पुणे,दि.18 : मांजरी येथील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या वार्ताहराला सहायक पोलीस आयुक्त नीलेश मोरे यांनी शनिवारी मारहाण केल्याची घटना घडली.
शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी गेल्या दोन दिवसांपासून विविध मागण्यांबाबत बेमुदत उपोषण सुरू केले आहे. शनिवारी ‘लोकसत्ता’चे वार्ताहर ज्ञानेश भुकेले या घटनेचे वार्तांकन करण्यासाठी वसतिगृहाच्या आवारात गेले होते. आंदोलनाच्या ठिकाणी बंदोबस्तासाठी असलेले वानवडी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त नीलेश मोरे हे भुकेले यांच्याकडे आले. तू मोबाइलवर रेकॉर्डिंग का करतो अशी दमबाजी त्यांनी केली. आपण वार्ताहर असल्याने सांगून भुकेले यांनी मोरे यांना ओळखपत्रही दाखविले. त्या वेळी शासकीय अधिकारी प्रसाद आयुषही तेथे होते. भुकेले यांनी मोबाइलवर केलेले रेकॉर्डिंग काढून टाकण्याची मागणी सुरुवातीला आयुष यांनी केली. भुकेले यांनी त्यास नकार दिला. त्यानंतर मोरे यांचा पारा चढला. त्यांनी आणि त्यांच्यासोबत असलेल्या पोलीस कर्मचाºयांनी भुकेले यांना ओढून नेत थेट पोलीस व्हॅनमध्ये बसविले. पोलीस व्हॅनमध्येच भुकेले यांना मारहाण केली. थेट हडपसर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. भुकेले यांना धमकावून त्यांच्याकडून जबरदस्तीने माफीनामा लिहून घेतला. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करतो, अशी धमकी देऊन मोबाइलमध्ये केलेले रेकॉर्डिंग काढून टाकण्यास सांगितले. याप्रकरणी पोलीस उपायुक्त दीपक साकोरे यांनी स्वत: या प्रकरणात लक्ष घालून चौकशी करणार असल्याचे सांगितले़
No comments:
Post a Comment