Saturday, 2 December 2017

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाची विभागीय बैठक उत्साहात

पवनी,दि.2 - महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेची विभागीय बैठक काल पवनी येथील गांधी भवनात उस्ताहात पार पडली.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी  औरंगाबाद येथील विभागीय अध्यक्ष सुदाम शिंगोडे हे होते. यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये औरंगाबाद विभागाचे सरचिटणीस बनकर, गायकवाड ॉ, पत्रकार पारधी, गोंदिया शाखेचे जिल्हाध्यक्ष एच.पी. पांडे,सरचिटणीस अरविंद साखरे, कार्याध्यक्ष व्ही आऱ बहेकार, सल्लागार पृथ्वीराज कोल्हटकर, गडचिरोली जिल्हाध्यक्ष डी.एस. मेश्राम, सरचिटणीस अरूण तलमले, एम. के. काळबांधे. के.एस गेडाम आदींचा समावेश होता.
यावेळी 2005 नंतर शासकीय सेवेत समाविष्ठ ग्रामसेवकांना जुनी पेंशन योजना लागू करणे, कंत्राटी ग्रामसेवक म्हणून 3 वर्षाची सेवा ही सेवाकाळ म्हणून गणला जाणे, २००४-२००५ पासून सेवेत असलेल्या ग्रामसेवकांच्या कपात केलेल्या GPF/CPF/DCPS रकमांचा हिशोब शासनाकडून घेणे आणि ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी संवर्गाला भेडसावत असलेल्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. दरम्यान, नागपूर जिल्ह्यातील सुमारे 25 ग्रामसेवकांनी संघाच्या नेतृत्वावर विश्वास टाकत संघात प्रवेश केला. 
यावेळी नागपूर शाखेची कार्याकारिणी गठीत करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष भारत मेश्राम, उपाध्यक्ष पंजाब चल्हाण, सचिव पूनम पांडे, प्रसिद्धी प्रमुख रवी रेहपाडे आणि मार्गदर्शक म्हणून हरिभाऊ रानडे यांचा समावेश करण्यात आला.
 प्रास्ताविक  विनोद भेंडारकर यांनी केले. संचालन रवी खोटेले यांनी केले. उपस्थितांचे  आभार संध्या पाटील यांनी मानले. बैठकीच्या यशस्वितेसाठी  विलासभाऊ मुंडे, डी. एस.मेश्राम, कालिदास माकडे, सुधाकर चिंधालोरे, संदीप भिवगडे,संध्या पाटील, कीर्ती भिवगडे, मनोज राजाभोज, पौर्णिमा साखरे, संगीता मारवाडे, वसंत बावनकुळे,जयप्रकाश आकरे,नेपाल जांभुळकर,विजया लांजेवार, शाम वैद्य, प्रवीण सोरटकर, धनराज थोटे,देविदास भुजबळ, गौतम खंडाळे, सुनील खांडेकर,सुरेश राऊत, राजकुमार पटले,  मिलिंद दरवरे, अशोक ब्राम्हणकर  महेंद्र लांजेवार  यांनी सहकार्य केले.  


भान हरवलेले सरकार शेतकऱ्यांवर गोळ्याही झाडू शकते-अजित पवार



यवतमाळ,दि.2- बोगस आणि खोटी आश्वासने देऊन सत्ता भोगणाऱ्या भाजप सरकारचे भान हरवले आहे. आता ते शेतकऱ्यांवरही गोळ्या झाडू शकते, असे वक्तव्य माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केले. यवतमाळ येथील पोस्टल ग्राउंडवरून राष्ट्रवादीच्या हल्लाबोल’ आंदोलनाला शुक्रवारी सुरुवात झाली. खासदार सुप्रिया सुळे या आंदोलनाचे नेतृत्व करत असून या वेळी राष्ट्रवादीचे अनेक नेते यात सहभागी झाले होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला शेतकरी आत्महत्या आणि फवारणीतून विषबाधा झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तद्नंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. अजित पवार म्हणाले, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अशी आग्रही भूमिका राष्ट्रवादीची होती. भाजपाने तत्त्वत:, अटी, निकष आदी शब्द टाकून शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गाजर दाखविले आहे.

