Wednesday 27 December 2017

महिलांनी व्यवस्थाभंजक भूमिका घ्यावी -वैशाली डोळस


चंद्रपूर,दि.26 : आम्ही स्वत:ला बाबासाहेबांचे अनुयायी म्हणतो. परंतु, खरोखरच आमच्या डोक्यातील मनुस्मृतीचे दहन ख-या अर्थाने झाले का? उंबरठ्याबाहेर आम्ही परिवर्तनवादी आणि आतमध्ये मनुवादी असतो. परिवर्तनवादी चळवळीतील पुरुषसुद्धा घरात समतेने वागत नाहीत. त्यामुळे महिलांनी व्यवस्थाभंजक भूमिका घेऊन सर्व प्रकारची गुलामगिरी झुगारावी, असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत वैशाली डोळस यांनी व्यक्त केले. भद्रावती येथे तालुका भारीप बहुजन महासंघाच्या वतीने पार पडलेल्या स्त्रीमुक्ती परिषदेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मोनालीसा देवगडे यांनी या परिषदेचे उद्घाटन केले. मंचावर स्वागताध्यक्ष सीमा ढेंगळे, भारीप बमसंचे वर्धा व यवतमाळ जिल्हा पक्ष निरीक्षक कुशल मेश्राम, रोहीत वेमुला यांच्या मातोश्री राधिका वेमुला, गोविंद पानसरे यांच्या कन्या स्मिता पानसरे, कपूर दुपारे, भामसं जिल्हाध्यक्ष जयदीप खोब्रागडे, जिल्हा महिलाध्यक्ष लता साव, सुरज गावंडे, सुनील खोब्रागडे, धीरज बांबोळे, सेवचंद्र नागदेवते, कविता गौरकर, अविंता उके, कल्पना अलोणे, निशा ठेंगरे, तनुजा रायपुरे, लता टिपले, रजनीकुंदा रायपुरे, माया देवगडे, निर्मला शिरसाट, माया महाकुलकर, राजा वेमुला, पद्मा इलन दुल्ला आदी उपस्थित होते. एकदिवसीय स्त्रीमुक्ती परिषदेत विविध सत्रांमध्ये महिलांच्या मूलभूत प्रश्नांची मांडणी करण्यात आली.

रोहित वेमुला यांच्या मातोश्री राधिका वेमुला म्हणाल्या, भारताला गुलाम बनवण्यात मनुस्मृतीचा मोठा हात आहे. आपण सगळ्यांनी डॉ. आंबेडकरांच्या विचारांनी चालले पाहिजे. मनुस्मृती महिलांना गुलाम बनविते. त्यामुळे तिचे पालन का करायचे? समानता नाकारणाºया  मनुुस्मृतीचे दहन योग्यच असून, मी हिंदू धर्मातून बाहेर पडण्याचा विचार करीत आहे.अलीकडच्या काळात सत्ताधा-यांकडून लादली जाणारी नवीन मनुस्मृती अधिक घातक आहे. पुराणमतवादी विचारांची मंडळी घटनाद्रोही राजकारण करीत आहेत. शिवाय, सत्ताधारी वर्ग सरकारी यंत्रणांचा गैरवापर करीत आहेत. हा प्रकार बंद झाला पाहिजे, असे  मत  अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या कन्या स्मिता पानसरे यांनी व्यक्त कले.
महिलांच्या राजकीय व सामाजिक सक्षमीकरणासंदर्भात  चळवळीच्या अभ्यासक तसेच कार्यकर्तींनी सम्यक मांडणी करून आंदोलनाची गरज व्यक्त केली. रजनीकुंदा रायपुरे, पौर्णिमा पाटील, सीमा ढेंगळे, लता साव, जयदीप खोब्रागडे, कुशल मेश्राम,  आदींनीही मार्गदर्शन केले. लोकशाहीर बाबुराव जुमनाके यांनी ‘जन बदल घालूनी धाव’ हा संगीतमय, तर औरंगाबाद येथील लोकशाहिर मेघानंद जाधव यांनी आंबेडकरी जलसा सादर केला. संचालन राखी रामटेके व प्रास्ताविक लता टिपले यांनी केले. वैशाली चिमूरकर यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...