औरंगाबाद,दि.29: तक्रारदार प्राध्यापकावर निलंबनाची कारवाई न करता त्यांची शैक्षणिक कागदपत्रे त्यांना परत देण्यासाठी दहा लाख रुपये लाच घेताना कांचनवाडी येथील जल व भूमी व्यवस्थापन संस्थेच्या(वाल्मी) महासंचालक आाणि सहसंचालक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी सापळा रचून रंगेहात पकडले. हा सापळा आज दुपारी वाल्मीमध्ये यशस्वी करण्यात आला.
वाल्मीचे महासंचालक हरिभाऊ कांचन गोसावी आणि अधीक्षक अभियंता तथा सहसंचालक राजेंद्र बाबुराव क्षीरसागर(५५)अशी लाच घेताना पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याविषयी अधिक माहिती देताना एसीबीचे अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी म्हणाले की, तक्रारदार हे वाल्मी संस्थेत प्राध्यापक आहेत. वाल्मीचे महासंचालक आणि सहसंचालक असलेल्या दोन्ही आरोपींनी तक्रारदार यांना सांगितले की,तुमची नेमणुक चुकीच्या पद्धतीने झालेली आहे. नेमणुकीच्या वेळी दिलेली शैक्षणिक आणि अनुभवप्रमाणपत्रांची पडताळणी करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. याबाबत त्यांनी विविध नोटीसा आणि स्मरणपत्रे तक्रारदार यांना दिली.
काही दिवसापूर्वी आरोपींनी त्यांना हे प्रकरण पुढे नेण्याचे थांबवायचे असेल तर दहा लाख रुपये द्यावे लागतील,अन्यथा तुम्हाला ज्या संस्थेत कायम केले आहे, ते रद्द करून निलंबीत करू, असे धमकावले. काही दिवसापूर्वी तक्रारदार यांनी आरोपी क्षीरसागरची भेट घेतली असता दहा लाख रुपये दिले तरच यातून मार्ग निघू शकेल असे म्हणाले. नंतर तक्रारदाराने महासंचालक गोसावीची भेटून पाच ते सहा लाख रुपये तुम्हाला देऊ शकेल, यापेक्षा अधिक रक्कम देणे मला जमणार नसल्याचे सांगितल्यानंतरही दहा लाख रुपये द्यावेच लागतील असा दम गोसावीने त्यांना दिला. आरोपींना लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी २१ डिसेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात याविषयी तक्रार नोंदविली. तक्रार प्राप्त होताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी लाचेच्या मागणीची पंचासमक्ष पडताळणी केली. या पडताळणीत महासंचालक गोसावी आणि सहसंचालक क्षीरसागर यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडे १० लाखाची लाचेची मागणी केली. आरोपींच्या मागणीनुसार आज वाल्मी येथे पोलिसांनी सापळा रचला.यावेळी गोसावी याने क्षीरसागर यांच्यामार्फत तक्रारदार यांच्याकडून लाचेचे दहा लाख रुपये घेतले. ही रक्कम घेताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्यांना लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले.
No comments:
Post a Comment