Wednesday 11 March 2020

शिक्षकांच्या दीड लाख रकमेवर विस्तार अधिकाऱ्यांनी मारला डल्ला

व्यवसायकर भरणा करण्यासाठी ईमेलआयडी व पासवर्डचे केले निमित्त
मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष

देवरी,दि.09- देवरी पंचायत समितीमध्ये कार्यरत शिक्षकांच्या व्यवसायकराची कपात व्यवसायकर विभागाकडे भरणा करण्यासाठी ईमेल आयडी व पासवर्ड तयार करून देण्याच्या नावावर शिक्षकांकडून गैरमार्गाने गोळा केलेल्या 1 लाख 60 हजार रुपयांवर शिक्षण विस्तार अधिकाऱ्याने डल्ला मारल्याचा प्रकार पंचायत समितीच्या आढावा बैठकीत जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे समोर उघड झाला आहे. हा सरळसरळ आर्थिक घोटाळा असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी या प्रकरणात कोणती कार्यवाही करतात? याकडे सर्व शिक्षकांसह जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देवरी पंचायत समितीमध्ये कार्यरत शिक्षकांच्या वेतनातून दर महिन्याला व्यवसायकराची नियमित कपात केली जाते. या कपातीचा भरणा व्यवसायकर विभागाकडे चलानच्या माध्यमातून करणे ही जबाबदारी संबंधित गटशिक्षणाधिकारी यांची आहे. या पंचायत समितीमधील शिक्षकांचे व्यवसाय कर 2013 पासून नियमित कपात केली गेली. मात्र, शिक्षणविभागातील सूत्रांनुसार, या संबंधी आवश्यक असलेला ईमेल आयडी व पासवर्ड अद्यापही तयार करण्यात आला नाही. यामुळे या कर भरणा प्रकरणात व्यवसायकर विभागाने सन 2016-17 या आर्थिक वर्षात लाखाच्यावर दंड केल्याची माहिती तत्कालीन गटशिक्षणाधिकारी डी.बी.साकुरे यांनी सर्व शिक्षकांची बैठक लावून दिली. हे प्रकरण निस्तारण्यासाठी सर्व शिक्षकांनी सामंजस्याची भूमिका घेऊन प्रत्येकी 500 रुपये वर्गणी देऊन सहकार्य करावे, असे आवाहन श्री.साकुरे यांनी शिक्षकांना केले होते. यावर 320 शिक्षकांनी 1 लाख 60 हजार रुपये केंद्रप्रमुखांमार्फत वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी डी. बी दिघोरे यांचे कडे दिली. श्री. दिघोरे यांनी स्वतः या प्रकरणाच्या निस्तारण्याची जबाबदारी घेतल्याचे अन्यायग्रस्त शिक्षकांसह अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. असे असताना श्री.दिघोरे यांनी 1 लाख 60 हजार रक्कम स्वतः घेऊन कोणतीही कार्यवाही न करता पैसे स्वतःकडे ठेवून घेतले. त्यानंतर त्यांची बदली तिरोडा पंचायत समितीमध्ये स्थानांतरण झाल्यावर सुद्धा श्री.दिघोरे यांनी कोणतीही कार्यवाही न करता व्यवसायकर कपातीचे प्रकरणाची जबाबदारी जाणीवपूर्वक झटकली. त्यामुळे हे प्रकरण आता चांगलेच चिघळले आहे.
दरम्यान, गेल्या 6 तारखेला देवरी येथे झालेल्या आढावा बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी दयानिधी राजा यांना या शिक्षकांनी निवेदन देऊन आपले पैसे परत मिळवून देण्यासंबंधी निवेदन दिल्यावर हा आर्थिक घोटाळा समोर आला आहे. कर्मचाऱ्यांकडून व्यवसायकराची कपात केल्यानंतर त्या रकमेचा भरणा संबंधित विभागाकडे करणे हे शिक्षणविभागाच्या कर्तव्याचा भाग आहे. जर 2013 पासून नियमित कपात करून या कराचा भरणा केला गेला असेल तर दंड कसा आकारला गेला, हा प्रश्न येथे अनुत्तरित आहे. जर हा भरणा करण्याची जबाबदारी शिक्षणविभागाची असेल तर शिक्षकाकडून कोणत्या आधारावर वसुली करण्यात आली? श्री. दिघोरे यांनी प्रकरण निस्तारण्यासाठी शिक्षकांकडून 1 लाख 60 हजार एवढी मोठी रक्कम स्वीकारली आणि प्रकरण निस्तारले नाही, तर आजपर्यंत शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी काय करीत होते, हे न समजण्यापलिकडील बाब आहे. शिक्षकांकडून पैसे स्वीकारून अरेरावीची भाषा करणे, हे गैरजबाबदारीचे वर्तन नाही काय? असा प्रश्न शिक्षकांसह सामान्य नागरिकांना पडला आहे. परिणामी, गोंदिया जिल्हा परिषद प्रशासनाचा आपल्या अधिनस्त कर्मचारी व अधिकाराऱ्यांवर नियंत्रण नसल्याचा गंभीर आरोप संपूर्ण जिल्हातून होऊ लागला आहे.
या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी या प्रकरणातील दोषींवर कार्यवाही करून आदर्श स्थापित करतील, अशी आशा कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी व्यक्त केली आहे.


No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...