Friday 18 November 2016

नागपूर शहरात दोन नवीन पोलिस ठाणे मंजूर

नागपूरातील  पार्डी आणि वाठोडा येथे होणार नवीन पोलिस ठाणे

मुंबई,18 :  नागपूर शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील नंदनवन आणि कळमना या दोन पोलिस ठाण्यांचे विभाजन करुन अनुक्रमे वाठोडा आणि पार्डी अशा दोन नवीन पोलिस ठाण्यांच्या निर्मितीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे नागपूर शहरातील पोलिस ठाण्यांची संख्या आता 31 झाली आहे.
 नागपूर शहरालगतच्या ग्रामीण भागातील 35 गावे शहर आयुक्तालयाच्या हद्दीत समाविष्ट झाल्याने कळमना पोलिस ठाण्याची कक्षा
लक्षणीय वाढली आहे. या ठाण्याच्या कक्षेत सुमारे तीन लाखांहून अधिक लोकसंख्या आहे. त्यामुळे पोलिसांचे काम कार्यक्षम व प्रभावी करण्याच्या हेतूने कळमना पोलिस ठाण्याचे विभाजन करुन पार्डी पोलीस ठाण्याच्या निर्मितीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.  नवीन पार्डी पोलिस ठाण्याच्या कक्षेत 21 चौ.कि.मी.चे क्षेत्र समाविष्ट असून एक लाख 30 हजाराहून अधिक लोकसंख्या आहे.
कापसी बुद्रूक, कापसी खुर्द, सोनबा नगर, पार्डी पोलीस चौकी, भांडेवाडी वस्ती, भरतवाडा, पुनापूर जुनीवस्ती आदी प्रमुख भाग या पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणार आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा आणि हैदराबाद जबलपूर महामार्ग याच पोलिस ठाण्याच्या हद्दीतून जात आहे. पार्डी पोलीस ठाण्यासाठी दोन पोलिस निरीक्षक, 10 पोलिस उपनिरीक्षक, 18 सहायक पोलिस उपनिरीक्षक आदींसह हवालदार आणि शिपायांच्या एकूण 237 पदांना मान्यता देण्यात आली आहे.
 नागपूर शहरातील नंदनवन पोलिस ठाणे हे 2006 मध्ये सक्करदरा पोलिस ठाण्याचे विभाजन करुन निर्माण करण्यात आले होते. त्यानंतर गेल्या 10 वर्षात नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भाग वाढत राहिला. त्यामुळे या ठाण्याचे विभाजन करुन वाठोडा हे नवीन पोलिस ठाणे स्थापन करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. नवीन वाठोडा पोलिस ठाण्यात 24 चौ.कि.मी. क्षेत्र समाविष्ट राहणार असून या भागाची लोकसंख्या सव्वा लाखाहून अधिक आहे. बीडगांव, तरोडी खुर्द, तरोडी बुद्रूक, पांढुर्णा, खरबी, मध्य रिंगरोडपासूनचा शहरी भाग या ठाण्याच्या कक्षेत येणार आहे. नवीन ठाण्यासाठी दोन पोलिस निरीक्षक, 5 सहायक पोलिस उपनिरीक्षक, 14 पोलिस उप निरीक्षक (त्यात चार महिला पोलिस उप निरीक्षक) यांच्यासह हवालदार आणि शिपाई मिळून एकूण 104 पदांना मान्यता देण्यात आली आहे. या पोलिस ठाण्यांच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या आवश्यक खर्चास मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्यता दिली आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...