नागपूर,दि.18 : नाभिक समाजाचा अनुसूचित जाती प्रवर्गात समावेश करण्यात यावा या मागणीला घेऊन महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्यावतीने सोमवारी विधिमंडळावर मोर्चा धडकला. मोर्चाच्या शिष्टमंडळाने सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांना मागण्यांचे निवदेन दिले. यावेळी बडोले यांनी अधिवेशन संपल्यानंतर याविषयी बैठक बोलविण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे समजते.
नाभिक समाज सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात अतिशय मागासलेला असून त्यांच्या विकासासाठी त्यांचा अनुसूचित जाती प्रवर्गात समावेश करणे गरजेचे असल्याचे महामंडळाचे महासचिव प्रभाकरराव फुलबांधे यांनी सांगितले. मोर्चात संपूर्ण महाराष्ट्रातून नाभिक समाजबांधव सहभागी झाले होते. काही जण हाती भगवा झेंडा तर काहींनी वस्तरा, कैची व कंगव्याचे कटआऊट आणले होते.विशेष म्हणजे या मोर्च्यासोबत माजी खासदार नाना पटोले हे सुध्दा उपस्थित होते.
या मोर्चाचे नेतृत्व भगवानराव बिडवे, प्रभाकरराव फुलबांधे, दत्ताजी अनारसे, अंबादास पाटील आदींनी केले. नाभिक समाजाचा अनुसूचित जाती प्रवर्गात समावेश करावा, नाभिक व्यावसायिकांना गटई कामगाराप्रमाणे लोखंडी टपरी योजना लागू करावी, नाभिक समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, गाळे आरक्षित करून मिळावे, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे, विधान परिषद, राज्यसभा आदी ठिकाणी प्रतिनिधित्व मिळावे, अशा मागण्या या मोर्चाद्वारे करण्यात आल्या.
No comments:
Post a Comment