नवी दिल्ली,दि.21(वृत्तसंस्था)- हिमाचल प्रदेश विधानसभेत सलग पाचवेळा आमदार राहिलेले भाजप नेते जयराम ठाकूर यांची मुख्यमंत्रिपदी नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती आहे. याबाबत औपचारिक घोषणा शुक्रवारी होणार आहे.
ठाकूर यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सेरज विधानसभा मतदार संघातून विजय मिळवला. मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमल यांचा पराभव झाल्याने त्यांच्या जागी आता जयराम ठाकूर यांचे नाव चर्चेत आहे.
हिमाचल प्रदेश विधानसभेच्या 68 जागांपैकी भाजपने 44 जागा जिंकून विजय मिळवला आहे. तर काँग्रेसने 21 जागा मिळवल्या आहेत. भाजपने बहुमत मिळवल्यानंतर आता राज्यात सत्ता स्थापन करणार आहे. यासाठी निवडणुकीपूर्वी पक्षाने प्रेमकुमार धुमल यांची मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्याने जयराम ठाकूर यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार करण्यात आले आहे. ते आता मुख्यमंत्रिपदी लवकरच विराजमान होणार आहेत.
भाजपच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन आणि शहर विकासमंत्री नरिंदर सिंह तोमर हे सिमला येथे गुरुवारी उपस्थित राहणार आहेत.ठाकूर यांना यापूर्वीच त्यांची मुख्यमंत्रिपदी नियुक्ती केली जाणार असे सांगण्यात आले होते. तसेच याबाबत पक्षाची बैठक झाली होती. सीतारमन, तोमर, वरिष्ठ नेते शांताकुमार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतपाल सत्ती या नेत्यांसोबत बैठक होणार असून, त्यानंतर सरकार स्थापन करण्याबाबत विचार करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment