Tuesday 15 November 2016

मोदींना पवार चालतात, मग सेनेला ममता बॅनर्जी का नाही? : उद्धव ठाकरे

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, दि. 15 - नोटबंदीमुळे सर्वसामान्यांच्या त्रासाला पारावार उरला नसतानाच आता या निर्णयाविरोधात शिवसेनेनंही विरोधी पक्षांशी हातमिळवणी केली आहे. विरोधी पक्षांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष, आरजेडी, जेडीयू आणि अन्य पक्षांसोबत आता शिवसेनाही या निर्णयाचा विरोध करण्यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींची भेट घेणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींना जर शरद पवार चालू शकतात, तर मग शिवसेनेला ममता बॅनर्जी का नाही? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.नोटबंदीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदारांची ‘मातोश्री’वर बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.
“आम्ही मोदींच्या विरोधात नाही, मात्र हा जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसोबत राष्ट्रपतींकडे जायला हरकत काय? आम्ही मोदींच्या विरोधात नाही तर जनतेच्या हितासाठी ममतांसोबत जाऊ शकतो”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
जिल्हा बँकेवरची बंदी अन्यायकारक आहे. सर्वसामान्य शेतकऱ्याचा पैसा जिल्हा बँकेत आहे. शेकाऱ्यांची अडवणूक कशासाठी? जिल्हा बँकेवरची बंदी उठवण्यासाठी उद्या पंतप्रधानांना निवेदन द्या, असे आदेश उद्धव ठाकरेंनी शिवसेना खासदारांना दिले.
बुधवारी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षांचे100 खासदार नोटबंदी निर्णयाविरोधात संसदेपासून राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढणार आहेत. त्याप्रमाणेच विरोधी पक्षांचे नेते बुधवारी राष्ट्रपतींची भेट घेऊन 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटांवर घालण्यात आलेली बंदी मागे घेण्याची मागणी करणार आहेत. मात्र या सगळ्या प्रकारात विरोधकांना सत्ताधारी शिवसेनेचीही साथ मिळणार आहे. शिवसेनेनं तसं आश्वासन दिल्याची माहिती ममता बॅनर्जी यांनी दिली आहे.
दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही सरकारच्या निर्णयाचा जोरदार विरोध केला आहे. नोटबंदीच्या निर्णयाविरोधात सगळ्या भाजपाविरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी शिवसेनेलाही सोबत घेण्याचा प्रयत्न केला आहे. ममता बॅनर्जींनी सीताराम येचुरी यांना फोन करून त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आता शिवसेनाही आमच्यासोबत राष्ट्रपतींना भेटणार असल्याचं सांगून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...