Saturday, 18 November 2017

विद्यार्थ्यांनो ! मोठी स्वप्ने बघा – पालकमंत्री बडोले

आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहाचे लोकार्पण

Aadivasi Vastigruh-1
सडक अर्जुनी,दि.१८ : राज्यातील ६१ टक्के आदिवासी समाज हा आजही दारिद्रयरेषेखाली जीवन जगत आहे. समाजात शिक्षणाचे प्रमाणही कमी आहे. शिक्षणाच्या कमी प्रमाणामुळे विविध क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये आदिवासी बांधव कमी आहेत. शासन आदिवासी बांधवांच्या विकासासाठी विविध योजना राबवित आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अनेक योजना असून विद्यार्थ्यांनी प्रगती साधण्यासाठी मोठी स्वप्ने बघावी व त्यासाठी कठोर परिश्रम करावे, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
सडक/अर्जुनी येथे १७ नोव्हेंबर रोजी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी कार्यालयाच्या वतीने बांधण्यात आलेल्या आदिवासी मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहाचे लोकार्पण व विविध योजनांच्या साहित्याचे वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार संजय पुराम होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, पं.स.सभापती कविता रंगारी,  जि.प.माजी समाजकल्याण सभापती श्रावण राणा, माजी पं.स.सभापती संतोष मडावी, लक्ष्मीकांत धानगाये, आदिवासी विकास विभागाचे सहायक आयुक्त दिपक हेडावू, उपविभागीय अभियंता प्रकाश लांजेवार, शाखा अभियंता श्री.ताकसांडे, श्री.वासनिक, जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी श्री.घुले, प्राचार्य जाधव यांची उपस्थिती होती.
आमदार पुराम म्हणाले, वसतिगृहाच्या सुविधेमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात नवचैतन्य निर्माण झाले आहे. अनेक मोठ्या व्यक्ती वसतिगृहात शिक्षण घेवून मोठ्या पदावर गेले आहेत. वसतिगृहात राहतांना विद्यार्थ्यांनी आपल्या उज्वल भविष्यासाठी आपल्या शिक्षणाकडे लक्ष दयावे. चांगले शिक्षण घेवून शिक्षणाच्या माध्यमातून वसतिगृहाचा नावलौकीक करावा. विद्यार्थ्यांनी थोर पुरुषांच्या चरित्रांचे वाचन करुन त्यांचा आदर्श पुढे ठेवून शिक्षण घ्यावे असेही ते म्हणाले.प्रारंभी पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते नव्यानेच बांधण्यात आलेल्या आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहाच्या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. नाविण्यपूर्ण योजनेतून क्रीडा विभागाकडून आदिवासी विद्यार्थ्यांना स्पोर्ट गणवेश व कीट देण्यात आली. तसेच आदिवासी लाभार्थ्यांना विविध योजनांच्या साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला आदिवासी वसतिगृहातील मुले-मुली त्यांचे पालक व विविध आदिवासी योजनांचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी यांनी केले. संचालन व उपस्थितांचे आभार जव्हार गाढवे यांनी मानले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...