Monday 28 November 2016

कॅशलेस व्यवहार करा; मोदींचे आवाहन

नवी दिल्ली : कॅशलेस व्यवहार करा. मोबाइलवर व्हॉट्सअ‍ॅप वापरतो तितकेच हेही सोपे आहे. डिजिटल अर्थव्यवस्था समजून घ्या. इंटरनेट बँकिंग शिकून घ्या. कोणतीही रोख रक्कम न बाळगता व्यवहार करायला शिका, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मधून भारतीयांना केले. नोटाबंदीच्या निर्णयानंतर निर्माण झालेली परिस्थिती सुरळीत होण्यासाठी ५० दिवस लागतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कॅशलेस व्यवहाराबाबत बोलताना मोदी म्हणाले की, तरुणांनी ही प्रक्रिया वृद्ध आणि अशिक्षितांना समजावून सांगावी. नोटाबंदीच्या निर्णयानंतर आपल्या पहिल्याच ‘मन की बात’ कार्यक्रमात ते म्हणाले की, आजही अनेक लोक असा विचार करीत आहेत की, भ्रष्टाचारातून मिळविलेला काळा पैसा व्यवहारात आणता येईल. दुर्दैवाने हे लोक या कामासाठी गरिबांचा उपयोग करीत आहेत आणि गरिबांच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी त्यांची दिशाभूल करीत आहेत, त्यांना प्रलोभने देत आहेत.
मोदी म्हणाले की, बेनामी व्यवहाराला आळा घालण्यासाठी एक कडक कायदा लागू करण्यात येत आहे. त्यामुळे असे व्यवहार करणे अवघड होऊन जाईल. मी अशा लोकांना हे विचारू इच्छितो की, सुधारणा करणार आहात की नाही? कायद्याचे पालन करायचे की नाही हे आता तुमच्या हातात आहे. पण, एक लक्षात ठेवा गरिबांच्या आयुष्याशी खेळ करू नका. असे कोणतेच काम करू नका जेणेकरून चौकशी होईल तेव्हा गरिबांचे नाव पुढे येईल आणि त्यामुळे ते त्रस्त होतील.
भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांविरुद्धच्या या लढाईत नागरिकांनी जे सहकार्य केले आहे त्याबद्दल मोदी यांनी जनतेचे आभार मानले. नोटाबंदीच्या या निर्णयाविरुद्ध जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे. भ्रष्टाचाराविरुद्धच्या या लढाईत युवकांनी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...