Friday, 29 December 2017

जिल्ह्यात सेंद्रीय शेतीची चळवळ जोमात;५१० क्विंटल सेंद्रीय तांदूळ उपलब्ध

ग्राहकांनी केली ३३१३ क्विंटल धानाची मागणी

गोंदिया,दि.२९ : धानाचे कोठार म्हणून जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्याचे मुख्य पीक हे धान आहे. त्यामुळे जिल्ह्याची अर्थव्यवस्था देखील बहुतांशी धानावरच अवलंबून आहे. आधुनिकतेच्या या जगात आज प्रत्येकाला घाई झालेली आहे. रासायनिक खते व किटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर करुन धान व अन्य पिके शेतीतून घेण्यात येतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विषयुक्त अन्न खाण्यात येते. त्याचे दुष्परिणाम देखील माणसाच्या शरीरावर होवू लागले आहे. विषमुक्त अन्न प्रत्येकाच्या आहारात असले पाहिजे यासाठी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला चालना दिली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी आता सेंद्रीय शेतीकडे वळत आहे.
परंपरागत कृषि विकास योजना सन २०१६-१७ या वर्षात कृषि आयुक्तालयाने जिल्ह्यात २० सेंद्रीय शेती गटास मंजूरी प्रदान केली. जिल्हा नियोजन समितीने देखील यात पुढाकार घेवून ३१ सेंद्रीय शेती गटास मंजूरी दिली. जिल्हा हा जैवविविधतेने समृध्द असल्यामुळे आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तलाव असल्यामुळे अनेक स्थलांतरीत व विदेशी पक्षी या तलावांवर आपली उपजिविका करतात. यामध्ये राज्यात केवळ गोंदिया जिल्ह्यातच आढळणाऱ्या सुंदर अशा सारस पक्षांचा देखील समावेश आहे. सारस पक्षाचे संगोपन, सेंद्रीय तांदूळ पिकविणाऱ्याला आर्थिक लाभ आणि लोकांना विषमुक्त तांदूळ पुरविणे असा तिहेरी संगम जिल्हाधिकारी काळे यांनी साधून जिल्ह्यात ५१ गटामार्फत एकूण २३७२ शेतकऱ्यांना शासनाच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे सेंद्रीय शेती करण्यास प्रोत्साहीत केले आहे.
जिल्ह्यातील या २३७२ शेतकऱ्यांकडून जय श्रीराम, एचएमटी, चिन्नोर इत्यादी वाणाचा एकूण ५१० क्विंटल तांदूळ उपलब्ध होणार आहे. सेंद्रीय तांदूळाचे महत्व जाणून घेवून त्याची चव चाखता यावी यासाठी जिल्हाधिकारी काळे यांच्या संकल्पनेतून सेंद्रीय तांदूळाचा प्रचार-प्रसिध्दी करण्यासाठी भात शिजवून खाऊ घालण्याचा कार्यक्रम जिल्ह्यात विविध ठिकाणी आयोजित करण्यात आला. यामध्ये २८०० लोकांनी सेंद्रीय तांदूळाच्या भाताची चव चाखली. जिल्हास्तरावरील व तालुकास्तरावरील विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, विविध धार्मिक संस्था, सामाजिक संस्था यांनी या सेंद्रीय भाताची चव चाखली. त्याचाच परिणाम म्हणून सेंद्रीय तांदळाचा प्रचार व प्रसार सोबतच त्याबाबत जनजागृती झाल्यामुळे सेंद्रीय तांदळाची ३३१३ क्विंटलची मागणी लेखी स्वरुपात कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)च्या प्रकल्प संचालकाकडे नोंदविण्यात आली.
विषमुक्त तांदूळ जास्तीत जास्त लोकांनी खावा त्यामुळे लोकांचे आरोग्य चांगले राहील तसेच कर्करोगापासून देखील मुक्त राहण्यास मदत होईल. जिल्ह्यात सारस पक्षांचा अधिवास असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीला जिल्हाधिकारी काळे यांनी भेट देवून त्यांच्याशी संवाद साधला. सारसांचे अस्तित्व कायम राहावे व त्यांच्यात वाढ व्हावी यासाठी संबंधित शेतकऱ्यांना सेंद्रीय शेती करुन विषमुक्त तांदूळ पिकविण्यास प्रोत्साहीत केले. त्यामुळे हे शेतकरी आता सेंद्रीय शेतीकडे वळले असून या शेतीतून सेंद्रीय पध्दतीने पिकविलेला धान घेत आहे. त्यामुळे त्यांच्या तांदूळाला जास्त किंमत मिळण्यास मदत होत आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...