Thursday 23 November 2017

मुलींनो स्वतःला कमी लेखू नका – डॉ परिणिता फुके

लाखनी,दि.23ः-  राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात मला बोलावले त्याबाबद मला आनंद होत आहे, मी मॅनेजमेंट करीत असतांना राणी लक्ष्मीबाईचे मॅनेजमेंट मला अभ्यासायला मिळाले. त्यामुळे मला असे वाटते की, या राणी लक्ष्मीबाई कन्याच्या विद्यार्थिनी ह्या झाशीच्या राणीच्या प्रतिनिधी आहेत. मुलींनो स्वतःला कमी लेखू नका, जीवनात आपले गोल ठरवा आणि त्यानुसार ते यशस्वी होण्यासाठी धडपड करा, खूप अभ्यास करा, मेहनती शिवाय या जगात फुकट काहीही मिळत नाही आणि आपल्या जगण्यात आणि अभ्यासात दृष्टी आणि दृष्टिकोन असणे आवश्यक आहे. आपले करियर हे महत्त्वाचे असताना स्वतःला सांभाळणे संयमता ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे, असे उदगार आपल्या उद्घाटनप्रसंगी नगरसेविका डॉ. परिणिता फुके यांनी काढले.
राष्ट्रीय शिक्षण संस्था लाखनी द्वारा संचालित राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी स्नेहसंमेलनाच्या  उद्घाटक म्हणून डॉ. परिणिता फुके बोलत होत्या. कार्यक्रमाला अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, संस्थाध्यक्ष आल्हाद लाखनीकर, मधुकर लाड उपस्थित होते. जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांनी उच्च ध्येय बाळगा, स्वच्छ चरित्र आणि नेहमी अभ्यासावर लक्ष ठेवण्याची सूचना त्यांनी केली. सतर्क राहा, सावधान राहा, ध्येयासाठी वेडे व्हा, जीवनात अशक्य काहीही नाही फक्त मनाशी निश्चय करा आणि जिद्द, चिकाटी आणि संयम ठेवा असा समर्पक संदेश त्यांनी दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ संध्या हेमणे यांनी केले. अध्यक्षस्थानी आल्हाद लाखनीकर होते. त्यांनी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी प्राची गिऱ्हेपुंजे, दीप्ती खोब्रागडे, दिक्षिता बावनकुळे, येशवर्या बारस्कर या माजी विद्यार्थिनींना पारितोषिक वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांची कवायत, लेझीम, मनोरे, कराटे, आणि नृत्य यावेळी सादर करण्यात आले.
सौ.शिलाताई भांडारकर, मुख्याध्यापिका सौ.संध्या हेमणे, गोवर्धन शेंडे, स्नेहसंमेलन प्रमुख सौ.दिशा गद्रे, स्नेहसंमेलन सहप्रमुख अशोक चामट, विद्या.प्रतिनिधी कु.तनिशा शेख, विद्या.प्रतिनिधी नित्या नवखरे,  प्रल्हाद सोनेवाने, चिंतामण बागडे, प्रभुजी खडाईत, मुख्याध्यापक अरविंद रामटेके, रमेश पवार, सुनंदा देशपांडे, केंद्रप्रमुख सुनीता आत्राम, दिगांबर भांडारकर आदी मोठ्याप्रमाणात पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन बाबुराव निखाडे व आभार दिशा गद्रे यांनी केले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...