Thursday 17 November 2016

उद्धव ठाकरेंची समजूत काढण्याचे राजनाथ सिंहांचे प्रयत्न?

नवीदिल्ली- नोटाबंदीच्या निर्णयावरून सरकारविरोधात जाहीरपणे दंड थोपटणाऱ्या शिवसेनेशी भाजपकडून संवाद आला आहे. उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर नोटाबंदीविरोधात बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपती भवनावर काढण्यात आलेल्या मोर्चात शिवसेनेचे खासदार सहभागी झाले होते. या माध्यमातून शिवसेनेने भाजपविरोधातील आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती. याच पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केल्याचे वृत्त ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीकडून देण्यात आले आहे. यावेळी नोटाबंदीच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाल्याचे समजते. दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार, नोटाबंदीच्या निर्णयावरून सरकारवर टीकेची झोड उठली असताना मित्रपक्षही विरोधकांच्या गोटात सामील होऊ नयेत, यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. तसे झाल्यास हिवाळी अधिवेशनात भाजपची चांगलीच कोंडी होऊ शकते. त्यामुळेच भाजप नेतृत्त्वावर कायम नाराज असणाऱ्या उद्धव ठाकरे यांची राजनाथ सिंह यांच्याकरवी समजूत काढण्यात आली आहे. दरम्यान, या चर्चेचा अधिकृत तपशील अद्यापपर्यंत समजू शकलेला नाही. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या दुर्लक्षित वागणुकीमुळे शिवसेना सुरूवातीपासूनच नाराज आहे. केंद्र आणि राज्य मंत्रिमंडळातही सेनेला अपेक्षित वाटा मिळालेला नाही. त्यामुळे शिवसेना आणि भाजप यांच्यातील दुरावा सातत्याने वाढत असल्याचे चित्र आहे. याच कारणामुळे सेनेकडून वारंवार केंद्र आणि राज्य सरकारला लक्ष्य करण्यात येते. मात्र, राजनाथ सिंह यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर शिवसेनेचा पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारच्या निर्णयाला असणारा विरोध मवाळ होणार का, हे पाहणे औत्स्युकाचे ठरेल.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...