Saturday 16 December 2017

‘ओबीसी शिष्यवृत्तीचे ९०० कोटी थकवले’-आ.गजभियेंचा आरोप



नागपूर,दि.16 – ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी केंद्र शासनातर्फे दिली जात असलेली मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती भाजपची सत्ता आल्यापासून बंद केल्याचा आरोप  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी शुक्रवारी सभागृहात केला. शिष्यवृत्तीचे दोन वर्षांचे तब्बल ९०० कोटी रुपये थकीत असल्याचेही त्यांनी सांगितले.केंद्र सरकार शिष्यवृत्तीची थकीत रक्कम देत नसल्यास त्याची पूर्तता राज्यसरकारने करावी व ई-शिष्यवृत्तीचे तांत्रिक कारणाने अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज भरले गेलेले नाहीत. त्याची मुदत वाढवावी, अशी मागणी विधान परिषदेत औचित्याच्या मुद्याद्वारे गजभिये यांनी केली.
सरकारने ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी यांची वार्षिक मर्यादा ४४ हजार ५०० वरून एक लाख रुपये केल्याने केंद्रातील भाजप सरकारने ओबीसींसाठी होणारा वार्षिक वाढीचा खर्च राज्य शासनाने करावा असे कळविले आहे. त्यामुळे इतर  मागासवर्गीय ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे अनुदान प्राप्त झाले नाही. भाजप सरकारने शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज अनिवार्य केले. सरकारने ई-शिष्यवृत्तीच्या कामासाठी पुणे येथील मास्कटेक  कंपनीसोबत ३० एप्रिल २०१६ रोजी करार केला. मात्र, सॉफ्टवेअरमध्ये असंख्य त्रुटी असल्याने २०१६-२०१७ या शैक्षणिक वर्षांत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला नाही. पुन्हा नव्याने २०१७-२०१८ या वर्षासाठी ई-शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा यासाठी ‘महाडीबीटी’अंतर्गत नागपूर येथील इन्व्होलेव मेसर्स कंपनीला कंत्राट सोपविले. ती कंपनीही अयशस्वी ठरली. ई-शिष्यवृत्तीसाठी इतर  मागासवर्गीय ओबीसी विद्यार्थ्यांचे अर्ज भरले गेले नाहीत. याला भाजप सरकार जबाबदार आहे, असा आरोपही गजभिये यांनी सभागृहात केला.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...