नागपूर दि.१०: वेगळ्या विदर्भसाठी लढा देणाऱ्या सर्व विदर्भवादी संघटनांच्यावतीने येत्या ११ डिसेंबरला हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विदर्भ बंद पाळण्यात येणार आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने आयोजित संयुक्त पत्रपरिषदेत माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनी केंद्र व राज्यातील भाजपा सरकारवर हल्ला चढविला. विदर्भ राज्याचे लिखित आश्वासन देणाऱ्या भाजपाने विदर्भाच्या जनतेचा विश्वासघात केला असून आता आरपारच्या लढाईशिवाय पर्याय नसल्याचे ते म्हणाले. विदर्भाच्या मागणीला जनतेचा पाठिंबा नाही अशा भ्रमात असलेल्या भाजपा सरकारला हे आंदोलन जागे करणारे ठरेल, असा दावा अॅड. वामनराव चटप यांनी केला.
अॅड. वामनराव चटप म्हणाले, भाजपाच्या विद्यमान नेत्यांनी वेगळ्या विदर्भ राज्यासाठी आंदोलन केले. प्रतिज्ञापत्रावर वेगळा विदर्भ देण्याचे आश्वासन दिले. मात्र आता ते घूमजाव करीत आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा विदर्भ आमच्या अजेंड्यावर नाही असे सांगतात तर सक्षम केल्यानंतर विदर्भ देण्याची भाषा केंद्रीय मंत्री गडकरी करीत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यात सरकार अपयशी ठरले असून विदर्भ राज्य झाल्याशिवाय पर्याय नाही, असे चिठ्ठीत नोंदवून वाशिमच्या ज्ञानेश्वर मिसाळ नामक शेतकऱ्याने आत्महत्या केली. तरीही सरकार जागे होत नाही. याला सडेतोड उत्तर म्हणून ११ डिसेंबरला विदर्भ बंद पाळण्यात येणार आहे. या आंदोलनाला विदर्भ राज्य आघाडी, जनमंच, विदर्भ माझा, विदर्भ कनेक्ट, जनसुराज्य पार्टी, रिपब्लिकन पक्षाचे सर्व गट, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी (बीआरएसपी) , बहुजन सेना, आम आदमी पार्टीने पाठिंबा जाहीर केला. विदर्भातील सर्व जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. यासोबत सर्व संघटनांचे नेते व्हेरायटी चौकात आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला राम नेवले, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, प्रबीरकुमार चक्रवर्ती, अरुण केदार, विष्णू आष्टीकर, नीरज खांदेवाले, देवेंद्र वानखेडे, बाळू घरडे, राजेश बोरकर यांच्यासह विविध संघटना, पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील नाराजीतून नाना पटोले यांनी खासदार पदाचा व भाजपाचा राजीनामा दिल्यानंतर आता पक्षाचे काटोलचे आमदार आशिष देशमुख यांनीही वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सहापानी पत्र पाठवून जाब विचारला आहे. केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता असताना या अनुकूल परिस्थितीत आपण इच्छाशक्ती दाखवली नाही तर विदर्भातील जनता आपल्याला व आपल्या पक्षाला माफ करणार नाही, अशी रोखठोक भूमिकाही देशमुख यांनी पत्रात मांडली
No comments:
Post a Comment