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मानसिकता भाजप सरकारची नाही. दोन समाजात तेढ निर्माण करायाचा आणि स्वत:ची पोळी भाजून घेणे एवढेच भाजपाला जमते. आपली जात शेतकरी आणि धर्मसुद्धा शेतकरीच असल्याचा उल्लेख पवार यांनी शेवटी बोलताना केला. त्यांच्या भाषणानंतर ‘हल्लाबोल’ आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. शहरातील पोस्टल ग्राउंडमधून निघालेल्या मोर्चात हजारो शेतकरी, वकिलांचा सहभाग होता. तद्नंतर मोर्चा शहराच्या प्रमुख मार्गावरून नागपूरच्या दिशेने निघाला. १ ते १२ डिसेंबरपर्यंत हा मोर्चा राहणार असून यवतमाळ ते नागपूर असे एकूण १५३ किलोमीटर अंतर पायदळी जाणार आहे. दरम्यान, १३ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे या मोर्चाला संबोधित करणार आहेत.

पोलीस निरीक्षक हेमने लाच घेताना अटक

गोंदिया,दि.०२- गोंदिया जिल्हा पोलिस अंतर्गत येत असलेल्या दवनीवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वामनराव हेमने यांना २ हजाराची लाच घेताना आज लाचलुचपतप्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडल्याची घटना घडली.
तक्रारदार हे बिल्डींग मटेरियल सप्लायर्सचे काम करीत असून त्याच्याकडे दोन टिप्पर आहेत. १ डिसेंबरला तक्रारदाराच्या टिप्परने बोल्डरची वाहतुक करीत असताना सालईटोला येथील बसस्टाप समोर सहाय्यक पोलिस निरीक्षक वामनराव हेमने यांनी टिप्पर पकडले.त्यावेळी टिप्पर चालकाने टिप्परमालकाशी हेमने यांचे मोबाईलवर बोलणे करुन दिले असता टिप्परवर कारवाई न करण्याकरिता तसेच मासिक हप्ता म्हणून २ हजाराची लाच मागितली. तक्रारदारास ही रक्कम देण्याची इच्छा नसल्याने गैरअर्जदार हेमने यांच्याविरुध्द १ डिसेंबरलाच लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. त्या तक्रारीच्या आधारावर आज २ डिसेंबरला विभागाच्या वतीने सापळा रचून कारवाई करण्यात आली असता सहाय्यक पोलिस निरिक्षक वामन हरीभाऊ हेमने,पोलीस स्टेशन दवनीवाडा यांना लोकसेवक पदाचा दुरुपयोग करुन भ्रष्ट व गैरमार्गाचा अवलंब करीत तक्रारदारास मागितलेली लाच पंचासमक्ष घेताना रंगेहाथ पकडले असून दवनीवाडा पोलिस स्टेशनला कलम ७,१३(१)(ड)सहकलम १३(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील,पोलिस उपअधिक्षक रमाकांत कोकाटे,पोलिस निरीक्षक प्रमोद चौधरी,फौजदार दिवाकर भदाडे,राजेश शेंद्रे,रंजित बिसेन,डिगंबर जाधव,नितिन रहागंडाले,वंदना बिसेन ,देवनानंद मारबते यांच्या पथकाने केली.

