Saturday, 25 November 2017

आढावा सभेत पीक विम्याला घेऊन सरपंच व पालकमंत्र्यात जुंपली


बीडीओंच्या वक्तव्यावर उपसभापतीसह सरपंचांचा सभात्याग

सडक अर्जुनी,दि.२५ः- राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी सडक अर्जुनी पंचायत समितीच्या विविध विभागाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारला आयोजित केलेल्या बैठकीत सडकअर्जुनी तालुक्यातील सरंपच व पालकमंत्र्यामध्ये पीक विमा योजनेला घेऊन चांगलीच खडाजंगी झाली. तर दुसरीकडे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी लोकरे यांनी ही आढावा सभा सरपंचासाठी असल्याने पंचायत समितीचे पदाधिकारी व जिल्हा परिषद सदस्य कुठलेच मुद्दे उपस्थित करु शकत नाही, असे म्हणताच उपसभापती विलास शिवणकर हे आपल्या समर्थक सरपंचासह पालकमंत्र्यांच्या उपस्थितीतच सभागृह सोडून गेल्याने चांगलीच खळबळ उडाली.
स्थानिक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात शुक्रवारला पंचायत समितीची आढावा सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला पालकमंत्री राजकुमार बडोले,सभापती कविता रंगारी,उपसभापती विलास शिवणकर,गटविकास अधिकारी लोकरे, जिल्हा परिषद सदस्य माधुरी पाथोडे, शिला पटले, रमेश चुऱ्हे,यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते. तसेच तालुक्यातील सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते.
 सरपंच जीवन लंजे,दिनेश हुकरे आदी उपस्थित होते.शेतात पीक उभा असेल आणि अतिवृष्टी किंवा गारपीठमुळेच जर नुकसान झाले तरच तुम्हाला पिक विमाच्या लाभ मिळू शकेल असेल, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी यांनी संबधित शेतकऱ्यांच्या मुद्यावर माहिती दिली. बाम्हणीचे समाजसेवक माधव तरोणे यांनी हा मुद्दा उपस्थितीत केला होता. तेव्हा अनेक सरपंचानी त्यांचे समर्थन केले. घोटीच्या सरपंचानाही मुद्दा उपस्थित केला.त्यावर सरपंचानी पालकमंत्र्यांना तुमचे सरकार व जिल्हाप्रशासन पिक विम्यासाठी गावागावात फिरले. पिक विम्याच्या भरपाईचे कसे होणार, असे विचारताच पालकमंत्र्यांनी हा संबधित विभागाचा प्रश्न असून निकषानुसार मोबदला मिळेल असे सांगत बाजू झटकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही सरपंचांनी आक्षेप नोंदवत बाचाबाची झाल्याने वातावरण थोडे तापले होते. त्यातच गटशिक्षणाधिकारी सर्याम यांनीही चुकीची माहिती पालकमंत्र्यांना दिल्याने पालकमंत्र्यांनी चांगलेच त्यांना धारेवर धरले. ग्रामसभा घेण्याचा अधिकारच नसल्याचे बीडीओ म्हणाल्याने नविन वाद निर्माण झाला आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...