अहमदनगर,दि.18-कोपर्डीतील शाळकरी मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी तिन्ही आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी शनिवारी दोषी ठरविले आहे.
जितेंद्र बाबूलाल शिंदे (वय २५), संतोष गोरख भवाळ (वय ३०) नितीन गोपीनाथ भैलुमे (वय २६) अशी आरोपींची नावे आहेत. कट रचून मुलीवर अत्याचार करणे, हत्या करणे, बालकांच्या लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. २१ आणि २२ नोव्हेंबरला शिक्षेवर युक्तिवाद होईल. त्यानंतर शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे १३ जुलै २०१६ रोजी नववीत शिक्षण घेत असलेल्या १५ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घृणपणे खून झाला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर १५ जुलै २०१६ रोजी या गावातील आरोपी जितेंद्र बाबूलाल शिंदे याला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर १६ जुलै रोजी संतोष गोरख भवाळ, नितीन गोपीनाथ भैलुमे या दोघांना अटक झाली होती. जिल्हा व सत्र न्यायालयात या प्रकरणी खटला सुरू होता. मागील आठवड्यातच या खटल्याच्या अंतिम युक्तिवादाचे कामकाज पूर्ण झाले आहे. सरकारी पक्षाकडून मृत मुलीची मैत्रिण, आई, बहीण, चुलत आजी, आजोबा, दंतवैद्यकीय डॉक्टर, दोन तपास अधिकारी, पंच अशा एकूण ३१ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. तर आरोपी संतोष भवाळच्या वतीने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एक बचावाचा साक्षीदार तपासण्यात आला. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी तिन्ही आरोपींविरुद्ध २४ वेगवेगळे परिस्थितीजन्य पुरावे सादर केले होते.
No comments:
Post a Comment