Friday 29 December 2017

ग्रामसेवक १ जानेवारीपासून सरकारी व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप सोडणार!

गोंदिया,दि.28 : शासकीय कामकाजाच्या नावाखाली व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत आहे. शासकीय कामाचे आदेश, विविध उपक्रम, बैठकांचा निरोप ऐनवेळी दिल्याने ग्रामसेवकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. त्यातून अनेकांना विविध आजार बळावत आहेत, त्यामुळे राज्यातील सर्व ग्रामसेवक सरकारी व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप येत्या १ जानेवारीपासून सोडणार असल्याचे पत्र महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांना मंगळवारी पाठविल्याच्या माहितीला गोंदिया जिल्हा ग्रामसेवक संघटनेच्यावतीने दुजोरा देण्यात आला आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती कार्यालयांकडून व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपची निर्मिती करण्यात आली. त्याचा मोठ्या प्रमाणात गैरवापर सुरू आहे. वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी रात्री-अपरात्री केव्हाही धमकीवजा आदेश देतात. तत्काळ कामांसाठी आदेश सोडतात, त्यामुळे कायदे, नियम मोडीत काढले जात आहेत. ऐनवेळी कामाच्या आदेशामुळे ग्रामसेवकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. हृदयरोग, रक्तदाबाच्या तक्रारी आहेत. ग्रामसेवकांना आधीच अतिरिक्त कामांचा ताण आहे, त्यामुळे आत्महत्यांचे प्रमाणही वाढले आहे. हे प्रकार टाळण्यासाठी सरकारी व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपमधून बाहेर पडण्याचा निर्णय युनियनने घेतला आहे. त्याचवेळी इतर अधिकृत संगणकीय प्रणालीचा वापर करण्याचेही ठरले. त्याबाबतचे निवेदन ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे, सरचिटणीस प्रशांत जामोदे यांनी प्रधान सचिवांसह सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना पाठविले आहे.
सरकारी व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप सोडण्यासोबतच शासनाचे विविध उपक्रम राबवण्यासाठी स्वत:च्या स्मार्ट फोनवर कोणतेही अ‍ॅप डाउनलोड न करण्याचेही ठरविण्यात आले. त्यामध्ये एसबीएम फोटो अपलोड करणे, पीक कापणी प्रयोग अ‍ॅप, जियो टॅगिंग कामाचा समावेश आहे. ग्रुप सोडण्यामुळे शासकीय कामकाजावर परिणाम होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असेही निवेदनात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...