Saturday, 14 March 2020

देवरीत पोलीस कर्मचार्याची आत्महत्या


देवरी,दि.14ःः देवरी पोलीस ठाणेंतर्गत कार्यरत पोलीस कर्मचारी ओमप्रकाश रहीले (रा.मोरगाव अजुनी) यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज शनिवारला उघडकीस आली.

रहिले हा येथील वार्ड क्रमांक 5 मधील शिक्षक काॅलनीत बडवाईंक यांच्या घरी भाड्याने राहायचा.सदर कर्मचारी हा नक्षल आपरेशनच्या स्पेशल एक्सन फोर्समध्ये होता.सी 60 पथकासाेबत हे पथक पोलीस महानिरिक्षकाच्या मार्गदर्शनात काम करते.ओमप्रकाश गेल्या 2 वर्षापासून या पथकामध्ये कार्यरत आहे.त्याची काही दिवसापुर्वीच साक्षगंध झाले असून आई आजारी आहे.तर वडिलांचा मृत्यू आधीच झालेला आहे. पोलीस विभागातील कामाचा ताण व वरिष्ठांचा दबावामुळे आत्महत्या केली असावी अशी चर्चा सुरु आहे.

Friday, 13 March 2020

ओबीसी समाजाच्या जातनिहाय जणगणनेकरीता दिल्ली येथे 23 मार्च ला देशव्यापी धरणे


गोंदिया,दि.12::–  ओबीसी समाजाच्या जातनिहाय जनगणनेकरीता लोकसभा बजेट शेसन दरम्यान देशव्यापी धरणे आंदोलन दि. 23 मार्च ला दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर होत आहे.
ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी या प्रमुख मागणीला घेवुन राष्ट्रीय ओबीसी महासंघाची 25 डीसेंबर 2018 ला दिल्ली येथील ए.पी. भवन येथे देशातील सर्व ओबीसी संघटनांची मिळून बैठक पार पडली.या बैठकीत केन्द्र सरकारला ओबीसी समाजाच्या जातनिहाय जनगणनेकरीता निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर 20 जानेवारी 2020 ला देशभरात धरणे आंदोलन घेण्यात आले. लोकसभा बजेट शेसन दरम्यान धरणे आंदोलन करण्याचे ठरले होते. त्यानुसार येत्या 23 मार्च रोजी दिल्ली येथील  जंतर-मंतर वर देशपातळीवरील धरणे आंदोलन आयोजित केले आहे.
या आंदोलनात राष्ट्रीय ओबीसी महासंघ,ऑल इंडिया बॅकवर्ड क्लास फेडरेशन, तेलंगणा स्टेट बॅकवर्ड क्लास वेलफेअर असो., आंध्रप्रदेश स्टेट बॅकवर्ड क्लास असो., ओबीसी महासभा मध्यप्रदेश, विश्वकर्मा समाज न्यू दिल्ली, पिछडा महासंघ, कानपुर व देशातील सर्व ओबीसी संघटना सहभागी होणार आहेत.या देशव्यापी धरणे आंदोलनात ओबीसी समाजात येणार्या सर्व जातसंघटनांचे पदाधिकारी व समाजबांधवाना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जस्टीस ईश्वरैय्या, राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष डाॅ.खुशाल बोपचे,महासचिव सचिन राजुकर,सहसचिव खेमेंद्र कटरे,उपाध्यक्ष प्रा.शेषराव येलेकर, जिल्हाध्यक्ष बबलु कटरे,महिलाध्यक्ष सुषमा भड,युवाध्यक्ष मनोज चव्हाण,जिवन लंजे,अमर वराडे,मनोज मेंढे,कैलास भेलावे,हरिष ब्राम्हणकर,मनोज डोये,दिनेश हुकरे,उध्दव मेहदंळे आदींनी केले आहे.

