Monday 21 November 2016

वाघाची कातडी तस्करीः मुख्य शिकाऱ्याला अटक


आतापर्यंत 22 आरोपी अटकेत


गोंदिया- देवरी-चिचगड मार्गावर वाघाच्या कातडीची अवैध तस्करी करताना 15 ऑक्टोबर रोजी 3 आरोपींना मोठ्या शिताफीने अटक करण्यात आली होती. भारतीय वनसेवेचे परिविक्षाधीन अधिकारी तथा सहायक वनसंरक्षक राहूल पाटील यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाला मुख्य शिकारी सुजान संतू कोरच्या (वय 40) रा.कुकडेल ता.कोरची जि.गडचिरोली याला पकडण्यात नुकतेच यश आले. त्यामुळे वाघाची अवैध शिकार करणाऱ्यांचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सुजान कोरच्या याने जानेवारी 2015 मध्ये कातडी जप्त केलेल्या वाघाची शिकार केल्याचे कबुल केले. सुजान आपल्या गाई-बैलांना जंगलात चारायला घेवून गेला असता त्याची गाय वाघाने मारली. ही घटना त्याच्या समक्ष घडल्याचे त्याने पुढील कटकारस्थान आखून वाघाने मारलेल्या गायीवर विष टाकले. मेलेल्या गाईचे मास खाण्यास वाघ येईल आणि मास खाल्ल्यानंतर तो मरेल. मारलेल्या गायीवर विष टाकल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी त्याने तिथे जावून बघितल्यानंतर काही अंतरावर त्याला वाघ मरुन पडलेला दिसला. त्यानंतर सुजानने त्याचा मामेभाऊ माणिक पुडो रा.बदबदा याला फोनवरुन घटनेची माहिती दिली व मेलेल्या वाघाचे कातडे काढण्यासाठी बोलाविले.
माणिक पुडो हा रामजी दुर्रा, महादेव कल्लो, साईनाथ कल्लो यांना सोबत घेवून रात्री साडेनऊ वाजता ते सुजान कोरच्याच्या घरी आले. सुजानचा गावातील मित्र सावळराम नुरुटी या सर्वांना घेवून सुजान जंगलात पोहोचला. विष प्रयोग करुन मारलेल्या वाघाचे कातडे त्यांनी काढले. कातडी काढल्यानंतर या सर्वांनी वाघाचे बाकीचे अवशेष जाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वाघाची कातडी घेवून माणिक पुडो हा बदबदा या गावी निघून गेला. या वाघाच्या कातडीच्या तस्करी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या शिवराम तुलावी व रामसाय मडावी यांच्याकडून माणिक पुडो हा सुध्दा या तस्करी प्रकरणातील आरोपी असल्याचे सांगितले.
12 नोव्हेंबरच्या पहाटे माणिक पुडो, साईनाथ कल्लो, महादेव कल्लो यांना पकडण्यासाठी वन विभाग गोंदियाच्या अधिकाऱ्यांनी गोंदिया व गडचिरोली पोलिसांना सोबत घेवून सापळा रचला. यात माणिक पुडो सापडला तर उर्वरित दोघ जण फरार होण्यात यशस्वी ठरले. माणिक पुडो कडून मिळालेल्या माहितीनुसार वाघाची शिकार सुजान कोरच्या याने केल्याचे सांगितले. त्या आधारावर 14 नोव्हेंबरच्या पहाटे कोरची तालुक्यातील कुकडेल येथून मुख्य शिकारी सुजान कोरच्या याला पकडण्यात पथकाला यश आले.
19 नोव्हेंबरला सुजान कोरच्याला पथकाने सोबत घेवून गडचिरोली जिल्ह्यातील सहवनक्षेत्र कोरची बीट दवडी समशेर पहाडीजवळ कंपार्टमेंट नंबर 491 राखीव वनाजवळचा परिसर गाठला. तेथे जळलेल्या अवस्थेत काही भागाचे अवशेष (हाडे) मिळाले. हे मिळालेले अवशेष पुढील कारवाईसाठी ताब्यात घेण्यात आले. चौकशी कारवाईत श्वान पथकाने वाघाचे हाडे शोधण्यास मोलाची मदत केली. वरील सहा आरोपींनी वाघाची शिकार करुन त्याची कातडी काढून तस्करी करण्याचा प्रयत्न केला.
        वन्यजीव अधिनियम 1972 च्या कलम 9, 39, 44, 49 (ब), 51, 51 (1) (सी) व 52 अन्वये 22 आरोपींना अटक करुन तुरुंगात टाकण्यात आले आहे. आरोपींकडून जप्त केलेली वाघाची कातडी विश्लेषणासाठी डेहराडून येथील वाईल्ड लाईफ इन्स्टीट्यूशन ऑफ इंडिया यांचेकडे पाठविण्यात आली आहे. तर हाडे सुध्दा परिक्षणासाठी पाठविण्यात येणार आहे. वाघाची शिकार केल्यानंतर वाघाची कातडी जवळपास दीड वर्ष मोठा ग्राहक मिळेल यासाठी फिरत होती. यामध्ये गडचिरोली येथील डॉ.यादव व डॉ.कोरेटी (चिचगड) यांनाही अटक केली असून 22 आरोपींमध्ये यांचा सुध्दा समावेश आहे.
    सदर कारवाई नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक रविकिरण गोवेकर व उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय वनसेवेचे परिविक्षाधीन अधिकारी तथा सहायक वनसंरक्षक राहूल पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आली. यामध्ये सहायक वनसंरक्षक श्री.बिसेन, उत्तर देवरीचे वनपरिक्षेत्राधिकारी निलेश भोगे, बेळगावचे वनपरिक्षेत्राधिकारी मनोज गढवे, वन्यजीव विभागाचे गोंदिया येथील वनपरिक्षेत्राधिकारी श्री.गव्हारे, वनरक्षक सर्वश्री एन.एस.पाथोडे, ओ.बी.चौरागडे, व्ही.डी.भेंडारकर, पोलीस हवालदार श्री.भालाधरे (गोंदिया), वाहन चालक श्री.सागर, डॉग व ट्रेनर श्री.नागपुरे, वनमजूर रमेश उईके यांच्यासह गोंदिया व गडचिरोली पोलिसांचे सहकार्य लाभले.                                                                                                   




No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...