Monday, 21 November 2016

माजी सैनिक पाल्यांना पंतप्रधान शिष्यवृत्ती



      गोंदिया - जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक/विधवा यांच्या पाल्यांना पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेचा सन 2016-17 या वर्षात लाभ देण्यासाठी 30 नोव्हेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविले आहे. ही मुदत पूर्वी 15 नोव्हेंबर होती. तरी जिल्ह्यातील माजी सैनिकांनी किंवा विधवांच्या पाल्यांनी पंतप्रधान शिष्यवृत्तीचे अर्ज www.ksb.gov.in या संकेतस्थळावर पूर्णपणे भरुन आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा सैनिक कल्याण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे 30 नोव्हेंबर पर्यंत सादर करावे. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन दिपक लिमसे यांनी केले आहे.

वाघाची कातडी तस्करीः मुख्य शिकाऱ्याला अटक


आतापर्यंत 22 आरोपी अटकेत


गोंदिया- देवरी-चिचगड मार्गावर वाघाच्या कातडीची अवैध तस्करी करताना 15 ऑक्टोबर रोजी 3 आरोपींना मोठ्या शिताफीने अटक करण्यात आली होती. भारतीय वनसेवेचे परिविक्षाधीन अधिकारी तथा सहायक वनसंरक्षक राहूल पाटील यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाला मुख्य शिकारी सुजान संतू कोरच्या (वय 40) रा.कुकडेल ता.कोरची जि.गडचिरोली याला पकडण्यात नुकतेच यश आले. त्यामुळे वाघाची अवैध शिकार करणाऱ्यांचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सुजान कोरच्या याने जानेवारी 2015 मध्ये कातडी जप्त केलेल्या वाघाची शिकार केल्याचे कबुल केले. सुजान आपल्या गाई-बैलांना जंगलात चारायला घेवून गेला असता त्याची गाय वाघाने मारली. ही घटना त्याच्या समक्ष घडल्याचे त्याने पुढील कटकारस्थान आखून वाघाने मारलेल्या गायीवर विष टाकले. मेलेल्या गाईचे मास खाण्यास वाघ येईल आणि मास खाल्ल्यानंतर तो मरेल. मारलेल्या गायीवर विष टाकल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी त्याने तिथे जावून बघितल्यानंतर काही अंतरावर त्याला वाघ मरुन पडलेला दिसला. त्यानंतर सुजानने त्याचा मामेभाऊ माणिक पुडो रा.बदबदा याला फोनवरुन घटनेची माहिती दिली व मेलेल्या वाघाचे कातडे काढण्यासाठी बोलाविले.
माणिक पुडो हा रामजी दुर्रा, महादेव कल्लो, साईनाथ कल्लो यांना सोबत घेवून रात्री साडेनऊ वाजता ते सुजान कोरच्याच्या घरी आले. सुजानचा गावातील मित्र सावळराम नुरुटी या सर्वांना घेवून सुजान जंगलात पोहोचला. विष प्रयोग करुन मारलेल्या वाघाचे कातडे त्यांनी काढले. कातडी काढल्यानंतर या सर्वांनी वाघाचे बाकीचे अवशेष जाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वाघाची कातडी घेवून माणिक पुडो हा बदबदा या गावी निघून गेला. या वाघाच्या कातडीच्या तस्करी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या शिवराम तुलावी व रामसाय मडावी यांच्याकडून माणिक पुडो हा सुध्दा या तस्करी प्रकरणातील आरोपी असल्याचे सांगितले.
12 नोव्हेंबरच्या पहाटे माणिक पुडो, साईनाथ कल्लो, महादेव कल्लो यांना पकडण्यासाठी वन विभाग गोंदियाच्या अधिकाऱ्यांनी गोंदिया व गडचिरोली पोलिसांना सोबत घेवून सापळा रचला. यात माणिक पुडो सापडला तर उर्वरित दोघ जण फरार होण्यात यशस्वी ठरले. माणिक पुडो कडून मिळालेल्या माहितीनुसार वाघाची शिकार सुजान कोरच्या याने केल्याचे सांगितले. त्या आधारावर 14 नोव्हेंबरच्या पहाटे कोरची तालुक्यातील कुकडेल येथून मुख्य शिकारी सुजान कोरच्या याला पकडण्यात पथकाला यश आले.
19 नोव्हेंबरला सुजान कोरच्याला पथकाने सोबत घेवून गडचिरोली जिल्ह्यातील सहवनक्षेत्र कोरची बीट दवडी समशेर पहाडीजवळ कंपार्टमेंट नंबर 491 राखीव वनाजवळचा परिसर गाठला. तेथे जळलेल्या अवस्थेत काही भागाचे अवशेष (हाडे) मिळाले. हे मिळालेले अवशेष पुढील कारवाईसाठी ताब्यात घेण्यात आले. चौकशी कारवाईत श्वान पथकाने वाघाचे हाडे शोधण्यास मोलाची मदत केली. वरील सहा आरोपींनी वाघाची शिकार करुन त्याची कातडी काढून तस्करी करण्याचा प्रयत्न केला.
        वन्यजीव अधिनियम 1972 च्या कलम 9, 39, 44, 49 (ब), 51, 51 (1) (सी) व 52 अन्वये 22 आरोपींना अटक करुन तुरुंगात टाकण्यात आले आहे. आरोपींकडून जप्त केलेली वाघाची कातडी विश्लेषणासाठी डेहराडून येथील वाईल्ड लाईफ इन्स्टीट्यूशन ऑफ इंडिया यांचेकडे पाठविण्यात आली आहे. तर हाडे सुध्दा परिक्षणासाठी पाठविण्यात येणार आहे. वाघाची शिकार केल्यानंतर वाघाची कातडी जवळपास दीड वर्ष मोठा ग्राहक मिळेल यासाठी फिरत होती. यामध्ये गडचिरोली येथील डॉ.यादव व डॉ.कोरेटी (चिचगड) यांनाही अटक केली असून 22 आरोपींमध्ये यांचा सुध्दा समावेश आहे.
    सदर कारवाई नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक रविकिरण गोवेकर व उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय वनसेवेचे परिविक्षाधीन अधिकारी तथा सहायक वनसंरक्षक राहूल पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आली. यामध्ये सहायक वनसंरक्षक श्री.बिसेन, उत्तर देवरीचे वनपरिक्षेत्राधिकारी निलेश भोगे, बेळगावचे वनपरिक्षेत्राधिकारी मनोज गढवे, वन्यजीव विभागाचे गोंदिया येथील वनपरिक्षेत्राधिकारी श्री.गव्हारे, वनरक्षक सर्वश्री एन.एस.पाथोडे, ओ.बी.चौरागडे, व्ही.डी.भेंडारकर, पोलीस हवालदार श्री.भालाधरे (गोंदिया), वाहन चालक श्री.सागर, डॉग व ट्रेनर श्री.नागपुरे, वनमजूर रमेश उईके यांच्यासह गोंदिया व गडचिरोली पोलिसांचे सहकार्य लाभले.                                                                                                   




