Thursday 12 March 2020

घाबरून न जाता खबरदारीची उपाय योजावा- जिल्हाधिकारी बलकवडे

गोंदिया, ता. १२ : कोरोना विषाणूने महाराष्ट्रात पाय रोवले आहे. काही रुग्णांची रिपोर्ट पॉझिटिव्ह आली आहे. परंतु, नागरिकांनी घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. पुढील एक ते दीड महिने सार्वजनिक स्थळे व गर्दीच्या ठिकाणी जाण्यास कटाक्षाने टाळावे, शिंकताना, खोकलताना नाका-तोंडावर रुमाल ठेवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने गुरुवारी (ता. १२) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत केले. कोरोना प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचेही सांगितले. 
पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे, उपजिल्हाधिकारी सरीता बेलपत्रे, डॉ. संगीता पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रूखमोडे उपस्थित होते. 
पत्रकार परिषदेत बोलताना प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कापसे म्हणाले, ताप, कोरडा खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे ही कोरोना आजाराची प्राथमिक लक्षणे आहेत. ही लक्षणे आढळले तरीदेखील कोरोनाची लक्षणे असतील, असे नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. बाधीत देशातून आलेल्या नागरिकांनी स्वतः जवळच्या आरोग्य केंद्रात जावून तपासणी करून घ्यावी. ताप, कोरडा खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे ही लक्षणे असल्यास अशा रुग्णांनी दुसऱ्या व्यक्तींच्या तीन फूट दूर राहावे, पुढील १४ दिवस सर्व लोकांशी संपर्क टाळावा, वेगळ्या खोलीत राहावे, नागरिकांनी वारंवार आपले हात साबण किंवा सॅनेटराईजने स्वच्छ धुवावेत.
जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे म्हणाल्या, शासकीय महाविद्यालय गोंदिया येथे विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यात साथरोग नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. कोरोना विषाणूविषयी सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असले तरी जिल्ह्यात एकही संशयीत रुग्ण आढळून आला नसल्याने सामान्य नागरिकांनी मास्क लावून फिरण्याची आवश्यकता नाही. तसेच या रोगाचा प्रसार पाहता आवश्यकता नसल्यास सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी गर्दी करू नये. 
कोरोना प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून, या आजाराने ग्रस्त संशयीत रुग्णाचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षण अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. या रोगाची प्राथमिक लक्षणे दिसणाऱ्या नागरिकाबाबत सर्व उपाययोजना करण्यात येणार आहे. कोरोनाच्या चाचण्या करण्यासाठी राज्यात पुणे, मुंबई व नागपूर येथे सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. टोल फ्री  क्रमांक १०४ व राज्यस्तरीय दूरध्वनी क्रमांक ०२०२६१२७३९४  यावर शंकांचे समाधान करण्यात येईल.


आवश्यकता नसल्यास मोठे कार्यक्रम पुढे ढकलावे
कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असले तरी, नागरिकांनी आवश्यकता नसल्यास गर्दी होईल, असे मोठे कार्यक्रम किमान एक -दीड महिने पुढे ढकलावे, पर्यटनस्थळी गर्दी होणार नाही, याची काळजी, संबंधितांनी घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.


जनजागृतीला सुरुवात
या विषाणूसंबंधित घ्यावयाच्या काळजीबाबत जिल्ह्यात जनजागृती केली जात आहे. रेल्वेस्थानक, बसस्थानक अशा ठिकाणी शिवाय नगर परिषदेच्या घंटागाड्यांच्या माध्यमातूनही जनजागृती केली जात आहे. येत्या १६ मार्च रोजी जिल्हास्तरीय मेळावा होणार असून, १९ मार्च रोजी तालुकास्तरावर मेळावे घेण्यात येणार आहे. 
दरम्यान, उच्च न्यायालयाने माणसांची गर्दी करणारे मेळावे वा तत्सम कोणतेही कार्यक्रम घेऊ नये, असे निर्देश दिले असताना जिल्हा प्रशासन घेत असल्याने हे न्यायालयांच्या निर्देशाचे स्पष्ट उल्लंघन होत असल्याचा सूर जिल्ह्यात आळवला जात आहे. प्रशासनाने जनजागृती अवश्य करावी. मात्र, स्वतः गर्दी होणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमाला मंजूरी कशी काय दिली जाऊ शकते, असा प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे. उल्लेखनीय म्हणजे जिल्ह्याबाहेर अनेक मोठ्या मेळाव्यांना प्रशासनाने मंजूरी नाकारल्याचे सांगण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...