Wednesday, 21 December 2016

पंतप्रधानांच्या व्यासपीठावर उद्धव ठाकरे

मुंबई - भाजप आणि शिवसेनेतील मानापमान नाट्य टाळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यासपीठावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना स्थान मिळण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.
फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यानंतर गेल्या दोन वर्षांत शिवसेना-भाजपमध्ये अनेकदा खटके उडाले आहेत. सत्तेत असूनही शिवसेना सातत्याने भाजपला टोमणे मारत असल्याने भाजपनेही शिवसेनेला अपमानस्पद वागणूक देण्याची संधी सोडली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळी मुंबई दौऱ्यावर आले होते तेव्हा उद्धव ठाकरे यांना कार्यक्रमाला निमंत्रण न देता शिवसेनेला भाजपने डिवचले होते. आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी (ता.24) करण्यात येणार आहे. भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर गिरगाव चौपाटीवर जाहीर सभा होणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीचे रणशिंग याच कार्यक्रमांच्या माध्यमातून फुंकण्यात येणार असल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
या कार्यक्रमावर पक्षाचीच छाप असेल याची खबरदारी भाजपने घेतली आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रित करण्यात येईल किंवा नाही, याची चर्चा सुरू आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा आहे. या संदर्भात त्यांनी अनेकदा प्रतिक्रियादेखील दिली आहे. शिवस्मारकाच्या भूमिपूजनासारख्या कार्यक्रमाला ठाकरे यांना डावलणे योग्य नसल्याची मुख्यमंत्र्यांची भूमिका असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ठाकरे यांचा यथोचित गौरव करण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले. या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधानांच्या कार्यक्रमात ठाकरे यांना योग्य स्थान देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.

BERARTIMES_ DEC.2016, 21-27





Tuesday, 20 December 2016

टेनेसिन 117 वे मूलद्रव्य : IUPAC चे शिक्कामोर्तब

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) : सहा वर्षांपूर्वी शोध लागलेल्या आवर्तसारणीतील अतिजड अशा 117 व्या मूलद्रव्याचे 'टेनेसिन' असे नामकरण करण्यात आले आहे. नव्याने शोध लागलेल्या मूलद्रव्यांच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब करणाऱ्या इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड ऍप्लाइड केमिस्ट्री (आययूपीएसी) या संस्थेने तब्बल एका वर्षाच्या पाठपुराव्यानंतर 'टेनेसिन' या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.
'टेनेसिन'चा शोध एप्रिल 2010 मध्ये लागला होता. हे अतिजड मूलद्रव्य असून, नैसर्गिकरीत्या ते आढळत नाही. विशिष्ट समस्थानक असलेल्या किरणोत्सारी मूलद्रव्याचा तशाच प्रकारच्या समस्थानक असलेल्या मूलद्रव्यावर प्रभाव पडल्यास संश्‍लेषण होते. त्यामुळे या दुर्मिळ घटनेत दोघांचे केंद्रके एकत्र येऊन अतिजड मूलद्रव्य तयार होते. 'टेनेसिन'च्या प्रकरणी, आवर्तसारणीतील मूलद्रव्य 117 तयार होण्यास बर्केलियम- 249 हे किरणोत्साराचे लक्ष्य असावे लागते.
या मूलद्रव्याच्या निर्मितीसाठी आणि त्याचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी टेनेसी या अमेरिकेतील राज्याचा सिंहाचा वाटा असल्याने मूलद्रव्याला या राज्याच्या नावावरूनच "टेनेसिन' हे नाव देण्यात आले आहे. हे हॅलोजन प्रकारातील मूलद्रव्य असल्याने टेनेसी शब्दाच्या अखेरीस जोड देऊन टेनेसिन हे नाव तयार झाले आहे. आवर्तसारणीत "टीएस' या नावाने ते दर्शविले जाणार आहे.
...असे तयार केले 'टेनेसिन'
एक वर्षापासून या प्रकरणी सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान, अमेरिकच्या ऊर्जा मंत्रालयाच्या राष्ट्रीय प्रयोगशाळेने 22 मिलिग्रॅम बर्केलियम निर्माण करून ते रशियामध्ये पाठविले. रशियामधील संशोधन संस्थेमध्ये प्रक्रिया करून 117 वे मूलद्रव्य तयार करण्यात आले. तब्बल सहा महिने कॅल्शिअम-48 चा त्याच्यावर अविरत मारा केल्यानंतर कॅल्शिअम आणि बर्केलियमचे केंद्रके होऊन 117 व्या मूलद्रव्याचे सहा अणू तयार झाल्याचे शास्त्रज्ञांना दिसून आले. आवर्तसारणीमध्ये नोंद नसलेलेही मूलद्रव्य असू शकतात, या चिकीत्सक वृत्तीतून जगभरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या संशोधनाचाच हा परिणाम असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Sunday, 18 December 2016

चहाविक्रीतून सावकार बनलेल्याकडे सापडली 400 कोटींची संपत्ती!

