Monday 11 December 2017

शेतकऱ्यांसह बेरोजगारांना सरकारने वाऱ्यावर सोडले-सहेसराम कोरेटे

देवरी, दि.11-  राज्यात शेतकऱ्यांची परिस्थिती हलाखीची आहे. युवकांच्या हाताला काम नाही. आपल्या जिल्ह्यात तर धान उत्पादक शेतकऱ्यांची अत्यंत दुरवस्था आहे. यावर्षी कमी पाऊस झाल्याने केवळ 15 टक्के धानाची रोवणी झाली. यातही पिक हाताशी असताना किडीचा प्रादुर्भाव झाला. युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन सुद्धा पाळले जात नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला सरकार हुलकावणी देत आहे. शेतकऱ्यांना दुष्काळी स्थितीत मायेचा हात देण्याएेवजी आणि युवकांना रोजगार देण्याचे सोडून त्यांना वाऱ्यावर सोडले आहे. अशा सरकारला आपण जाब विचारला पाहिजे, असे वक्तव्य गोंदिया जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे महासचिव सहेसराम कोरेटे यांनी काल रविवारी ( दि.10 ) केले.
ते मुल्ला येथे आयोजित एका नाटकाचे उद्घाटक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार रामरतन राऊत होते. रंगमंचपूजक म्हणून दिलीप श्रीवास्तव उपस्थित होते. मंचावर मुल्ला ग्रामपंचायतीचे सरपंच गौपाले, उपसरपंच सीमा नाईक, पं.स. सदस्य महेंद्र मेश्राम, माणिक आचले, गणेश भेलावे, राजेश राऊत, पुरण मटाले, के.एस. वैष्णव,संदीप तिडके, ग्राम पंचायत सदस्य आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी खातिया येथील जिल्हा परिषद शाळेतून सेवानिवृत्त झालेल्या मुख्याध्यापिका पुष्पलता  बागडे यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफल देऊन सत्कार करण्यात आला.
अध्यक्षस्थानावरून बोलताना माजी आमदार रामरतन राऊत म्हणाले की, आता शेतकऱ्यांनी पारंपारिक धान पिकाला फाटा देत सेंद्रीय शेतीचा अंगिकार केला पाहिजे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला उत्तम भाव मिळून धान उत्पादक शेतकऱ्यांचा दर्जा उंचावण्यास मदत होईल. यावेळी त्यांनी भाजपचे खासदार नाना पटोले यांनी भाजपचा राजीनामा देण्याच्या मुद्याला हात लावला. केंद्र व राज्यातील सरकार हे शेतकरी आणि बेरोजगारविरोधी तर आहेच, पण ओबीसीच्या हिताला विरोध करणारे सुद्धा आहे. ते पुढे म्हणाले की, नानाभाऊ सारख्या अभ्यासू आणि कार्यतत्पर लोकप्रतिनिधीने भाजपमध्ये असताना केवळ शेतकरी आणि ओबीसी या दोन मुद्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. परंतु, केंद्रात सरकारचे नेतृत्व करणारे नरेंद्र मोदी यांनी वारंवार त्यांचा अपमान केला. त्यामुळे केद्र व राज्यातील सरकार हे सर्वसामान्यांच्या मतावर सत्तेत आले तर खरे पण त्याच सर्वसामान्य शेतकरी, युवक आणि ओबीसींना देशोधडीला लावण्याचे काम करीत असल्याची टीका सुद्दा त्यांनी यावेळी बोलताना केली. यावेळी इतर मान्यवरांनी सुद्धा समयोचिक मार्गदर्शन केले.
संचालन नरेंद्र वंजारी यांनी केले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...