साडेपाच लाख शासकीय कर्मचाऱ्यांवर गडांतर

मुंबई,दि.2 - शासकीय कर्मचाऱ्यांना देण्यात  येणारा सातवा वेतन आयोग, संगणीकरण आणि आउटसोर्सिंग यामुळे आता मनुष्यबळ कपातीची आवश्यकता असल्याचे दाखवून सुमारे 30 टक्के कर्मचारीसंख्या कमी करण्याचे आदेश वित्त विभागाने दिले आहेत. यासाठी नवे आकृतीबंध सादर करण्याच्या सूचना निर्गमित करण्यात आल्या असून सुमारे साडे सहा लाख अधिकारी-कर्मचारी यांची पदे कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिणामी, सर्व विभागामध्ये तणावाचे वातावरण आहे.
संगणकाच्या अधिक वापरामुळे मनुष्यबळाची कमी झालेली आवश्यकता, अनेक कामांचे गेल्या काही वर्षांत झालेले कंत्राटीकरण आणि आउटसोर्सिंग यामुळे शासकीय सेवेतील पदांची संख्या कमी करणे गरजेचे आहे.
शिवाय, सातव्या वेतन आयोगामुळे राज्य शासनावर मोठा अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार आहे. पदांची कपात केल्यास हा बोजा कमी होऊ शकेल, असा तर्क दिला जात आहे.
सर्व विभागांनी ३०% कपातीसह पदांचा नवा आकृतिबंध ३१ डिसेंबरपर्यंत सादर करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आला आहे. आतापर्यंत जलसंपदा, ग्राम विकास व अल्पसंख्याक या तीनच विभागांनी नवीन आकृतिबंध तयार केला आहे.आयटी सोल्युशन्सच्या माध्यमातून शासकीय सेवेतील एकूण मनुष्यबळाची मागणी ३०%पर्यंत खाली आणणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश असल्याचा आधार घेत ३० टक्के पदकपातीचा आदेश वित्त विभागाने काढला आहे. सद्यःस्थितीत 19 लाख मंजूर कर्मचारी संख्येपैकी 2 लाख पदे अद्यापही रिक्त आहेत. 

Friday, 1 December 2017

विनाताई अढउ यांचे निधन

अर्जुनी-मोर,दि.१- अर्जुनी-मोर येथील सेवानिवृत्त परिचारीका श्रीमती विनाताई कृष्णराव अढउ यांचे आज १ डिसेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६९ इतके होते. विनाताई अढउ ह्या आरोग्य विभागातून परिचारीका म्हणून सेवानिवृत्त झाल्या होत्या. त्यांच्या मागे दोन मुले, सुना व नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार असून उद्या २ डिसेंबर रोजी अर्जुनी-मोर येथील स्थानिक मोक्षधामावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

यशवंतराव दाते स्मृतीसंस्थेच्या पुरस्कारासाठी पुस्तके पाठवा

गोंदिया,01- गेल्या 29 वर्षापासून व्याख्यानमालांच्या आयोजनात सातत्य राखत वैचारिक प्रबोधनाची परंपरा जपणाऱ्या वर्धा येथील यशवंतराव दाते स्मृतिसंस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी आपली पुस्तके पाठविण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रदीप दाते यांनी केले आहे.
यशवंतराव दाते स्मृती संस्थेने गेल्या 29 वर्षांपासून सातत्याने व्याख्यानमाला आयोजित करुन वैचारिक प्रबोधन आणि आपल्या साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक प्राप्त केला आहे. या संस्थेच्या वतीने दरवर्षी सर्वोत्कृष्ट मराठी कादंबरीला ‘बाबा पद्मनजी साहित्य पुरस्कार’, सर्वोत्कृष्ट कथासंग्रहाला ‘शिक्षण व सहकारमहर्षी बापूरावजी देशमुख पुरस्कार’, सर्वोत्कृष्ट कवितासंग्रहाला ‘संत भगवानबाबा काव्य पुरस्कार’ व ‘पद्माकर श्रावणे स्मृती बालसाहित्य पुरस्कार, भाऊरावजी शिंगाडे विनोदी साहित्य पुरस्कार‘ दिला जातो. रोख पाच हजार रुपये, मानपत्र व स्मृतीचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे. या शिवाय, डॉ. भा. ल. भोळे वैचारिक साहित्य पुरस्कार तसेच अंजनाबाई इंगळे तिगावकर स्मृती स्त्रीवादीसाहित्य पुरस्कार, डॉ. यशवंत सुमंत स्मृती प्रेरणा पुरस्कार देण्यात येत आहे. अनुवादीत साहित्याकरिता यशवंतराव दाते स्मृती अनुवाद पुरस्कार सुद्धा देण्याचे ठरले आहे. 
पुरस्कारासाठी नियम व अटी :
० पुरस्कारासाठी मराठीतून लिहिलेल्या साहित्याचाच विचार केला जाईल. 
० पुरस्कारासाठी 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2017 या कालावधीत प्रकाशित झालेल्या साहित्याच्या प्रत्येकी दोन प्रती पाठवाव्यात.
०  अनुवाद पुरस्काराकरिता इतर भाषेतील मराठीत अनुवादीत पुस्तकांचाच विचार केला जाईल.
०  सोबत लेखकाचा विस्तृत परिचय दोन छायाचित्रांसह पाठवावा.
०  प्रकाशित साहित्य 5 जानेवारी 2018 पूर्वी पोहचेल अशा बेताने पाठवावे.
०  परीक्षण समितीचा निर्णय अंतिम राहील.
० पुरस्कार विजेत्यांची नावे 20 जानेवारी 2018 पर्यंत जाहीर करण्यात येतील.
०  पुरस्कार वितरण समारंभ 1 फेब्रुवारी 2018 ला वर्ध्यात होईल.

