देवरी,दि.३०- देवरी पंचायत समिती क्षेत्रामध्ये घरकुलाचे बांधकाम झपाट्याने पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विविध योजनेतील घरकुल लाभार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पंचायत समितीमध्ये सुरू आहे. तालुक्याला मिळालेल्या घरकुल बांधकामाचे उद्दिष्टे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून लाभार्थ्यांनी आपल्या अपूर्ण घरकुलाचे बांधकाम वेळेत पूर्ण करावे,असे आवाहन देवरीचे गटविकास अधिकारी मनोज हिरूडकर यांनी केले आहे. दरम्यान, जे लाभार्थी आपल्या घरकुलाचे बांधकाम विहित मुदतीत पूर्ण करणार नाही, अशा लाभार्थ्यांवर फौजदारी गुन्हा नोंदविला जाऊ शकतो, असा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे.
स्थानिक पंचायत समितीमध्ये काल बुधवारी (दि.२९)आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सन २०१० ते २०१६ या कालावधीत मंजूर घरकूलांपैकी दीड हजार घरकुलांचे बांधकाम अद्यापही अपूर्ण आहे. या घरकुलांचे बांधकाम हे येत्या ३१ डिसेंबर अखेर पूर्ण करणे आवश्यक आहे. याशिवाय प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २०१६-१७मधील अपूर्ण असलेल्या ५२९ घरकुलांचे काम येत्या १५ जानेवारी पर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे.
चालू २०१७-१८ या वर्षातील १ हजार १२७ पात्र लाभार्थ्यांनी डिसेंबर २०१७पर्यंत ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे. गेल्या २०११ मधील सामाजिक सर्व्हेक्षणानुसार ५ हजार ३३२ लोकांना अद्यापही घरकुलांचा लाभ मिळणे बाकी असून अशा लाभार्थ्यांना २०२० पर्यंत दुसऱ्या टप्प्यात लाभ पोचविण्याचे उद्दिष्ट्ये आहे. यासाठी लाभार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. या योजनेच्या यशस्वितेसाठी तालुक्यातील सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन श्री. हिरूडकर यांनी केले आहे. ज्या लाभार्थ्यांनी आपले अपूर्ण बांधकाम पूर्ण केले नाही, अशा लाभार्थ्यांवर फौजदारी गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रपरिषदेत शाखा अभियंता मनोहर मडावी, सहायक अभियंता महेंद्र खोब्रागडे, भैय्या रोकडे, आरेखक फुले, स्वप्नील पापडकर आदी कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment