Wednesday 30 November 2016

जन धन खात्यातून महिन्याला 10 हजारच काढता येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बंद झाल्यानंतर जन धन बॅंक खात्यांवर मोठ्या प्रमाणात पैसे जमा झाल्याने आता रिझर्व्ह बँकेने महिन्याला फक्त 10 हजार रुपयेच काढता येण्याची मर्यादा आणली आहे.
नोटाबंदीचा निर्णय घेतल्यापासून जन धन खात्यांवर सुमारे 72, 834 कोटी रुपयांची रक्कम जमा झालेली आहे. मोठ्या प्रमाणात रक्कम जमा झाल्याने सरकारने आता या खात्यांतून पैसे काढण्यावर मर्यादा आणली आहे. आरबीआयने आज (बुधवार) प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे, की केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेल्या खातेधारकांनाच महिन्याला 10 हजार रुपयांची रक्कम काढता येणार आहे. तर, केवायसीची प्रक्रिया पूर्ण न केलेल्या खातेधारकांनी पाच हजार रुपये महिन्याला काढता येतील. गरीब शेतकऱ्यांच्या खात्यांवर कर चुकविणाऱ्यांनी पैसे भरू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
जन धन खात्यांमध्ये पैसे जमा करण्यात पश्‍चिम बंगालचा प्रथम क्रमाक असून, कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर आहे. या खात्यांवर प्रत्येकी 50 हजार रुपये भरण्याची मर्यादा आहे. शून्य शिलकीच्या या बॅंक खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जुन्या नोटांचा भरणा झाला आहे. जन धन खात्यावर सध्या 72 हजार 834 कोटी रुपये जमा आहेत. या खात्यांचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी सरकारकडे आल्या आहेत. यातील संशयास्पद व्यवहारांवर सरकार लक्ष ठेवून आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 ऑगस्ट 2014 रोजी जन धन योजनेची सुरवात केली होती. या योजनेंतर्गत देशभरात बॅंक खाते नसलेल्या प्रत्येकाला खाते उघडून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...