Tuesday 29 November 2016

भाजपचा विजय

मुंबई : भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या राज्यातील १४७ नगरपालिका आणि १७ नगर पंचायतींच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ५२ नगराध्यक्षपद आपल्या पदरात पाडून घेतले.  युती न करताही शिवसेनेने २५ नगराध्यक्ष निवडून आणून दुसरा क्रमांक पटकावला. दुसरीकडे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस १७ नगराध्यक्षांसह चौथ्या स्थानावर फेकली गेली. काँग्रेस २२ नगराध्यक्षांसह तिसऱ्या क्रमांकावर आली. स्थानिक आघाड्यांना, अपक्षांना आणि इतरांना एकूण ३० नगराध्यक्षपदे मिळाली.
 असे असले तरीही अनेक नगरपालिकांमध्ये नगराध्यक्ष एका पक्षाकडे आणि नगरपालिकेत बहुमत दुसऱ्या पक्षाचे अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अशा नगरपालिकांमध्ये संघर्ष आणि अस्थैर्य निर्माण होण्याची चिन्हे आहेत. नोटाबंदीच्या निर्णयाचा फटका भाजपाला बसेल हा होरा या निकालाने सपशेल खोटा ठरला. थेट नगराध्यक्षपदाचा निर्णयही भाजपाच्या पथ्यावर पडला. मराठा आरक्षणासह विविध मुद्दे भाजपा-शिवसेनेच्या विजयाआड येऊ शकले नाहीत. नगरपालिकांत भाजपाला सर्वाधिक फायदा तर राष्ट्रवादीला सर्वांत मोठा फटका बसला. या निवडणुकीने अनेक प्रस्थापितांना धक्के दिले. त्यात भाजपा, शिवसेनेचे मंत्री, काँग्रेस, राष्ट्रवादीचे बडे नेते यांचा समावेश आहे. दोन वर्षांपूर्वी विधानसभेच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकलेल्या भाजपा आणि दुसऱ्या क्रमांकावरील शिवसेनेने अनेक नगरपालिकांमध्ये मोठे उलटफेर करीत दिग्गजांना हादरे दिले.

राज्य निवडणूक आयोग ढेपाळला.
एकीकडे पंतप्रधान कॅशलेस व्यवहार करण्याचे आवाहन करत आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सगळे व्यवहार संगणकाच्या माध्यमातून होतील असे सांगत आहेत मात्र, राज्य निवडणूक आयोगाचा आणि ई व्यवहाराचा मेळ काही बसलेला नाही. राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीबद्दल संपूर्ण राज्यात कमालीची उत्सुकता असताना राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर मात्र कोणताही निकाल रात्री उशिरा पर्यंत मिळू शकला नाही. ‘मतदानाची आकडेवारी व निकाल’ अशी एक खिडकी आयोगाच्या संकेतस्थळावर आहे पण त्यावर गेले की ही साईट बंद आहे असा संदेश कायम येत होता.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...