Thursday, 12 March 2020

घाबरून न जाता खबरदारीची उपाय योजावा- जिल्हाधिकारी बलकवडे

गोंदिया, ता. १२ : कोरोना विषाणूने महाराष्ट्रात पाय रोवले आहे. काही रुग्णांची रिपोर्ट पॉझिटिव्ह आली आहे. परंतु, नागरिकांनी घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. पुढील एक ते दीड महिने सार्वजनिक स्थळे व गर्दीच्या ठिकाणी जाण्यास कटाक्षाने टाळावे, शिंकताना, खोकलताना नाका-तोंडावर रुमाल ठेवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने गुरुवारी (ता. १२) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत केले. कोरोना प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचेही सांगितले. 
पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे, उपजिल्हाधिकारी सरीता बेलपत्रे, डॉ. संगीता पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रूखमोडे उपस्थित होते. 
पत्रकार परिषदेत बोलताना प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कापसे म्हणाले, ताप, कोरडा खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे ही कोरोना आजाराची प्राथमिक लक्षणे आहेत. ही लक्षणे आढळले तरीदेखील कोरोनाची लक्षणे असतील, असे नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. बाधीत देशातून आलेल्या नागरिकांनी स्वतः जवळच्या आरोग्य केंद्रात जावून तपासणी करून घ्यावी. ताप, कोरडा खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे ही लक्षणे असल्यास अशा रुग्णांनी दुसऱ्या व्यक्तींच्या तीन फूट दूर राहावे, पुढील १४ दिवस सर्व लोकांशी संपर्क टाळावा, वेगळ्या खोलीत राहावे, नागरिकांनी वारंवार आपले हात साबण किंवा सॅनेटराईजने स्वच्छ धुवावेत.
जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे म्हणाल्या, शासकीय महाविद्यालय गोंदिया येथे विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यात साथरोग नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. कोरोना विषाणूविषयी सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असले तरी जिल्ह्यात एकही संशयीत रुग्ण आढळून आला नसल्याने सामान्य नागरिकांनी मास्क लावून फिरण्याची आवश्यकता नाही. तसेच या रोगाचा प्रसार पाहता आवश्यकता नसल्यास सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी गर्दी करू नये. 
कोरोना प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून, या आजाराने ग्रस्त संशयीत रुग्णाचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षण अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. या रोगाची प्राथमिक लक्षणे दिसणाऱ्या नागरिकाबाबत सर्व उपाययोजना करण्यात येणार आहे. कोरोनाच्या चाचण्या करण्यासाठी राज्यात पुणे, मुंबई व नागपूर येथे सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. टोल फ्री  क्रमांक १०४ व राज्यस्तरीय दूरध्वनी क्रमांक ०२०२६१२७३९४  यावर शंकांचे समाधान करण्यात येईल.


आवश्यकता नसल्यास मोठे कार्यक्रम पुढे ढकलावे
कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असले तरी, नागरिकांनी आवश्यकता नसल्यास गर्दी होईल, असे मोठे कार्यक्रम किमान एक -दीड महिने पुढे ढकलावे, पर्यटनस्थळी गर्दी होणार नाही, याची काळजी, संबंधितांनी घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.


जनजागृतीला सुरुवात
या विषाणूसंबंधित घ्यावयाच्या काळजीबाबत जिल्ह्यात जनजागृती केली जात आहे. रेल्वेस्थानक, बसस्थानक अशा ठिकाणी शिवाय नगर परिषदेच्या घंटागाड्यांच्या माध्यमातूनही जनजागृती केली जात आहे. येत्या १६ मार्च रोजी जिल्हास्तरीय मेळावा होणार असून, १९ मार्च रोजी तालुकास्तरावर मेळावे घेण्यात येणार आहे. 
दरम्यान, उच्च न्यायालयाने माणसांची गर्दी करणारे मेळावे वा तत्सम कोणतेही कार्यक्रम घेऊ नये, असे निर्देश दिले असताना जिल्हा प्रशासन घेत असल्याने हे न्यायालयांच्या निर्देशाचे स्पष्ट उल्लंघन होत असल्याचा सूर जिल्ह्यात आळवला जात आहे. प्रशासनाने जनजागृती अवश्य करावी. मात्र, स्वतः गर्दी होणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमाला मंजूरी कशी काय दिली जाऊ शकते, असा प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे. उल्लेखनीय म्हणजे जिल्ह्याबाहेर अनेक मोठ्या मेळाव्यांना प्रशासनाने मंजूरी नाकारल्याचे सांगण्यात येत आहे.

गोंदियात आढळला कोरोनाचा संशयित रुग्ण

गोंदिया,दि.12 – गोंदिया येथे कोरोना वायरसची लागण झाल्याचा संशयित रुग्ण आढळ्याची माहीती समोर येत आहे.
गोंदिया येथे इजिप्त वरून काही दिवसापूर्वी परतलेल्या एका 20 वर्षीय तरुणीची प्राथमिक तपासणी केल्यावर तिला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे प्राथमिक लक्षण दिसून आले आहेत. तिला संशयित म्हणून आरोग्य विभागाने स्थानिक शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात देखरेखीत ठेवल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्ह्यात हा पहिलाच रुग्ण आढल्याचेही बोलले जात आहे.

