नागपूर : भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न फसल्यानंतर नागपूरकडे पळून येत असलेल्या दरोडेखोरांनी नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांवर चक्क रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केला. ही घटना नागपूर जिल्ह्यातील मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माथनी येथे सोमवारच्या मध्यरात्री घडली.
घटना अशी की, दरोडेखोरांनी सोमवारी रात्री तुमसर (जिल्हा भंडारा) येथील एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. ही बाब नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी दरोडेखोरांचा पाठलाग केला. मात्र, त्यांनी डीएल-३ सी/एएस-४९१३ क्रमांकाच्या कारने घटनास्थळाहून पळ काढला. हे दरोडेखोर भंडारा मार्गे नागपूरच्या दिशेने पळाले असल्याची माहिती नियंत्रण कक्षाद्वारे मौदा पोलिसांना देण्यात आली. त्यामुळे मौदा ठाण्यातील रमेश येडे, किशोर नारायणे, हेमराज सोनवणे, दीपक पोटफोडे यांनी माथनी शिवारातील टोल नाक्यावर नाकाबंदी करून नागपूरच्या दिशेने जाणाºया वाहनांची तपासणी करायला सुरुवात केली.
दरम्यान, पोलिसांनी डीएल-३ सी/एएस-४९१३ क्रमांकाची कार थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यातच चालकाने कार थांबवून थोडी मागे घेतली आणि कारमधील एकाने पोलीस कर्मचारी रमेश येडे यांच्या दिशेने गोळी झाडली. सुदैवाने यात त्यांना दुखापत झाली नाही. कारमधील दुसऱ्याने किशोर नारायणे यांच्यावर रिव्हॉल्व्हर रोखले होते. दरोडेखोरांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, चालकाचा ताबा सुटल्याने कार दुभाजकावर आदळली. या धावपळीत आरोपींनी कार तिथेच सोडून पळ काढला. दरोडेखोर २५ ते ३० वर्षे वयोगटातील असून, त्यांची संख्या कळू शकली नाही. या प्रकरणी मौदा पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भादंवि ३०७, ३५३, ३४ व आर्म अॅक्ट सहकलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
No comments:
Post a Comment