Sunday, 17 December 2017

आता लढाई शेतकरी व बहुजनांची- नाना पटोले


गोंदिया - गरीब, शेतकऱ्यांच्या भरवशावर राज्यात आणि केंद्रात भाजपाची सरकार आली. मात्र, सत्ता हातात येताच सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांकडे पाठ फिरविली आहे. या सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आपण रस्त्यावर उतरणारच. आता लढाई शेतकरी व बहुजनांची आहे, अशी डरकाळी खासदारकीचा राजीनामा देणारे नाना पटोले यांनी फोडली. त्याचवेळी प्रफुल्ल पटेल यांना आपण कमजोरांच्या विरोधात नव्हे तर तगडा उमेदवार असेल तर निवडणूक लढवणार असा टोला हाणला.

राजीनामा दिल्यानंतर जिल्ह्यात प्रथम आगमनाप्रित्यर्थ शनिवारला हिंदी टाऊन शाळेच्या ग्रॉऊंडवर त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. नाना पटोले पुढे म्हणाले, संवैधानिक व्यवस्थेत शेतकऱ्यांचा मोठा वाटा असला पाहीजे. मी खूर्ची भोगायला संसदेत गेला नव्हतो. ज्या जनतेने मला निवडून दिले, त्या जनतेला न्याय देता आले पाहीजे, ही माझी भूमिका राहीली आहे. परंतु, प्रधानमंत्री हे खासदार जिथे मतांचे राजकारण करून गळा कापण्याचा प्रकार सुरू होतो आणि अशा खुर्चीवर मी कधीच बसत नाही. आता नवीन स्वातंत्र्याची लढाई सुरू झाली आहे.
लोकशाहीच्या ७१ वर्षातही दररोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. गरीबांच्या घरात दिवा पेटत नाही, त्यांना त्यांचे मुलभूत अधिकार मिळत नाही. त्यामुळे साकोलीच्या या भूमितून शेतकरी, गरीबांच्या उत्थानाची नवी लढाई सुरू होत असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्तेत असताना आपण भंडारा- गोंदिया जिल्ह्यातील प्रकल्पांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. धापेवाडा, काटी,पिडंकेपारसह जय वाघाच्या मुद्यावरही आपण प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. नाना पटोले भविष्यात आपल्यावर जड जाईल म्हणून या जिल्ह्याच्या विकासाकडे राज्य व केंद्र सरकारने दुर्लक्ष केले आहे. माझ्या राजीनाम्याने या क्षेत्राची पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे नागपूरचा विकास भंडारा-गोंदियाकडे धावत येणार आहे. तुम्ही गावातील अनेक कामांची यादीच आपल्या आमदाराकडे सोपवा कारण नागपूरचा विकास आता गोंदिया-भंडाराकडे झपाट्याने येणार आहे. माझ्या राजीनाम्याने या दोन्ही जिल्ह्याच्या विकासाची नवी पहाट सुरु होणार असल्याचे सांगत जनतेने आता जागृत झाले पाहीजे, असे म्हणाले. 

या सरकारने शेती पिकांना भाव दिला नाही, स्वामिनाथन आयोगाची शिफारस लागू केली नाही, विजेचे दर वाढविले, भारनियमन व शिष्यवृत्तीला न्याय नाही, जीएसटीमुळे उद्योग बुडाले, आत्महत्या वाढत आहेत. मात्र, सरकार आजही विकासाचा गवगवा करीत आहे. कर्जमाफिच्या नावाखाली लोकांचे खिशे कापण्याचे काम सुरू आहे. कर्जमाफी झाली नाही तर सत्ताधाऱ्यांना एकाही गावात फिरू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. मागास राज्य धानाला २९०० रुपयाचा हमीभाव देतात मग मी राज्यसरकारने सुध्दा द्यावी केलेली मागणी चुकीची कशी आहे. हे माझ्यावर टीका करणारे आणि काम न केलाच्या आरोप करतात त्यांनी सांगावे.मी केलेल्या कामाचा गवगवा करायला येथे आलो नाही, तर राजीनामा का दिला हे सांगायला आलो आहे. मी काही काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला नसून भविष्यात तुम्हाला मोठा बदल बघावयास मिळेल असा सुचक इशारा त्यांनी दिला. यापुर्वी त्यांचे गोंदिया रेल्वेस्थानकावर भव्य स्वागत करण्यात आले. मंचावर बालाघाटचे माजी खासदार कंकर मुंजारे, माजी आमदार रामरतन बापू राऊत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष टोलसिंह पवार,अ‍ॅड.के.आर.शेंडे,जिल्हा परिषद सभापती पी.जी.कटरे, विनोद जैन, झामसिहं बघेले,नामदेव किरसान, आशा उईके, ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष बबलू कटरे, प्रमोद लांजेवार, भागवत नाकाडे, दामोदर नेवारे, संजय टेभंरे, अपूर्व अग्रवाल, डॉ.योगेंद्र भगत, अनिलकुमार गौतम, हुकुमचंद बहेकार,जगदिश येरोला,होमराज ठाकरे,जितेंद्र कटरे,विशाल शेंडे,विवेक मेंढे,निलम हलमारे,राजीव ठकरेले,सुनील भरणे,अशोक चांडक,विनोद पटोले,श्री डांगे,भरत काथरानी आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. प्रास्तविक अमर वराडे यांनी केले. जाहिर सभेला हजारोच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...