युवा कोसरे कलार समाजाचा ओबीसी महामोर्च्याला पाठिंबा


img-20161120-wa0030गोंदिया,दि.21-गोंदिया जिल्हा युवा कोसरे कलार समाज संस्थेच्यावतीने राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने 8 डिसेंबर रोजी आयोजित ओबीसी महामोर्च्याला पाठिंबा जाहिर केला आहे.येथील शास्त्री वार्ड ओबीसी संघटनेच्यावतीने रविवारला आयोजित ओबीसी बांधवाच्या आमसभेत संस्थेच्यावतीने गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रसिध्दीप्रमुख खेमेंद्र कटरे,ओबीसी संघर्ष कृती समितीचे महासचिव मनोज मेंढे,शिशिर कटरे,उपाध्यक्ष कैलास भेलावे,भरत पाटील,शास्त्री वार्ड ओबीसी संघटनेचे अध्यक्ष खुशाल कटरे,सचिव बंशीधर शहारे,महेंद्र बिसेन,जितेश राणे यांच्याकडे पाठिब्यांचे पत्र युवा कोसरे कलार समाजाचे जिल्हाध्यक्ष तिर्थराज उके,जिल्हा सहसचिव उमेश सहारे,कोषाध्यक्ष दिनेश फरकुंडे,उपाध्यक्ष सतीश मेश्राम,संघटक राजेंद्र कावळे व गोंदिया शहर अध्यक्ष संतोष मेश्राम यांनी सोपविले.यावेळी शास्त्री वार्ड परिसरातील ओबीसी बंधु भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लबाडांना खावी लागणार ७ वर्षे तुरुंगाची हवा

