गोंदिया,दि.01ः- शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकार आणि विरोधकांचे दावे-प्रतिदावे सुरू आहेत. अशातच शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जमाफीची माहिती देण्यासाठी ‘आपले सरकार’ या पोर्टलवर छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे संकेतस्थळ उघडण्यात आले. यावर कर्जमाफीची स्थिती जाणून घेण्यासाठी दोन स्वतंत्र ‘लिंक’ देण्यात आल्या होत्या. मात्र ‘त्या’ बंद करण्यात आल्याने हेल्पलाइन क्रमांकही गायब झाला आहे. त्यामुळे कर्जमाफीची माहिती सरकार लपवीत आहे, अशी टीका शेतकऱ्यांनी केली आहे.
राज्यात कर्जमाफीची घोषणा झाली. अतिशय कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केलेत. त्यानंतरसुद्धा त्यांच्या पदरी निराशाच पडली. कर्जमाफीसंदर्भात सातत्याने होत असणारे बदल, प्रायोगिक तत्त्वावर काही शेतकऱ्यांची दर्शविलेली कर्जमाफी, असा गोंधळ सुरू झाला आहे.
राज्य शासनाच्या ‘आपले सरकार’ या वेब पोर्टलवर शेतकरी कर्जमाफीसदंर्भात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे स्वतंत्र संकेतस्थळ उघडण्यात आले. या संकेतस्थळावर उजव्या बाजूला आणखी दोन वेगळ्या लिंक देण्यात आल्या होत्या. त्यातून अर्ज भरतेवेळी शेतकऱ्याला मिळालेला आयडी टाकून आपल्या कर्जमाफीची माहिती मिळणार होती. काही दिवसांपर्यंत या लिंक सुरू होत्या. आता या दोन्ही लिंक हटविण्यात आल्या आहेत. संकेतस्थळावरील हेल्पलाइन क्रमांकसुद्धा गायब झाला आहे.
शेतकरी कर्जमाफीचे संकेतस्थळ उघडल्यानंतर कर्जमाफी वितरण, नियंत्रण यंत्रणा अशाप्रकारचा संदेश आहे. त्याखाली ‘युजरनेम’ व ‘पासवर्ड’चे रकाने आहेत. सुरुवातीच्या दोन्ही लिंक हटविल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. आपली आयडी टाकून कर्जमाफीची स्थिती बघण्याचा प्रयत्न करीत आहेत. संकेतस्थळावरील हेल्पलाइन क्रमांक हटविला आहे.
No comments:
Post a Comment