Monday 28 November 2016

ओबीसी चळवळीचे मित्र व शत्रू ओळखा

नागपूर दि.२८ : ओबीसी चळवळीचे मित्र कोण आणि शत्रू कोण, हे आधी ओळखण्याची गरज आहे. जो चळवळीला पाठिंबा देतो तो मित्र आणि जो विरोध करतो तो शत्रू ही साधी बाब आपल्याला ओळखता आली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुशिलाताई मोराळे यांनी येथे केले.
राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख सभागृह धनवटे नॅशनल कॉलेज काँग्रेसनगर येथे रविवारी एक दिवसीय महिला महाअधिवेशन आयोजित करण्यात आले होते. अधिवेशनाच्या उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. वृंदा ठाकरे या संमेलनाध्यक्ष होत्या. ज्येष्ठ विचारवंत सुषमा अंधारे, अँड. वैशाली डोळस, शरयू तायवाडे, धम्मसंगीनी, डॉ. प्रभा वासाडे, सुप्रिया बावनकुळे, प्रा. जयश्री खनके, जयश्री शेळके, कुमुद गुडधे, शैल जैमिनी, प्रतिभा जीवतोडे, संध्या सराटकर, रेखा बारहाते, सुनीता जिचकार, नंदाताई फुकट, कांचन गुडधे उपस्थित होत्या. यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संयोजक प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे अध्यक्षस्थानी होते. मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर, माजी आमदार खुशाल बोपचे, सेवक वाघाये, ईश्‍वर बाळबुधे प्रामुख्याने व्यासपीठावर होते.
मोराळे म्हणाल्या, श्रद्धा पाळा परंतु त्याचे अंधश्रद्धेत रूपांतर होऊ देऊ नका. आमच्या श्रद्धेचीही चोरी करण्याचे काम भाजपाने केले आहे, ही बाब समून घ्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसींसाठी खूप प्रयत्न केले. परंतु तेव्हाचे आपले ओबीसी नेते एवढे करंटे होते की त्यांना आपण मागास म्हणून घेण्यास कमीपणा वाटत होता. त्याचे परिणाम १९९0 पर्यंत ओबीसीला भोगावे लागले. बाबासाहेबांच्या लेकरांचे (अनुयायांचे) आपल्यावर उपकार आहेत. दलित हे ओबीसी चळवळीचे भागीदार आहेत, हे समजून घ्या. त्यांना साथ द्या. ज्या ओबीसी नेत्यांनी समाजासाठी आवाज उचलला त्यांना बदनाम करण्याचे षङ्यंत्र रचण्यात आले, ही बाबसुद्धा आपण समजून घेतली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
व्ही.पी. सिंग आणि कांशीराम यांच्यामुळेच मंडल आयोग लागू झाला. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरानंतर व्ही.पी. सिंग व कांशीराम यांचे मोठे उपकार आहेत. मंडल आयोग लागू करताच भाजपने त्यांचा पाठिंबा काढून घेतला होता. हा इतिहास कधीही ओबीसी समाजाने विसरता कामा नये, असेही त्या म्हणाल्या.
वंृदा ठाकरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात वर्णव्यवस्थेचा इतिहास विशद केला. भारतात अनेक पुढारी झाले, परंतु महिलांचा कैवारी एकच तो म्हणजे केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर होत. बाबसाहेबांची चळवळ ओबीसी समजू शकले नाही, त्यामुळे स्वातंत्र्याची ७0 वर्षे ही ओबीसींसाठी पारतंत्र्याचीच राहिली. ओबीसी महिलांनी कर्मकांडाच्या मागे लागू नये, असे आवाहनही त्यांनी केले. प्रतिभा जीवतोडे यांनीही आपले विचार व्यक्त केले. ओबीसी महिला महासंघाच्या अध्यक्ष सुषमा भड यांनी प्रास्ताविक केले. अरुणा भोंडे यांनी संचालन केले. समीक्षा गणेशे यांनी आभार मानले.
भारतीय व्यवस्थेमध्ये पूर्वीपासूनच महिलांसोबत भेदभाव केला जातो. आजही तो सुरू आहे. त्यामुळे महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी कुणी येईल, असे समजू नका. आपल्या प्रश्नासाठी आपल्यालाच लढावे लागेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अँड. वैशाली डोळस यांनी केले. भारतीय संविधानात अधिकार आहेत. परंतु त्याची अंमलबजावणीच होत नाही, ही खरी शोकांतिका असल्याचेही त्या म्हणाल्या. भारतीय संविधान, मंडल आयोग व ओबीसींचे आरक्षण या विषयावरील परिसंवादात त्या बोलत होत्या. यावेळी संध्या सराटकर, नंदाताई फुकट यांनीही आपले विचार मांडले. वंदना वनकर यांनी संचालन केले. अंजरी बारहाते यांनी आभार मानले.
यानंतर ओबीसी महिलांची दशा, दिशा व सक्षमीकरण या विषयावरील परिसंवादानंतर समारोप करण्यात आला. जयश्री शेळके व जयश्री खनके यांनी आपले विचार मांडले.
नागपूर : शरद पवार यांच्यापासून तर विखे पाटलांपर्यंत आणि उदयनराजेपासून तर चव्हाणांपर्यंत दिग्गज मराठे नेते महाराष्ट्रात आहेत. कित्येक वर्षे यांचीच सत्ता होती. असे असतानाही त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी का लावला नाही.अशी टीका ज्येष्ठ विचारवंत सुषमा अंधारे यांनी यावेळी केली.
राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे आयोजित महिला महाअधिवेशनात परिसंवादामध्ये त्या बोलत होत्या. ओबीसी महिला व अंधश्रद्धा या विषयावरील या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रभाताई वासाडे होत्या. तर धम्मसंगिन या वक्त्या होत्या.
सुषमा अंधारे म्हणाल्या, मराठा आरक्षणाची मागणी नवीन नाही. अनेक वर्षांपासून ती सुरू आहे. परंतु मराठा आरक्षणाची मागणी करतांना अँट्रॉसिटीचा मुद्दा आलाच कसा?. मराठा आरक्षणाला आंबेडकरी समाजाचा कधीच विरोध नव्हता. आम्ही आजही मराठा आरक्षणासाठी लढण्यास सज्ज आहोत. परंतु अगोदर प्रस्थापित मराठे व विस्थापित मराठे अशी विभागणी होणे गरजेचे आहे. विस्थापित मराठय़ांच्या बाजूने आंबेडकरी समाज नेहमीच उभा राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.व्ही.पी. सिंग यांनी मंडल आयोग लागू केल तेव्हा मंडल आयोगाला विरोध करण्यासाठी तीन आघाड्या होत्या. सर्वात पुढे भाजपचे लालकृष्ण अडवाणी होते. त्यांनी मंडल विरुद्ध कमंडल यात्रा काढली. दुसरे अरविंद केजरीवाल होते. त्यांनी युथ फॉर इक्वॅलिटी ही मोहीम चालवली, आणि काँग्रेसनेही छुपी आघाडी चालवली, ही बाब समजून घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. धम्मसंगिनी यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले. संचालन डॉ. रेखा बारहाते यांनी केले. अनिता ठेंगरे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...