नवी दिल्ली - जून्या ५०० व १ हजार रुपयांच्या नोटा दुसऱ्याच्या बँक खात्यात जमा करणारा आणि खातेदार या दोघांविरुद्ध नव्याने लागू झालेल्या बेनामी मालमत्ता व्यवहार प्रतिबंधक कायद्याचा बडगा उगारण्याचे प्राप्तिकर विभागाने ठरविले अाहे. यात भरणा केलेली रक्कम जप्त होण्याखेरीज असे लबाडीचे व्यवहार करणाऱ्या दोघांनाही सात वर्षांपर्यंतच्या कैदेची शिक्षा होऊ शकते, असा इशारा दिला आहे.
मोदी सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यापासून गेले १० दिवस बँकांच्या बाहेर रांगा लावणाऱ्या लोकांना, बँकाच बंद असल्याने रविवारी अडचण सोसून आराम करावा लागला. ज्यांना रोकड रकमेची नितांत गरज होती त्यांनी पैसे असलेली एटीएम शोधण्यासाठी वणवण केली; पण तरीही अनेकांच्या पदरी निराशा आली. नवा आठवडा चलन उपलब्धतेच्या दृष्टीने थोडा सुलभ जाईल, या आशेवर लोकांनी आठवडाभराचा त्रास विसरून राहिलेली इतर कामे उरकून घेतली.
एकाच खात्यात २.५ लाख रुपयांहून अधिक रक्कम भरण्याच्या व्यवहारांची माहिती बँका आणि पोस्टाकडून प्राप्तिकर खात्याला लगेच दिली जात आहे. अशा व्यवहारांची प्राप्तिकराच्या दृष्टीने छाननी करण्याखेरीज असे मोठे संशयास्पद व्यवहार बेनामी मालमत्ता कायद्याच्या रडारवरही घेण्यात येणार आहेत. प्राप्तिकर विभागातील सूत्रांनी सांगितले की, रद्द झालेल्या नोटांचा भरणा इतरांच्या खात्यात जमा झाल्याचे दिसल्यास हा नवा कायदा वापरला जाईल. यात पैसे भरणारा व ज्याच्या खात्यात रक्कम भरली तो खातेदार असे दोघेही आरोपी असतील व गुन्हा सिद्ध झाल्यास त्यांना सात वर्षांपर्यंत तुरुंगाची हवा खावी लागेल.
याखेरीज जमा केलेली रक्कम ‘बेनामी’ मालमत्ता म्हणून जप्त केली जाईल व तिच्या प्रचलित बाजारमूल्याच्या २५ टक्के दंडही आकारला जाईल, असे या सूत्रांनी स्पष्ट केले.

Sunday, 20 November 2016

नोटाबंदीमुळे जनता त्रस्त – शरद पवार यांची मोदींवर टीका

मुंबई, दि. 20 – चलनातून 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा बाद करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचे काही दिवसांपूर्वी स्वागत करणाऱे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज या निर्णयावर सडकून टीका केली आहे. मोदींच्या या निर्णयामुळे सामान्य जनता त्रस्त आहे. तर काळा पैसावाले मस्त मजेत आहेत. असे टीकास्त्र शरद पवार यांनी सोडले.
मुंबईतील घाटकोपर येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन सभेला संबोधित करताना शरद पवार यांनी   मुंबई महानगरपालिकेत सत्तापरिवर्तन करण्याचे आवाहन केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 500 आणि एक हजार रुपयाच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयावर पवार यांनी जोरदार ताशेरे ओढले. “आज राज्यामध्ये आणि देशामध्ये जे काही सुरू आहे, ते जर असेच सुरु राहिले, तर सामान्य माणसाचं जगणं कठीण होईल. मोदींच्या निर्णयामुळे सामान्य जनता त्रस्त आहे. तर काळापैसावाले मस्त आहेत,”असा 

