Wednesday 4 March 2020

विद्यार्थ्याला शाळेत कोंडून शिक्षक घरी


देवरीच्या जि.प.शाळेतील प्रकार
पत्रकाराच्या सतर्कतेमुळे वाचला विद्यार्थ्याचा जीव


देवरी, दि.04- विद्यार्थ्याचे भविष्य घडविण्याचा दावा करणाऱ्या एका शिक्षकाच्या कर्तव्यशून्यतेमुळे देवरीतील जिल्हा परिषदेतील एका शाळेत विद्यार्थ्याचा जीव धोक्यात आल्याची घटना आज बुधवारी (दि.04) देवरी येथे घडली. यावेळी एका पत्रकाराने वेळीच समयसूचकता दाखविल्याने त्या विद्यार्थ्याचा जीव तर वाचला, पण दुसरीकडे सामाजिक शांतता राखण्यात यश आले.  दरम्यान, त्या बेजबाबदार शिक्षकावर आता शिक्षण विभाग काय कार्यवाही करते, याकडे सर्व देवरीवासीयांचे लक्ष लागले आहे.
सविस्तर असे की, जिल्ह्यात हत्तीरोग दुरीकरण उपक्रमांतर्गत गावात हत्तीरोग निर्मूलनासाठी नागरिकांना गोळ्यांचे वाटप करणे सुरू आहे. दरम्यान, आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शालेय विद्यार्थ्यांनी या गोळ्याचे वाटप स्थानिक जि.प. कन्या शाळेत सुद्धा केले. या शाळेत तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या तुषार महेश राऊत या विद्यार्थ्याने सुद्धा औषधाच्या गोळ्यांचे सेवन केले. मात्र, तो उपाशीपोटी असल्याने त्याला गोळ्यांची गुंगी आली. त्यामुळे त्याने संबंधित वर्गशिक्षकाला घरी जाण्याची सुटी मागितली. यावर त्या शिक्षकाने त्या विद्यार्थ्याला दमदाटी करून घरी जाण्यास मज्जाव केला. त्यामुळे तो विद्यार्थी घाबरून शाळेतच झोपी गेला. शाळेतील सर्व शिक्षक हे नेहमीप्रमाणे गप्पा करत ऑफिसमध्ये बसून सायंकाळी शाळेची तपासणी न करता घरी जात असल्याचा नित्यक्रम असल्याचे शाळेशेजारील नागरिकांचे म्हणणे आहे. आजही शाळा सुटल्यावर सर्व शिक्षकांनी नेहमीप्रमाणे शाळेची तपासणी न करता शाळेला कुलूप लावून आपापले घर गाठले. मात्र, तिसऱ्या वर्गाच्या शिक्षकाने सुद्धा तुषार घरी गेला किंवा नाही याची चौकशी केली नाही. परिणामी, तुषार हा त्याच्या वर्गात कोंडला गेला. जेव्हा तुषारला जाग झाली, तेव्हा रात्र झाली होती. त्यामुळे त्याने गांगरून टाहो फोडला. त्याचा आवाज हा रस्त्याने जात असलेल्या एका सुनील चोपकर या पत्रकाराच्या कानावर आल्याने त्यांनी खिडकीतून डोकावून बघितले. तेव्हा सर्व प्रकार हा त्यांच्या लक्षात आला. तोपर्यंत शालेय आवारात बघ्यांनी गोंधळ घालायला सुरवात केली होती. त्यामुळे तुषार हा आणखी गांगरला. त्यामुळे त्या पत्रकाराने संबंधित मुख्याध्यापकाला फोन करून बोलावून घेतले. परंतु, घटनास्थळावरील वातावरण बघता मुख्याध्यापकांची कुलूप उघडण्याची हिंमत झाली नाही. तुषारच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम होऊ नये, म्हणून श्री. चोपकर यांनी प्रसंगावधान राखत शाळेचे कुलूप उघडले आणि त्या मुलाला सुखरूप बाहेर काढले.
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्याप्रमाणे, त्या विद्यार्थ्याला जाग येण्यासाठी अधिकवेळ लागला असता आणि त्याची सुटका वेळीच झाली नसती, तर त्या विद्यार्थ्याचा भीतीपोटी जीव जाण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे श्री. चोपकर यांचे तुषारच्या पालकांसह सर्वांनी अभिनंदन केले. 
दरम्यान, तुषारच्या वर्ग शिक्षकाने अक्षम्य अशी चूक केली. त्या शिक्षकाच्या बेजबाबदारवृत्तीमुळे आज तुषारचा जीव संकटात आला होता. अशा बेजबाबदार शिक्षकावर शिक्षण विभाग काय कार्यवाही करते, याकडे देवरीवासीयांचे लक्ष लागले आहे,

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...