Monday 28 November 2016

सातवी ते दहावीचा अभ्यासक्रम बदलणार

यवतमाळ : इयत्ता सातवी ते दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमामध्ये बदल करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. या अभ्यासक्रमाचा मसुदा तयार करण्यात आला असून, त्यावर शासनाने नागरिक तसेच शिक्षणतज्ज्ञांकडून ३० नोव्हेंबरपर्यंत सूचना मागविल्या आहेत.
प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरील शिक्षणात एकसूत्रता असावी, यासाठी हा बदल केला जात असल्याचे शासनाने म्हटले आहे. सध्यातरी राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचा अभ्यासक्रम स्वतंत्रपणे तयार करण्यात येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययनात सलगता राहात नाही. परिणामी, दोन्ही स्तरावरील अभ्यासक्रमांचा एकत्रित विचार करण्याची गरज लक्षात घेऊन नव्या अभ्यासक्रमाचा मसुदा तयार करण्यात आला आहे.
प्रत्येक विषयाची इयत्तावार चढत्या श्रेणीत सलगपणे मांडणी, माहिती मिळविण्यापेक्षा स्वयंअध्ययनावर भर, शिक्षणाचे दैनंदिन व्यवहारात कृतिशील उपयोजन, उद्योग-व्यवसायासाठी आवश्यक कौशल्याची पायाभरणी, नवनिर्मिती आणि सर्जनशीलतेचा विकास, भारतीयत्वाचा सार्थ अभिमान, विवेकनिष्ठ दृष्टिकोनाची जोपासना आदी क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्याच्या दृष्टीने हा मसुदा तयार करण्यात आला आहे.
ई-बालभारती डॉट इन या संकेतस्थळावर नागरिकांना, शिक्षणतज्ज्ञांना आपल्या सूचना ३० नोव्हेंबरपर्यंत नोंदविता येणार आहेत. त्यानंतर मसुद्याला अंतिम स्वरूप देऊन पुढील सत्रात तो लागू केला जाण्याची शक्यता आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, सामान्य विज्ञान, इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल अशा जवळपास सर्वच विषयांचा अभ्यासक्रम बदलण्यात येणार आहे. यापैकी काही विषयांचा अभ्यासक्रम पूर्णपणे तर काही अशंत: बदलणार आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आणि पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने हा मसुदा नागरिकांच्या अवलोकनासाठी जाहीर केला आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...