Thursday, 30 November 2017

नक्षल्यांनी केली कोतवालाची हत्या

गडचिरोली, दि.३०: पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी काल(दि.२९)रात्री अहेरी तालुक्यातील दामरंचा उपपोलिस ठाण्यांतर्गत येरमनार येथील एका कोतवालाची गोळी घालून हत्या केली.
रमेश पोचा रामटेके(४०) असे मृत इसमाचे नाव आहे. रमेश रामटेके हा शासकीय कोतवाल नव्हता, तर गावकऱ्यांनी ठेवलेला कोतवाल होता, असे सांगितले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल १५ ते २० सशस्त्र नक्षलवादी रमेश रामटेकेच्या घरी गेले. त्यांनी रमेशला झोपेतून उठवून गावाबाहेर नेले आणि गळा चिरुन त्याची हत्या केली. मागील २१ वर्षांत नक्षल्यांनी केलेली कोतवालाची ही तिसरी हत्या आहे. सर्वप्रथम नक्षल्यांनी ३१ डिसेंबर १९९३ रोजी झिंगानूरचे कोतवाल दुर्गम भाना बक्का यांची हत्या केली होती. त्यानंतर ४ जुलै १९९६ रोजी भामरागडचे कोतवाल केशव भिकाजी पगाडे यांची हत्या केली होती. श्री.पगाडे हेदेखील दलित समाजाचे होते.
तसेच नक्षल्यांनी केलेली ही तिसरी दलित हत्या आहे. यापूर्वी १९ एप्रिल २०१५ रोजी दामरंचाचे उपसरपंच पत्रू बालाजी दुर्गे यांची नक्षल्यांनी हत्या केली होती. त्यावेळी भूमकाल संघटनेने दलित इसमांना नक्षली टार्गेट करीत असल्याबद्दल आवाज उठविला होता. मृत रमेश रामटेके हा एका संघटनेशी संबंधित होता, अशी चर्चा आहे.गेल्या १० दिवसांत नक्षल्यांनी ५ सामान्य नागरिकांची हत्या केली आहे, तर दोन पोलिस जवानांना शहीद व्हावे लागले आहे. येत्या २ डिसेंबरपासून नक्षल्यांच्या पीपल्स लिबरेशन गुर्रिला आर्मीचा स्थापना सप्ताह आहे. या सप्ताहाच्या आधीच नक्षल्यांनी विघातक कारवाया केल्याने पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...