 पुरस्कारासाठी पुस्तके संयोजक पुरस्कार समिती, यंशवंतराव दाते स्मृती संस्था, द्वारा प्रदीप दाते, शिवबावाडी, साबळे प्लॉट, वर्धा 442001 या पत्यावर पाठवावीत. अधिक माहितीसाठी दूरध्वनी 07152-241051, 252510, 9422144817 वर संपर्क साधावा.
 या पुरस्कारासाठी जास्तीत जास्त साहित्यिकांनी/प्रकाशकांनी कादंबरी/कथा/काव्यसंग्रह/ वैचारिक साहित्य/स्त्रीवादीसाहित्य/बालसाहित्य/विनोदी/अनुवादीत पुस्तके पाठवून सहकार्य करावे, ही विनंती. संस्थेचे अध्यक्ष प्रदीप दाते, संयोजक प्रा. डॉ राजेंद्र मुंढे, उपाध्यक्ष प्रा. शेख हाशम व सचिव संजय इंगळे तिगावकर यांनी केली आहे.

कर्जमाफीची माहिती देणारी ‘लिंक’ हटविली

गोंदिया,दि.01ः- शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकार आणि विरोधकांचे दावे-प्रतिदावे सुरू आहेत. अशातच शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जमाफीची माहिती देण्यासाठी ‘आपले सरकार’ या पोर्टलवर छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे संकेतस्थळ उघडण्यात आले. यावर कर्जमाफीची स्थिती जाणून घेण्यासाठी दोन स्वतंत्र ‘लिंक’ देण्यात आल्या होत्या. मात्र ‘त्या’ बंद करण्यात आल्याने हेल्पलाइन क्रमांकही गायब झाला आहे. त्यामुळे कर्जमाफीची माहिती सरकार लपवीत आहे, अशी टीका शेतकऱ्यांनी केली आहे.
राज्यात कर्जमाफीची घोषणा झाली. अतिशय कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केलेत. त्यानंतरसुद्धा त्यांच्या पदरी निराशाच पडली. कर्जमाफीसंदर्भात सातत्याने होत असणारे बदल, प्रायोगिक तत्त्वावर काही शेतकऱ्यांची दर्शविलेली कर्जमाफी, असा गोंधळ सुरू झाला आहे.
राज्य शासनाच्या ‘आपले सरकार’ या वेब पोर्टलवर शेतकरी कर्जमाफीसदंर्भात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे स्वतंत्र संकेतस्थळ उघडण्यात आले. या संकेतस्थळावर उजव्या बाजूला आणखी दोन वेगळ्या लिंक देण्यात आल्या होत्या. त्यातून अर्ज भरतेवेळी शेतकऱ्याला मिळालेला आयडी टाकून आपल्या कर्जमाफीची माहिती मिळणार होती. काही दिवसांपर्यंत या लिंक सुरू होत्या. आता या दोन्ही लिंक हटविण्यात आल्या आहेत. संकेतस्थळावरील हेल्पलाइन क्रमांकसुद्धा गायब झाला आहे.
शेतकरी कर्जमाफीचे संकेतस्थळ उघडल्यानंतर कर्जमाफी वितरण, नियंत्रण यंत्रणा अशाप्रकारचा संदेश आहे. त्याखाली ‘युजरनेम’ व ‘पासवर्ड’चे रकाने आहेत. सुरुवातीच्या दोन्ही लिंक हटविल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. आपली आयडी टाकून कर्जमाफीची स्थिती बघण्याचा प्रयत्न करीत आहेत. संकेतस्थळावरील हेल्पलाइन क्रमांक हटविला आहे.

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...