सूरत (वृत्तसंस्था) : प्राप्तीकर विभागाने टाकलेल्या छाप्यात चहाविक्री करून सावकार बनलेल्या एका व्यक्तीकडे रोख रक्कम, सोने, स्थावर मालमत्ता स्वरुपातील तब्बल 400 कोटी रुपयांची संपत्ती सापडली आहे.
प्राप्तीकर विभागाने शनिवारी शहरात चहाविक्रीतून सावकार बनलेल्या किशोर भाईज्वाला नावाच्या व्यक्तीच्या निवासस्थानाच्य परिसरासरात छापा टाकला. त्यामध्ये किशोरकडे 400 कोटींची संपत्ती असल्याचे आढळून आले. वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार प्राप्तीकर विभाग आणखी काही सापडते का याचा शोध घेत आहे. दरम्यान, अंमलबजावणी संचालनालयाने मोहाली आणि चंदीगडमध्ये केलेल्या कारवाईत 30 लाख रुपये सापडले आहेत. त्यामध्ये 18 लाख रुपये किंमतीच्या चलनातील नव्या नोटा आहेत. तर अडीच किलो सोन्याचाही समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर काळा पैसा धारक चिंतेत असून वेगवेगळ्या माध्यमातून काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्‍वभूमीवर प्राप्तीकर विभाग आणि पोलिस कारवाई करत बेहिशेबी मालमत्ता (काळा पैसा) जप्त करत आहेत.

काश्मीरमध्ये दुप्पट संख्येने जवान यंदा हुतात्मा!

श्रीनगर (वृत्तसंस्था): भारतीय लष्कराने मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा जम्मू काश्मीरमध्ये दुप्पट भारतीय जवान गमावले आहेत. या वर्षात 15 डिसेंबरपर्यंत सीमेवर सातत्याने होणाऱ्या गोळीबारात तब्बल 60 भारतीय जवान हुतात्मा झाले आहेत. 
पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन आणि दहशतवादी कारवाया वारंवार केल्यामुळे काश्मीरमध्ये तैनात असलेल्या 60 भारतीय जवानांना हौतात्म्य पत्कारावे लागले आहे.
2015 मध्ये भारतीय लष्कराच्या काश्मीरमधील हुतात्मा जवानांची संख्या 33 एवढी होती, तर 2014 मध्ये लष्कराच्या 32 जवानांना येथे हौतात्म्य आले होते. या वर्षी आतापर्यंत हा आकडा वाढून 60 एवढा झाला आहे. यातील 23 जवानांचा मृत्यू नियंत्रण रेषेवर झाला आहे. 2015 मध्ये नियंत्रण रेषेवर 4 जवान हुतात्मा झाले होते, तर 2014 मध्ये ही संख्या 5 एवढी होती.पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना, दहशतवाद्यांची घुसखोरी रोखताना भारतीय जवानांना वीरमरण आले. 
पाकिस्तानच्या 'बॉर्डर ऍक्शन टीम'ने 2016 या वर्षात शस्त्रसंधीचे उल्लंघन करत वारंवार गोळीबार केला. दहशतवाद्यांना घुसखोरी करता यावी, यासाठीही पाकिस्तानी सैन्याकडून भारतीय चौक्यांना लक्ष्य करण्यात आले आहे. यावर्षी दहशतवाद्यांची घुसखोरी रोखताना वीरमरण आलेल्या भारतीय जवानांची संख्या 37 आहे. 2015 मध्ये हा आकडा 29, तर 2014 मध्ये 27 इतका होता. उरी आणि नागरोटामधील हल्ल्यांमुळे यंदा भारतीय लष्कराने ३७ जवान गमावले. या दोन हल्ल्यांमध्ये भारतीय लष्कराने 26 जवान गमावले आहेत, अशी माहिती लष्कराच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे.

एटीएम लुटण्यासाठी सुरक्षारक्षकाचा खून

पाटणा (वृत्तसंस्था): 'एटीएम'साठी तैनात सुरक्षारक्षकाचा अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री धारदार शस्त्राने खून केल्याची घटना घडली आहे.
शहरातील मौर्यलोक कॉम्पलेक्‍समध्ये सेंट्रल बॅंकेचे एटीएम असून, तेथे कुंदन कुमार हा रक्षक तैनात होता. शुक्रवारी मध्यरात्री चोरीच्या उद्देशाने तेथे आलेल्या चोरट्यांनी कुंदनचा खून केल्यानंतर एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र यात त्यांना अपयश आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, कुंदनच्या कुटुंबीयांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

Saturday, 17 December 2016

रामदेव बाबांचा ‘नाराज’योग; म्हणे, तीन ते पाच लाख कोटींचा घोटाळा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर उद्भवलेल्या चलनसमस्येने सर्वसामान्यच नव्हे तर, कधीकाळी काळ्या पैशांविरोधात लढा देणारे योगगुरू रामदेव बाबांनीही नाराजी व्यक्त केली आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर रिझर्व्ह बँकेच्या काही अधिकाऱ्यांनी तीन ते पाच लाख कोटींचा घोटाळा केला आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
जयपूरमधील एका कार्यक्रमात रामदेव बाबांनी ‘द क्विंट’ या वेबसाइटला विशेष मुलाखत दिली. त्यात त्यांनी आरबीआयच्या अधिकाऱ्यांनी घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. नोटाबंदीचा निर्णय ‘फ्लॉप’ झाल्याचेही ते म्हणाले. नवीन नोटांच्या पुरवठ्यात मोठा घोटाळा झाला आहे. हा घोटाळा तीन ते पाच लाख कोटींचा असू शकतो, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. बँकेच्या अधिकाऱ्यांनी हजारो नव्हे, तर लाखो कोटी रुपयांची छपाई केली आहे. त्यात तीन ते पाच लाख कोटींचा घोटाळा झाल्याचे समोर येईल, असेही ते म्हणाले. रोख रकमेची कमतरता नव्हती. सर्वच्या सर्व रोकड बेईमानी लोकांना देण्यात आली. या व्यवस्थेत अजूनही काही सुधारणा होऊ शकतात, असेही ते म्हणाले. बँकेतील अधिकारी बेईमान असू शकतात, असे मला वाटते. असा प्रकार होणे हे दुर्दैवी आहे. देशाच्या कारभारावर गंभीर प्रश्न निर्माण करणारा आहे, असेही ते म्हणाले.

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...