Wednesday, 11 March 2020

शिक्षकांच्या दीड लाख रकमेवर विस्तार अधिकाऱ्यांनी मारला डल्ला

व्यवसायकर भरणा करण्यासाठी ईमेलआयडी व पासवर्डचे केले निमित्त
मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष

देवरी,दि.09- देवरी पंचायत समितीमध्ये कार्यरत शिक्षकांच्या व्यवसायकराची कपात व्यवसायकर विभागाकडे भरणा करण्यासाठी ईमेल आयडी व पासवर्ड तयार करून देण्याच्या नावावर शिक्षकांकडून गैरमार्गाने गोळा केलेल्या 1 लाख 60 हजार रुपयांवर शिक्षण विस्तार अधिकाऱ्याने डल्ला मारल्याचा प्रकार पंचायत समितीच्या आढावा बैठकीत जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे समोर उघड झाला आहे. हा सरळसरळ आर्थिक घोटाळा असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी या प्रकरणात कोणती कार्यवाही करतात? याकडे सर्व शिक्षकांसह जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देवरी पंचायत समितीमध्ये कार्यरत शिक्षकांच्या वेतनातून दर महिन्याला व्यवसायकराची नियमित कपात केली जाते. या कपातीचा भरणा व्यवसायकर विभागाकडे चलानच्या माध्यमातून करणे ही जबाबदारी संबंधित गटशिक्षणाधिकारी यांची आहे. या पंचायत समितीमधील शिक्षकांचे व्यवसाय कर 2013 पासून नियमित कपात केली गेली. मात्र, शिक्षणविभागातील सूत्रांनुसार, या संबंधी आवश्यक असलेला ईमेल आयडी व पासवर्ड अद्यापही तयार करण्यात आला नाही. यामुळे या कर भरणा प्रकरणात व्यवसायकर विभागाने सन 2016-17 या आर्थिक वर्षात लाखाच्यावर दंड केल्याची माहिती तत्कालीन गटशिक्षणाधिकारी डी.बी.साकुरे यांनी सर्व शिक्षकांची बैठक लावून दिली. हे प्रकरण निस्तारण्यासाठी सर्व शिक्षकांनी सामंजस्याची भूमिका घेऊन प्रत्येकी 500 रुपये वर्गणी देऊन सहकार्य करावे, असे आवाहन श्री.साकुरे यांनी शिक्षकांना केले होते. यावर 320 शिक्षकांनी 1 लाख 60 हजार रुपये केंद्रप्रमुखांमार्फत वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी डी. बी दिघोरे यांचे कडे दिली. श्री. दिघोरे यांनी स्वतः या प्रकरणाच्या निस्तारण्याची जबाबदारी घेतल्याचे अन्यायग्रस्त शिक्षकांसह अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. असे असताना श्री.दिघोरे यांनी 1 लाख 60 हजार रक्कम स्वतः घेऊन कोणतीही कार्यवाही न करता पैसे स्वतःकडे ठेवून घेतले. त्यानंतर त्यांची बदली तिरोडा पंचायत समितीमध्ये स्थानांतरण झाल्यावर सुद्धा श्री.दिघोरे यांनी कोणतीही कार्यवाही न करता व्यवसायकर कपातीचे प्रकरणाची जबाबदारी जाणीवपूर्वक झटकली. त्यामुळे हे प्रकरण आता चांगलेच चिघळले आहे.
दरम्यान, गेल्या 6 तारखेला देवरी येथे झालेल्या आढावा बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी दयानिधी राजा यांना या शिक्षकांनी निवेदन देऊन आपले पैसे परत मिळवून देण्यासंबंधी निवेदन दिल्यावर हा आर्थिक घोटाळा समोर आला आहे. कर्मचाऱ्यांकडून व्यवसायकराची कपात केल्यानंतर त्या रकमेचा भरणा संबंधित विभागाकडे करणे हे शिक्षणविभागाच्या कर्तव्याचा भाग आहे. जर 2013 पासून नियमित कपात करून या कराचा भरणा केला गेला असेल तर दंड कसा आकारला गेला, हा प्रश्न येथे अनुत्तरित आहे. जर हा भरणा करण्याची जबाबदारी शिक्षणविभागाची असेल तर शिक्षकाकडून कोणत्या आधारावर वसुली करण्यात आली? श्री. दिघोरे यांनी प्रकरण निस्तारण्यासाठी शिक्षकांकडून 1 लाख 60 हजार एवढी मोठी रक्कम स्वीकारली आणि प्रकरण निस्तारले नाही, तर आजपर्यंत शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी काय करीत होते, हे न समजण्यापलिकडील बाब आहे. शिक्षकांकडून पैसे स्वीकारून अरेरावीची भाषा करणे, हे गैरजबाबदारीचे वर्तन नाही काय? असा प्रश्न शिक्षकांसह सामान्य नागरिकांना पडला आहे. परिणामी, गोंदिया जिल्हा परिषद प्रशासनाचा आपल्या अधिनस्त कर्मचारी व अधिकाराऱ्यांवर नियंत्रण नसल्याचा गंभीर आरोप संपूर्ण जिल्हातून होऊ लागला आहे.
या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी या प्रकरणातील दोषींवर कार्यवाही करून आदर्श स्थापित करतील, अशी आशा कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी व्यक्त केली आहे.


11 ते 17 मार्च बेरार टाईम्स ईपेपर berartimes.com ला क्लिक करा जाहिरात व ताज्या बातम्यासांठी





देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...