मुल्ला येथील घटना
देवरी,दि.30- तालुक्यातील मुल्ला येथे शेतातील खळ्यावर मळणीसाठी ठेवलेल्या धानाच्या पुंजण्यांना अचानक आग लागून सुमारे दोन लाखाचे नुकसान झाल्याची घटना आज गुरूवारी दुपारी 3 वाजचे सुमारास घडली.
सविस्तर असे की, मुल्ला येथील शेतकरी सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्रावण यादोराव खोटेले यांनी आपल्या 10 एकर शेतीतील धान पिकाची नुकतीच कापणी केली. हे धानपिक त्यांनी आपल्या राहत्या घरामागील शेतातील खळ्यावर मळणीसाठी गोळा करून ठेवले होते. या धानपिकाची मळणीनंतर श्री खोटेले यांना सुमारे 2 लाखाचे उत्पन्न अपेक्षित होते. परंतु, आज दुपारी 3 च्या सुमारास अचानक आग लागल्याने खळ्यावरील संपूर्ण पिक जळून खाक झाले. याशिवाय गुरांसाठी तयार वैरणीची सुद्धा राख रांगोळी झाली आहे. आगीने रौद्ररुप धारण केल्याने तीन-तीन मोटारींनी पाण्याचा मारा करूनसुद्धा आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी गावकऱ्यांना मोठी कसरत करावी लागली. गावाशेजारी असलेल्या खळ्यावर आग लागल्याने गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती आटोक्यात ठेवण्यात गावकऱ्यांना यश आल्याने संभाव्य धोका टाळता आले. वृत्त लिहीपर्यंत आग विझविण्याचे कार्य सुरूच होते.
No comments:
Post a Comment