Tuesday 29 November 2016

हिंदू मुलगी मुस्लिम प्रियकरासोबत राहू शकणार 'लिव्ह इन'मध्ये

अहमदाबाद, दि. 29 - गुजरात उच्च न्यायालयानं लिव्ह इन रिलेशनशिपसंदर्भात आज ऐतिहासिक असा निर्णय दिला आहे. एका 19 वर्षीय हिंदू मुलीला 20 वर्षीय मुस्लिम प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्यासाठी न्यायालयानं परवानगी दिली आहे. या दोघांचं शाळेपासून एकमेकांवर प्रेम आहे. मात्र वयाच्या कारणास्तव दोघांना लग्न करता येत नव्हतं. 
मुलगी बनासकाठा जिल्ह्यातील धनेडा गावात राहायला आहे. न्यायमूर्ती अकील कुरेशी आणि न्यायमूर्ती बीरेन वैष्णव यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. "आमचा समाज लग्न आणि त्याच्या पावित्र्यावर फारच दबाव टाकत असतो. लिव्ह इन रिलेशनशिपची जास्त प्रकरणं ही मेट्रो शहरांतूनच येतात. दरम्यान कायद्यानं प्रेम करणा-या व्यक्तींना रोखता येणार नाही,"असं न्यायमूर्तींनी सुनावणीदरम्यान सांगितलं.
विशेष म्हणजे मुलगा आणि मुलगी एकाच शाळेत अभ्यासाचे धडे गिरवत होते. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळून आले. दोघांमधून कोणीही स्वतःचा धर्म बदलण्यासाठी तयार नव्हते. मुलगी 18 वर्षांपेक्षा जास्त वयाची असली तरी मुलगा 21 वर्षांचा नाही. तरीही त्या दोघांनी जुलैमध्ये मैत्री करार केला. मुलीचे नातेवाईक जोरजबरदस्तीनं मुलीला घेऊन गेले. मात्र त्यानंतर प्रियकर मुलानं कोर्टाचा दरवाजा ठोठावला. त्यानं कोर्टात सांगितलं की, माझ्या प्रेयसीला तिच्या इच्छेविरुद्ध नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. त्यानंतर पोलिसांनी त्या मुलीला कोर्टात हजर केले. त्यावेळी मुलीनं आई-वडिलांसोबत न राहता मी प्रियकरासोबत लग्न करू इच्छिते, असं सांगितलं. त्यामुळे स्पेशल मॅरेज अॅक्टअंतर्गत त्यांचं रजिस्टर पद्धतीनं लग्न लावून देण्याचं कोर्टानं सुचवलं असून, न्यायालयानं एफिडेव्हिट दाखल करून घेतलं आहे. त्या एफिडेव्हिटमध्ये मुलगा 21 वर्षांच्या झाल्यानंतर तो लग्न करू शकतो, असं नमूद केलं आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...