या नेतेपदी वर्णी लागण्याचा मार्ग मोकळा झाला अाहे. मंगळवारी शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीदिनी होणाऱ्या शिवसेना कार्यकारिणीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. तसेच शिवसेनेच्या स्थापनेपासून काम करणारे नेते मनोहर जोशी, सुधीर जोशी आणि लीलाधर डाके या ज्येष्ठ नेत्यांची मार्गदर्शकपदी निवड केली जाणार असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली.
निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना पाच वर्षांनी निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक होणार असून त्यात शिवसेना पक्षप्रमुखांसह अन्य नेत्यांच्या नेमणुका आयोगाच्या आदेशानुसार केल्या जाणार आहेत. पक्षप्रमुखपदी उद्धव ठाकरे यांचीच फेरनिवड होणार असून अन्य नेत्यांच्या निवडीबाबत बैठक मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाली. यात मनोहर जोशी, संजय राऊत, लीलाधर डाके, सुधीर जोशी, सुभाष देसाई, दिवाकर रावते, गजानन कीर्तिकर आदी उपस्थित होते.गेले काही दिवस आदित्य ठाकरे यांना शिवसेना नेतेपदी निवडण्याबाबत चर्चा सुरू होती. सोमवारी झालेल्या बैठकीत सर्वच नेत्यांनी त्यांची नेतेपदी निवड करण्यास मंजुरी दिल्याचे समजते. तसेच सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे आणि गटनेते अनिल परब यांनाही नेतेपद देण्याबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. खासदार संजय राऊत यांनी बैठकीबाबत माहिती देताना मंगळवारी होणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीबाबत चर्चा झाल्याचे सांगितले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...