Tuesday 29 November 2016

आई-वडिलांच्या घरावर आता मुलाचा हक्क नाही- न्यायालय

नवी दिल्ली, दि. 29 - आई-वडिलांच्या नावे असलेल्या घरावर आता मुलाचा कोणताही अधिकार नाही, असा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयानं दिला आहे. आई-वडिलांनी मुलाला राहण्यासाठी दिलेल्या घरात मुलगा केवळ दयेवरच राहू शकतो. मग तो विवाहित असो वा अविवाहित, असंही न्यायालयानं सुनावणीदरम्यान म्हटलं आहे.  
 
आई-वडिलांनी संबंध चांगले असताना मुलाला घरात राहण्यास दिले म्हणजे मुलगा आयुष्यभर त्यांच्यावर ओझं बनून राहू शकत नाही. आई-वडिलांनी स्वतः कमावून घर घेतलं असल्यानं अविवाहित किंवा विवाहित मुलाचा घरावर कायद्यानं हक्क नाही. त्यामुळे तो घरावर हक्क दाखवू शकत नाही, असंही न्यायमूर्ती प्रतिभा रानी सुनावणीत म्हणाल्या आहेत. दिल्ली उच्च न्यायालयात एका दाम्पत्यानं आई-वडिलांच्या घरांवर हक्क सांगण्यासाठी याचिका दाखल केली होती. 
 
दरम्यान, याचिकेवर सुनावणी देत असताना न्यायालयानं मुलाचा आईवडिलांच्या घरावर कोणताही हक्क नसल्याचा निर्णय देत ती याचिका फेटाळून लावली आहे. आई-वडिलांनी कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयानुसार मुलगा आणि सुनेला घर खाली करण्यास सांगितलं होतं. मात्र कनिष्ठ न्यायालयानं दिलेल्या निर्णयाला या दाम्पत्यानं दिल्ली उच्च न्यायालयात याचिकेद्वारे आव्हान दिलं होतं. अखेर दिल्ली उच्च न्यायालयानं मुलगा आणि सुनेला फटकारत कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं आहे.  

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...