देवरीत ओबीसींच्या महामोर्च्याच्या नियोजनाची बैठक

देवरी-  येत्या 8 डिसेंबर रोजी राज्याच्या विधानसभेवर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात महामोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी गोंदिया जिल्ह्यातील अर्जूनी मोरगाव येथून संबिधान दिनी निघणाऱ्या जनचेतना रॅलीचे 4 तारखेला तालुक्याच्या सीमेत आगमन होणार असल्याने या बाबीचे नियोजन करण्याच्या उद्देशाने तालुक्यातील ओबीसी कृती समितीची बैठक स्थानिक सरस्वती शिशू मंदीरात आयोजित करण्यात आली होती.
या सभेला अॅड. भूषण मस्करे, अॅड गणबोईर, सी के बिसेन राजकुमार शाहू जेटी रहांगडाले राजेश चांदेवार, ज्योतिबा धरमशहारे, सुरेश चन्ने, कृष्णा ब्राम्हणकर, योगेंद्र कटरे, पारस कटकवार आदी मान्यवर उपस्थित होते.

संविधानातील ३४0 कलमानुसार ओबीसींना हक्क, अधिकार व आरक्षणाची तरतुद आहे. मात्र, आजपर्यंतच्या एकाही सरकारने या ३४0 कलमाची अंमलबजावणी केली नाही. आता काही वर्षांपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या प्रयत्नाने ओबीसी समाज जागृत होत आहे. याची नोंदही शासनस्तरावर होत असून सत्ताधारी व लोकप्रतिनिधी विचार करीत आहेत. ओबीसींच्या हक्कासाठी ओबीसी महासंघ लढा देणार,असल्याचे मान्यवरांनी व्यक्त केले
ओबीसी समाजाची जनगणना जाहीर करण्यात यावी, केंद्र व राज्यात ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावे, ओबीसी संवर्गाला अँट्रासिटी कायदा लागू करण्यात यावा, संविधानातील कलमानुसार आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी सातत्याने मेळावे व बैठका घेऊन ओबीसींची जनजागृती सुरू आहे. याशिवाय ओबीसींना संघटीत करण्याचे कामही ओबीसी महासंघातर्फे होत आहे. शासनाने ओबीसींच्या आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, अशा भावनाही यावेळी मान्यवरांनी व्यक्त केल्या
महामोर्च्याचे आणि जनचेतना रॅलीचे आयोजनाची जबाबदारी म्हणून यावेळी काही नियुक्त्या सुद्धा करण्यात आल्या. राजकीय पक्ष तालुका समन्वयकपदी डॉ. जे टी रहांगडाले यांची निवड करण्यात आली. महामोर्चा समितीच्या अध्यक्षपदी छोटेलाल बिसेन यांची निवड करण्यात आली. कोशाध्यक्ष म्हणून ज्योतिबा धरमशहारे आणि राजकुमार शाहू यांची निवड करण्यात आली.
 तालुक्यातून मोठ्या संख्येने ओबीसी बांधव कसे सहभागी करून घेता येतील, यावर या सभेत चर्चा करण्यात आली. 

नव्या पुलासाठी वापरणार जुन्या पुलाचा मलबा

नागपूर दि.20: छत्रपती चौकातील उड्डाण पूल तोडला जात असला तरी याच उड्डाण पुलाच्या मलब्याचा वापर मेट्रो रेल्वेसाठी प्रस्तावित नवीन पुलाच्या बांधकामात होणार आहे. खापरी भागात मेट्रोचे कार्य सुरू आहे. त्यातील कॉलमच्या सभोवतालचा खड्डा भरण्यासाठी काँक्रीटमध्ये या मलब्याचा उपयोग केला जाणार आहे. जुन्या पुलाचे काँक्रीट मजबूत असल्याने त्याची उपयोगिता अजूनही कायम आहे.
पूल तोडण्याचे काम सुरू होऊन आता पाच दिवस झाले आहेत. या दरम्यान ७५ टक्के पूल भुईसपाट झाला आहे. शनिवारी साई मंदिर ते छत्रपती चौकापर्यंतची भिंत पाडण्यात आली. दुसऱ्या बाजूने ही भिंत पाडणे अजून बाकी आहे.
परंतु यातील माती काढण्यात आली आहे. या मातीचा उपयोगही नवीन पुलाच्या बांधकामात केला जाणार आहे. हा पूल पूर्णपणे तोडण्यासाठी १५ दिवसांचा अवधी मागण्यात आला आहे. परंतु पाच दिवसांमध्ये ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. मशीनचा वापर जास्त होत असल्याने काम वेगाने होत आहे. बहुसंख्य कर्मचारी लोखंड उचलणे व मलबा लोडिंगचे कार्य करीत आहेत.

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...