बँक प्रशासन सुरक्षेविषयी उदासीन
सुरेश भदाडे
देवरी,दि.२० - मध्यरात्र उलटली होती. शहर झोपेच्या कुशीत विसावलेले होते. नागरिकांच्या सुरक्षेची हमी घेणारे पोलिस मात्र डोळ्यात तेल ओतून कडक पहारा देत होते. शहराच्या गल्लीबोळातून शिट्ट्या वाजवीत पोलिसांचे गस्ती वाहन राष्ट्रीय महामार्गावरील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेसमोर येते. तेवढ्यात बँकेतील सुरक्षा अलार्म मोठमोठ्याने वाजू लागतो. अन् पोलिसांची तारांबळ उडते. ही घटना देवरी येथे गेल्या मंगळवारी (दि.१४)च्या रात्री २ ते ३ वाजे दरम्यान घडली.
देवरी पोलिसांच्या या धावपळीला कारण सुद्धा तसेच आहे. गेल्या काही वर्षापूर्वी याच राष्ट्रीय महामार्गावरील जैन मंदिर, गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि एका बड्या व्यापाऱ्याच्या घरावर दरोडे पडले होते. त्यावेळी पोलिसांच्या नाकर्तेपणावर सर्वांनी खापर फोडले होते. ते पोलिसांच्या चांगलेच ध्यानात होते. परिणामी, पुन्हा तेच घडू नये, याची भीती साहजिकच पोलिसांना होती. गस्तीपथकातील पोलिस अधिकारी-कर्मचारी आणि चौकात बंदोबस्तासाठी असलेले महिला कर्मचारी सुद्धा त्या बँकेच्या दिशेने धावले. आज मोठा आरोपी गावणार, अशी भाबडी अपेक्षा कदाचित पोलिसांना असणार. पण प्रत्यक्षात मात्र बँकेची इमारत सुरक्षित वाटत होती. पोलिसांनी बँकेच्या सभोवताली चकरा मारल्या खऱ्या, पण काहीच संशयित आढळले नाही. मग पोलिसांनी बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यातही त्यांना यश आले नाही. कारण बँक व्यवस्थापनाने आपत्काळात संपर्क करता यावे, यासाठी दर्शनी भागात संपर्क नंबर लिहिले नव्हते. प्रश्न आणखी बिकट झाला. पोलिसांनी या प्रकाराची सूचना पोलिस निरीक्षक राजेश तटकरे यांना दिली. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखत पोलिसांची संपूर्ण स्टॉफ घटनास्थळी रवाना केला आणि ते सुद्धा जातीने तिथे गेले. मात्र, करायचे काय, हे कोणालाही सुचत नव्हते. बँक अधिकाऱ्यांचे एकही फोन नंबर लागत नव्हते. एवढ्यात नजीकच्या भागी या गावात त्याच बँकेची रोजंदारी कर्मचारी राहत असल्याचे एका पोलिसाने सुचविले, पोलिसांचा मोर्चा भागीच्या दिशेने वळला. त्या महिला कर्मचाऱ्याला रात्री झोपेतून उठवून पोलिसांनी घटनास्थळी आणले. मग बँकेचे दार उघडून सर्वकाही ठीकठाक असल्याची खात्री करण्यात आली. त्या महिला कर्मचाऱ्याने जोरजोरात वाजणारा सुरक्षा अलार्म सेट केला. तेव्हा कोठे पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला.
अपरात्री त्या बँकेच्या रोजंदारी महिला कर्मचाऱ्याला बँकेत येऊन बँकेची काळजी घ्यावी लागली. त्या कर्मचाऱ्याने पोलिसांना दिलेली माहिती फार गंभीर आहे. बँकेत घडणाऱ्या प्रत्येक हालचालीची इत्यंभूत माहिती ही बँकेचे व्यवस्थापक आणि सुरक्षा अधिकारी यांच्या भ्रमणध्वनीवर तत्काळ जात असते. त्यामुळे ती घटनासुद्धा त्या अधिकाऱ्यांना लगेच माहिती झाली असणारच. मग त्या अधिकाऱ्यांनी तत्काळ हालचाल न करणे, ही फार गंभीर बाब आहे. त्यातही असे प्रकार सदर बँकेत नेहमीचेच आहेत, अशी माहिती समोर येत आहे. अशा प्रकारामुळे जर भविष्यात त्या बँकेत एखादा अनुचित प्रकार घडलाच तर मग त्या प्रकाराला जबाबदार कोण? याचा विचार त्या बँकेचे वरिष्ठ अधिकारी करणार की नाही. सुरक्षेची जबाबदारी पोलिसांवर का ढकलली जावी? समजा उद्या एखादा गुन्हा घडलाच तर मग पोलिसांवर खापर फोडणे योग्य होईल काय? त्या दिवशी घडलेल्या प्रकाराला सुद्धा बँक अधिकाऱ्यांनी गंभीरतेने घेतलेले दिसत नाही. पोलिस दप्तरी त्या घटनेची नोंद आहे. पोलिसांनी सुमारे दीड तास त्या बँकेची काळजी घेतली. मात्र, बँकेच्या त्या निगरगट्ट प्रशासनाने पोलिसांचे साधे आभारही मानू नये, यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते? सर्वांच्या सुरक्षेची जबाबदारी एकट्या पोलिसांवरच का? माहिती तंत्रज्ञानाची सोय असताना आपल्या घरी आनंदात झोपणाऱ्या बँकेच्या अधिकाऱ्यांना जर आपल्या संस्थेची काळजी वाटत नसेल, तर त्यांना त्यांच्या जबाबदारीचे भान राखायला त्यांचे वरिष्ठ अधिकारी तरी पावले उचलतील काय? असा प्रश्न देवरीकरांनी भारतीय स्टेट बँकेच्या प्रशासनाला केला आहे. शेवटी पोलिसांनी आपल्या 'सदरक्षणाय, खलनिग्रहणाय' या आपल्या ब्रीद वाक्याचे पावित्र्य जपले, मात्र, ग्राहकांनी बँकेवर टाकलेल्या विश्वासाला अधिकाऱ्यांनी जपावे की नाही, हा त्यांचा प्रश्न आहे. किमान बँक अधिकाऱ्यांनी पोलिसांचे आभार तरी मानायला पाहिजे होते, पण तेही त्यांना जमले नाही.
No comments:
Post a Comment